कोरोना व्हायरस: आर. आर. पाटलांचा मुलगा रोहित यांना कोरोनाची लागण

रोहित पाटील

फोटो स्रोत, Rohit patil @facebook

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. रोहित यांचे काका सुरेश पाटील यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं टीव्ही 9 मराठीने म्हटलं आहे.

रोहित पाटील आणि बंधू सुरेश पाटील या दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. घरातील दोन सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आर. आर. पाटील यांच्यापत्नी आणि पळुस कडेगाव मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांची चाचणी घेण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

2. 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, मग इथं पर्यटनाला आला होता का?'

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखं भासत असल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगना रानावतनं केलं. कंगनाच्या या टीकेला काँग्रेस नेते आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

कंगना राणावत

राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं, "कंगना रानावत म्हणते, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते. अभिनयाच्या क्षेत्रात 'रन-आउट' होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला?"

भाजप नेते राम कदम यांनी मात्र कंगना रानावत ही झांशीची राणी असून ती महाविकास आघाडीला घाबरणार नाही, असं म्हटलं आहे.

कदम यांनी ट्वीट केलं आहे, महाविकास आघाडी सरकारनं मुंबई पोलिसांवर दबावतंत्राचा अवलंब करत आहे आणि यामुळे सुशांतला न्याय मिळत नाहीये. बॉलीवूडमधल्या ड्रग माफिया साखळीला त्यांना वाचवायचं आहे, पण, अशा पोकळ धमक्यांमुळे कंगना रानावतसारखी झांशीची राणी घाबरणार नाही.

3. शरद पवारांची भारत-चीन सीमेवरील तणावावर बैठक

चिनी सैन्यांकडून पुन्हा एकदा नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. दरम्यान दोन्ही देशात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी देशाच्या माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

कोरोना
लाईन

शरद पवार ट्वीट केल्यानुसार, "भारत आणि चीनमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर माजी हवाई दल प्रमुख भूषण गोखले आणि माजी परराष्ट्र सचिव तसं भारत-चीन संबंधांमधील तज्ञ विजय गोखले यांना आमंत्रित केलं होतं."

"या बैठकीत विजय गोखले यांनी भारत-चीन संबंधांचा इतिहास सांगितला. खासकरुन त्यांनी सीमारेषेवरुन झालेल्या वादांची माहिती दिली. यावेळी त्यांनी गेल्या काही महिन्यात नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावावर त्यांची मतं मांडली," अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

4. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

काँग्रेस नेते सुनील केदार यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवतं होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षणं असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केलं आहे.

यापूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची बाधा झाली होती. हे सर्व मंत्री कोरोनामुक्त झाले आहेत.

5. सुशांत सिं आत्महत्येप्रकरणी प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करावं- उच्च न्यायालय

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचे वार्तांकन करताना प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा. तसेच वार्तांकनाचा तपासावर काहीही परिणाम होणार नाही, याची काळजी माध्यमांनी घ्यावी, असं मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी म्हटलं. आऊटलूकनं ही बातमी दिली आहे.

सुशांत सिंह

फोटो स्रोत, Twitter

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मीडिया ट्रायल होत असल्याचा आरोप करणाऱ्या दोन याचिकांची सुनावणी न्या.ए. ए. सय्यद व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. दोन जनहित याचिकांपैकी एक याचिका आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी दाखल केली आहे. प्रसारमाध्यमांनी मुंबईपोलिसांविरुद्ध मोहीम हाती घेतल्याचा आरोप या सर्वांनी केला आहे.

या याचिकेवर सीबीआय आणि केंद्र सरकारला काय म्हणायचे आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे म्हणत न्यायालयाने या याचिकांवर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)