कोरोना व्हायरस: तुम्ही वापरता तो सॅनिटायझर योग्य आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मुंबई आणि राज्यभरात वापरण्यात येणारे सॅनिटायजर्स निकृष्ट दर्जाचे आहेत असं कंझ्युमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाने सांगितलं आहे. काही लोक निव्वळ नफा कमावण्यासाठी बाजारात घुसले असून त्यांची उत्पादनं दर्जेदार नसल्याचं सोसायटीला आढळलं आहे.
सॅनिटायझर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कोव्हिड-19 विरोधातील लढाईत आपल्याकडे शत्रूपासून बचावासाठी असलेली ढाल म्हणजे सॅनिटायझर. कामात असताना, प्रवासात हात स्वच्छ धुण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करतो. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सॅनिटायझरची मागणी दिवसेंदिवस वाढतेय.
याचाच फायदा काही कंपन्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सॅनिटायझरच्या नावाखाली बाजारात अनेक प्रॉडक्ट दिसू लागले आहेत.
99.9 टक्के व्हायरसला मारणारा, सुगंधी वास असलेला, अल्कोहोल बेस असलेला अशा नावाने अनेक सॅनिटायझर्स बाजारात उपलब्ध आहेत.
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आपला सर्वांचा भर अल्कोहोल बेस असलेल्या सॅनिटायझर्सकडे आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

पण, तुम्ही वापरत असलेला सॅनिटाइझर योग्य आहे? सॅनिटाइझरचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत ना? तुमच्या त्वचेला सॅनिटायझर सूट होतोय? हा प्रश्न विचारण्याचं कारण, म्हणजे बाजारात असलेले बनावट किंवा भेसळयुक्त सॅनिटायझर्स.
ग्राहक संरक्षणासाठी काम करणाऱ्या कंझ्युमर्स गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या अभ्यासात तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांमधील 50 टक्क्यांपेक्षा जास्त सॅनिटायझर्स भेसळयुक्त असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या भागातून हे सॅनिटायझर तपासासाठी घेण्यात आले होते.
कंज्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचा अभ्यास काय सांगतो?
- तपासणीसाठी सॅनिटायझर्सचे 122 सॅम्पल घेण्यात आले
- 45 सॅम्पलमध्ये भेसळ आढळून आली
- 5 नमुन्यांमध्ये लोकांना हानिकारक मिथेनॉल असलेलं आढळून आलं
- 59 सॅम्पल्स लेबलवर दाखवण्यात आलेल्या माहितीप्रमाणे होते
याबाबत बीबीसीशी बोलताना कंज्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे मानद सचिव डॉ. एम. एस. कामथ म्हणाले, "बाजारातून जमा करण्यात आलेल्या 120 नमुन्यांवर 'गॅस क्रोमॅटोग्राफी' टेस्ट करण्यात आली. त्यात 45 नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली. म्हणजे हे सॅनिटायझर्स त्यांच्या लेबलवर दाखवण्यात आलेल्या माहितीप्रमाणे नव्हते."
"सर्वात घातक म्हणजे, 5 सॅनिटायझर्समध्ये मिथाइल अल्कोहोल असल्याचं आढळून आलं. मिथाइल अल्कोहोल वापरण्यास बंदी असतानाही याचा सर्रास वापर केला जातोय. ब्रॅन्डेड प्रॉडक्टच्या नावाखाली लोकांच्या शरीरास हानिकारक असलेलं मिथाइल अल्कोहोल वापरून सॅनिटायझर बनवण्यात येत आहेत," असं डॉ. कामथ पुढे म्हणाले.
काय आहे मिथाइल अल्कोहोल?
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) च्या माहितीनुसार, मिथाइल अल्कोहोल एक विषारी पदार्थ आहे. त्वचा, डोळे, फुफ्फुसांमध्ये यांना त्रास होऊ शकतो.
मिथाइल अल्कोहोलच्या संपर्कात येणाऱ्यांना यापासून इजा होण्याची शक्यता असते. मिथाइल अल्कोहोल प्लॅस्टिक, पॉलिस्टर, सॉलव्हन्ट बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये वापरण्यात येतं.
"मिथाइल अल्कोहोल त्वचेच्या आत शोषून घेतलं जातं. यामुळे इजा होण्याची शक्यता असते. डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्याचसोबत ओकारी होणं, डोकेदुखी आणि जास्त संपर्कात आल्यास प्रसंगी मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते," असंही डॉ. कामथ पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
'द एस्थेटिक क्लिनिक्स' च्या कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि सर्जन डॉ. रिंकी कपूर म्हणाल्या की, "सॅनिटायझरची वाढती मागणी लक्षात घेता, पैसा कमावण्यासाठी अनेक दुकानदार बोगस सॅनिटायझरची विक्री करत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे.
या बोगस सॅनिटायझरच्या वापरामुळे त्वचेची समस्या उद्भवण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही दुकानातून सॅनिटायझर खरेदी करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे.''
सॅनिटायझरबाबत सरकारची भूमिका
याबाबत बीबीसीशी बोलताना राज्याचे आरोग्यंत्री राजेश टोपे म्हणाले, "क्वालिटी नसलेलं सॅनिटाइझर योग्य नाही. सॅनिटायझरसाठी जागतिक आरोग्य संघटनेचा एक फॉर्म्युला असतो. त्याप्रमाणेच सॅनिटायझर असणं आवश्यक आहे. पण, इथेनॉलचं प्रमाण कमी केलं असेल तर चालणार नाही. या प्रकरणी छापे टाकून नियंत्रण आणलं जाईल. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
याबाबत बोलताना डॉ. कामथ म्हणाले,"आमच्या रिपोर्टनंतर केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे. केंद्राने याबाबतची सर्व माहिती मागवली आहे. आम्ही अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना आमचा रिपोर्ट दिला आहे. सरकारने यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. हा प्रश्न जनतेच्या सुरक्षेचा आहे."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. कपूर पुढे म्हणाल्या की, ''जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार, सॅनिटायझरमध्ये कोणतीही सुगंध असू नये. समाप्तीची तारीख स्पष्टपणे नमूद केलेली असावी, निर्माता परवाना क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख करणं आवश्यक आहे. तसेच पीएच पातळी 6-8% आणि सूक्ष्मजंतूंची कार्यक्षमता 99.9% दरम्यान असणे आवश्यक आहे.''
कोणता सॅनिटायझर विकत घ्यावा
याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबईतील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बिंदू स्थळेकर म्हणाल्या, "सॅनिटायझर घेताना लोकांनी नीट काळजी घ्यावी. सॅनिटायझरमध्ये इथाइल अल्कोहोलचं प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर उत्तम. याशिवाय अनेकदा अल्कोहोलमुळे हात कोरडे पडू शकतात. त्यामुळे ग्लिसरीनयुक्त सॅनिटायझर असेल तर त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना अॅलर्जीचा त्रास असेल त्यांनी सुगंधी सॅनियाटझरचा वापर करणं टाळावं.
सॅनिटायझर चांगला का वाईट घरी कसं ओळखाल?
''तुम्ही घरी सुद्धा सॅनिटायझर वापरण्यास योग्य आहे किंवा नाही हे तपासू शकता. यासाठी एका चमच्यात गव्हाचं पीठ घेऊन त्यात सॅनिटायझर टाका. जर पीठ चिकट झालं तर सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी आहे आणि ते योग्य नाही आणि पीठ कोरडे राहिल्यास सेनेटिझर वापरण्यास योग्य आहे असं समजावं'', असं डॉ. कपूर म्हणाल्या.
अभ्यास करणाऱ्यांना आले धमकीचे फोन
कंज्युमर्स गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. कामथ पुढे सांगतात, "सॅनिटायझर्सबाबत आम्ही रिपोर्ट दिल्यानंतर मला 4-5 धमकीचे फोन आले आहेत. अशा प्रकारचा तपास केल्यानंतर लोकांचे फोन येणं साहजिक आहेत. तुमच्यावर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करू, तुम्ही खोटी माहिती दिली आहे, याबाबत तुम्ही स्पष्टीकरण द्या. अशा प्रकारचे अनेकवेळा लोकांचे फोन येत असतात. पण, त्यांना न घाबरता आम्ही लोकांसाठी काम करत असतो."
काय काळजी घ्यावी
- नॉन-अल्कोहोलिक प्रॉडक्ट कोव्हिड-19 विरोधात उपयुकत्त नाही
- सॅनिटायझर लहान मुलांपासून दूर ठेवा
- कारण इंजेक्शनमुळेही विषबाधा होण्याती शक्यता आहे
- सॅनिटायजर ओव्हर द काउंटर असल्याने त्यावर कंपनीचं नाव आणि एक्सपायरी डेट असणं गरजेचं आहे
- लोकांनी सॅनिटायझर घेताना त्यावर देण्यात आलेली सूचना नीट वाचून घ्यावी
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























