You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावतला आदेश बांदेकरांचा टोला, 'खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. कंगना राणावतला आदेश बांदेकर म्हणतात, 'खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही'
"खोट्या घोड्यावर बसत, दुसऱ्याने लिहिलेले स्क्रिप्ट वाचून कधी कोणी झाशीची राणी होत नाही," अशी टीका शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
बांदेकर यांनी ट्वीट केलं, "खोट्या घोड्यावर बसत, दुसऱ्याने लिहिलेले स्क्रिप्ट वाचून कधी कोणी झाशीची राणी होत नाही. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते. जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली. कुणालाही राणीची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही."
कंगना राणावतनं मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली होती. त्यानंतर तिच्या वक्तव्यावर वाद उफाळला आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय, "राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी सरकार कंगनाचा आधार घेत आहे."
त्यांनी पुढे म्हटलं, "कंगनाची चर्चा करण्यापेक्षा या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यापेक्षा सरकारने कोरोनावर लक्ष देण्याची गरज आहे."
2. मुंबईत 1 नोव्हेंबरनंतर कार्यालयं पूर्णपणे सुरू होणार?
मुंबईतील कार्यालयं आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे सुरू करण्यासाठी 1 नोव्हेंबर ही शास्त्रीय तारीख असू शकते, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR)नं प्रसिद्ध केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे.
हा अहवाल मुंबई महापालिकेला सादर करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
ख्रिसमस नंतर शाळा उघडायला हव्यात, असं या अहवालावर काम करणाऱ्या संदीप जुनेजा यांनी म्हटलं आहे.
तसंच जानेवारी 2021पर्यंत मुंबईतल्या 75% झोपडपट्टीवासीयांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज आढळून येतील, तर इतर भागातील 50% रहिवाशांमध्ये अँटिबॉडीज आढळतील, असंही हा अहवाल सांगतो.
3. 'मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून मला संपवण्याचा प्रयत्न केला'
"एकनाथ खडसेंनी एक इंचही जमीन घेतलेली नाही. मग कोणता भूखंड घोटाळा केला? पण, हायकोर्टाचा एखादा जज नेमायचा आणि मानसिक छळ करत राहायचा, हे उपद्व्याप कुणी केले? यांनीच केले. बाकी सगळ्यांना क्लीन चीट दिली, मग एकनाथ खडसेंनाच का नाही दिली?" असा सवाल भाजप नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "एकनाथ खडसे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार आहे म्हणून त्याला संपवलं पाहिजे. ते नीटपणे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण मी इतक्या सहजासहजी संपणाऱ्यातला नाही."
दुसरीकडे शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी एकनाथ खडसे यांना शिवसेनेत सामील होण्याची ऑफर दिली आहे.
त्यांनी म्हटलं, "कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचं काय झालं ते नव्याने सांगायला नको. त्यांनी भाजप सोडून आता शिवसेनेत यायला हवं. आम्ही त्यांचे स्वागत करू."
"एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपची युती तुटली. आता खडसेंनी आमच्याकडे यावं. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल", असंही सत्तार म्हणाले.
4. एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला स्थगिती नाही : हायकोर्ट
अंतिम वर्षाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत प्रत्यक्ष हजेरी पद्धतीवर आक्षेप घेत हायकोर्टात आलेल्या विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या नऊ विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर शनिवारी (5 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामुळे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्रात होणाऱ्या वैद्यकीय परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
8 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात वैद्यकीय परीक्षा सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला विरोध करत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचसी) अंतिम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमाच्या नऊ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
एमयूएचसीने 21 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाला या याचिकेमार्फत आव्हान दिले होते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या हजर राहून परीक्षा देण्याचे आदेश एका परिपत्रकातून देण्यात आले आहेत. त्यालाच या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. संबंधित याचिकेवर शनिवारी तातडीने न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि न्यायमूर्ती एस. पी. तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
5. राष्ट्रवादीला विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा - रामदास आठवले
राष्ट्रवादी पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करावं, असं वक्तव्यं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
आठवलेंनी ट्वीट करुन म्हटलं, "काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल आणि सोनिया गांधीही तयार नाहीत. माझी काँग्रेसला सूचना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. याबाबतचा निर्णय पवार आणि काँग्रेस यांनी घ्यावा."
या आधीही अशाच पद्धतीची सूचना करण्यात आली होती. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र गांधी घराण्याशिवाय एखादी व्यक्ती अध्यक्षपदी यावी, असंही त्यांनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)