You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमध्ये सतत चकमकी का होत आहेत?
- Author, माजिद जहाँगीर
- Role, बीबीसी हिंदीसाठी, श्रीनगरहून
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील पंथा चौकात शुक्रावारी (28 ऑगस्ट) रात्री भारतीय सैन्य आणि कट्टरतावाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन कट्टरतावादी ठार झाले. तसंच, जम्मू-काश्मीर पोलिसांमधील सहाय्यक उपनिरीक्षकाचा (ASI) सुद्धा या चकमकीदरम्यान मृत्यू झाला.
श्रीनगरआधी दक्षिण काश्मीरमधील शोपियन आणि पुलवामा जिल्ह्यातही चकमकी झाल्या. यात एकूण दहा कट्टरतावादी आणि दोन सुरक्षा दलाच्या जवानांचा मृत्यू झाला.
पुलवामा आणि शोपियनमध्ये झालेल्या चकमकीत सात कट्टरतावद्यांना ठार करण्यात आलं, तर भारतीय लष्कराच्या एका जवानाच मृत्यू झाला आणि एक जवान गोळीबारादरम्यान जखमी झाला आहे. या दोन्ही कारवाया पोलीस, लष्कर आणि CRPF यांनी संयुक्तपणे केल्या होत्या.
गुरुवारी (27 ऑगस्ट) रात्री उशिरा तीन दुचाकीस्वार कट्टरतावाद्यांनी पंथा चौकात CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षरक्षकांनी तातडीने पूर्ण परिसराला घेराव घातला, असं पोलिसांनी सांगितलं.
परिसराला घेराव घातल्यानंतर आणि शोधमोहीम सुरू केल्यानंतर कट्टरतावाद्यांनी पुन्हा गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्यानंतर तीन कट्टरतावाद्यांना भारतीय जवानांनी ठार केले, तर एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला. शोपियनमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान एक कट्टरतावादी पोलिसांना शरणही आला.
बाबू राम असं या चकमकीत जीव गमावलेल्या पोलिसाचं नाव आहे. बाबू राम हे जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (SOG) चे अधिकारी होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाघ सिंग यांनी दिली.
"आमचा एका शूर पोलीस अधिकाऱ्याचा त्यांनी जीव घेतला असतानाही आम्ही गोळीबार करणाऱ्या शेवटच्या कट्टरतावाद्याला शरण येण्याची संधी दिली होती, मात्र तो शरण आलाच नाही," असंही सिंग यांनी सांगितलं.
सोशल मीडियावर एक व्हीडिओ क्लिपही व्हायरल होऊ लागलीय. यात पोलीस व्हॅनमधून झुबेर अहमद या कट्टरतावाद्याची आई लाऊडस्पिकरमार्फत मुलाला (झुबेर अहमद) पोलिसांना शरण येण्याचं आवाहन करत आहे.
शोपियनमधील चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या लष्करी अधिकाऱ्याचं नाव प्रसांत असं आहे. उत्तर प्रेदशातील बुधानाचे प्रशांत रहिवासी होते.
"आठपैकी सात दहशतावदी हे 2020 मध्ये भरती झालेले आहेत. त्यांना पाकिस्तानी हँडलर्सकडून देशविरोधी भावनांमधून भडकावलं गेलं होतं आणि खोटी माहिती देऊन भरती करून घेतलं होतं," अशी माहिती जम्मू-काश्मीरमधील व्हिक्टर फोर्सचे जनरल ऑपरेशन कमांडिंग (GOC) ए. सेनगुप्ता यांनी दिली.
पोलिसांनी शनिवारी (29 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील 80 तरुण यंदा कट्टरतावादी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये दक्षिण काश्मीरमधूनच अधिकाधिक तरुण कट्टरतावादकडे झुकताना दिसत आहेत. गेल्या चार वर्षात सर्वाधिक चकमकी सुद्धा दक्षिण काश्मीरमध्येच झाल्या आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून उत्तर काश्मीरमध्येही कट्टरतावाद्यांनी सुरक्षारक्षकांना निशाणा बनवण्यास सुरुवात केलीय. दहाहून अधिक पोलीस, जवानांचा जीवही घेतला आहे. या हल्ल्यांदरम्यान काही कट्टरतावाद्यांना ठार केल्याचा दावाही पोलिसांनी केलाय.
जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास 200 कट्टरतावादी सक्रीय असल्याचं पोलीस महासंचालक दिलबाघ सिंग यांनी नुकतंच म्हटलं होतं.
काहीजणांचं म्हणणं आहे की, गेल्या 30 वर्षांपासून काश्मीरमध्ये चकमकी होत आहेत. त्यामुळे आताही एक चमकक झाली, तर त्यात नवल असं काहीच नाहीय.
श्रीनगरस्थित पत्रकार हारून रेशी यांच्या मते, उत्तर आणि दक्षिण काश्मीरमध्ये चकमक होणं, यात वेगळं काहीच नाहीय. पण आता या चकमकी रोज होत आहेत, हे विशेष आहे.
"मोठ्या संख्येत कट्टरतावाद्यांना ठार केलं जातंय, यात दुमत नाहीय. गेल्या चार महिन्यात अनेक कट्टरतावादी ठार केल्याचा दावा पोलिसांनी केलाय. सुरक्षारक्षकांचाही या चकमकींदरम्यान मृत्यू झाला आहे. पण प्रश्न असा आहे की, हे का होतंय? अनेक कट्टरतावादी ठार केल्याचा दावा केल्यानंतर हे थांबत नाहीय. आपल्याला मूळ कारण शोधून त्यावर उपाय शोधायला हवा," असं हारून रेशी म्हणतात.
मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान बळाचा वापर
श्रीनगरमधील बेमिना परिसरात शनिवारी (29 ऑगस्ट) निघालेल्या मोहरमच्या मिरवणुकीला अडवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि या झटापटीत अनेकांना दुखापती झाल्या आहेत.
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार शनिवारी (29 ऑगस्ट) मिरवणुकीवर अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पॅलेट्चा वापर केला. पाच जणांना दुखापत झाली असून, त्यांना श्रीनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, तर काहीजणांना पोलीस कोठडीत डांबण्यात आलं आहे.
श्रीनगरमधील शाहरी यांनी बीबीसीला फोनवरून दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुख्य रस्ता पूर्णपणे बंद केला होता आणि मोहरमची मिरवणूक काढण्यास मनाई केली होती.
रविवारी (30 ऑगस्ट) जम्मू-काश्मीरमध्ये हजरत इमाम हुसेन यांच्या शहादतचा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाला बलिदान आणि दु:खाचा दिवस मानला जातो. 1354 वर्षांपूर्वी दहाव्या मोहरमला करबलाच्या लढाईतली पैगंबर मोहम्मद यांचा नातू हजरत इमाम हुसेन यांची शहादत आठवली जाते.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दरवर्षीच मोहरमच्या मिरवणुकीवर निर्बंध घातले जातात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)