कंगना राणावतला आरपीआय संरक्षण देईल: रामदास आठवले #5मोठ्याबातम्या

रामदास आठवले

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. कंगना राणावतला शिवसेनेनं धमकी देणं अयोग्य, कंगनाला आरपीआय संरक्षण देईल - रामदास आठवले

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सध्या जुंपली आहे. या वादात आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना कंगना राणावतने मुंबई शहराची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली होती. त्यानंतर गेले दोन दिवस हाच विषय सगळीकडे चर्चेत होता. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कंगनावर टीका झाली. पण रामदास आठवले यांनी या वादात कंगनाची बाजू घेतली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावतला आरपीआय संरक्षण देईल, असं रामदास आठवले म्हणाले. ही बातमी झी 24 तासने केली आहे.

2. देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू - लष्करप्रमुख मनोज नरवणे

भारताच्या लष्करातील अधिकारी आणि जवान जगात सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करू तसंच चर्चेच्या माध्यमातून वाद मिटेल, असा विश्वास लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला आहे.

पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यालगतची जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी नुकतेच चीनने प्रयत्न केले होते. त्याचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लडाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला.

"लेहमध्ये पोहोचल्यानंतर मी अनेक ठिकाणांना भेट दिली. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच तयारीचाही आढावा घेतला. जवानांचं मनोबल उंचावलेलं असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते तयार आहेत.

"नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सैन्य तैनात करण्यात आलं आहे. यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचं रक्षण होईल," असं लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

3. रोजगार, सुरक्षेबाबत प्रश्नांची उत्तरंही गायब, राहुल गांधी यांची टीका

वाढती बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Ani

12 कोटी नोकऱ्या गायब झाल्या, 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था गायब, देशातून उल्हासाचं वातावरण आणि सुरक्षा गायब झाली, प्रश्नांची उत्तरंही गायब झाली आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे प्रियंका गांधी-वाड्रा यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 2018 ते 2020 दरम्यान CGLच्या परीक्षा झाल्या नाहीत. SSCची भरतीही झाली नाही, यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

कोरोना
लाईन

4. बारामतीत पुन्हा 14 दिवस लॉकडाऊन

कोरोना रुग्णांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी बारामतीमध्ये पुन्हा 14 दिवस कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र लॉकडाऊन असेल, अशी माहिती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी दिली.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

बारामतीमध्ये गेल्या तीन दिवसांत 300 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. सलग तीन दिवस मोठी वाढ झाल्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरदरम्यान बारामतीत लॉकडाऊन करण्यात येणार असून शहराच्या चारही बाजूच्या सीमा सील करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. ही बातमी लोकमतने दिली आहे.

5. नागपूर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 16 कोटी रुपयांची आर्थिक मदत

नागपूर विभागात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी वितरित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. .

पूर्व विदर्भात आलेल्या पुरामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने सानुग्रह अनुदान, घर पडझडीसाठी मदत व मदत छावण्यांमध्ये दाखल नागरिकांना अन्न, पाणी व वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)