IPL 2020: सुरेश रैना म्हणून मायदेशी परतला का?

फोटो स्रोत, Getty Images
चेन्नई सुपर किंग्स संघाचा भरवशाचा फलंदाज सुरेश रैना याने इंडियन प्रीमियर लीगमधून माघार घेतली आहे. अख्ख्या हंगामातून माघार घेण्यामागचं कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक घडामोडी यामागे असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सुरेश रैना यंदाच्या हंगामात सहभाग नोंदवणार नसून वैयक्तिक कारणामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. विश्वनाथन यांनी सांगितलं आहे.
शुक्रवारी चेन्नई संघ आणि व्यवस्थापनातील 10 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्यांचा क्वारंटाईन कालावधी वाढवण्यात आला आहे.
आता रैना संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसल्याचं कळल्याने चेन्नईच्या चिंतेत भर पडली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रैना दुसऱ्या स्थानी आहे.

फोटो स्रोत, Twitter
कौटुंबिक घडामोड
सुरेश रैनाच्या नात्यातल्या काही माणसांवर कटू प्रसंग ओढवला. यामुळे रैना मायदेशी परतला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंजाबमधल्या पठाणकोट इथे रैनाचे काका-काकू राहतात. 19 ऑगस्टच्या रात्री हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला करून लूटमार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी रैनाच्या काका-काकूंना तीक्ष्ण हत्याराने जखमी केलं. 58वर्षीय अशोक तराल यांचा मृत्यू झाला. काकूंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
कुटुंबीयांपैकी श्यामलाल म्हणाले, रैना कदाचित याविषयी कळलं असावं. कदाचित म्हणून तो मायदेशी परतला आहे.
दिवंगत अशोक तराल यांच्या काकाचे श्यामलाल हे चिरंजीव. त्यांनी सांगितलं की, "ही घटना घडून 11 दिवस झाले. कुटुंबीयांचं कोणाशीही काहीही वाकडं नव्हतं. 11 दिवस प्रशासनाकडून काहीही मदत मिळाली नाही, कोणतंही आश्वासन मिळालं नाही. सद्यस्थितीत त्यांच्याघरी कमावणारं कोणीच नाही. त्यांची पत्नी रुग्णालयात आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर आहे. उपचारांचा खर्च बराच आहे. सरकारने काहीतरी पावलं उचलावीत. गावकऱ्यांनी खूप मदत केली. मात्र कोरोनामुळे ओढगस्तीच्या काळात कोण किती वेळ मदत करू शकेल. म्हणूनच प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा. जेणेकरून लोकांना सुरक्षित वाटेल".
दरम्यान याप्रकरणाचा तपास अतिशय गंभीरतेने सुरू असल्याचं पठाणकोटचे एसपी प्रभजोत सिंह यांनी सांगितलं.
रैनाची उपयुक्तता
रैनाने 193 मॅचेसमध्ये 5368 रन्स केल्या आहेत.यामध्ये एक शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर येत मोठी खेळी करणं रैनाची खासियत आहे. चेन्नईच्या विजयात रैनाने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
मधल्या षटकांमध्ये उपयुक्त फिरकी बॉलिंग आणि अफलातून क्षेत्ररक्षण हे रैनाचं आणखी एक गुणवैशिष्ट्य. संघातील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम रैना करताना दिसतो.
आयपीएल स्पर्धेत सातत्याने रन्स करणाऱ्यांच्या यादीत रैनाचा समावेश होतो. रैनाने माघार घेतल्यामुळे चेन्नईला संघरचना बदलणं भाग आहे.
आयपीएलचे सर्व हंगाम खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये रैनाचा समावेश होतो. चेन्नई सुपर किंग्स संघावर बंदीची कारवाई झालेली असताना रैनाने गुजरात लायन्स संघाचं नेतृत्वही केलं होतं. स्वातंत्र्यदिनी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या बरोबरीने रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.
चेन्नई सुपर किंग्स संघासाठी सलग 158 सामने खेळल्यानंतर रैनाला 2018 हंगामात दुखापतीमुळे एका सामन्यात खेळता आलं नव्हतं.
2016 मध्ये मुलीच्या जन्मावेळी पत्नीबरोबर थांबण्यासाठी रैनाने आयपीएलच्या एका सामन्यातून माघार घेतली होती.

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या हंगामाचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. एकेक करून सगळ्या टीम्स युएईत दाखल होऊ लागल्या आहेत. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणारा आयपीएलचा तेरावा हंगाम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला.
यंदा UAE मध्ये IPL चे सामने
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यंदाचा आयपीएल हंगाम भारतात आयोजित करणे शक्य नसल्याचं स्पष्ट झालं. सुरुवातीला आयपीएलच्या आयोजनासाठी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशांची नावं चर्चेत होती. मात्र टेलिव्हिजन प्रसारणाच्या दृष्टीने न्यूझीलंड किंवा वेस्ट इंडिजमध्ये मॅचेस आयोजित करणं सोयीचं नसल्याने ही नावं मागे पडली.
सख्खे शेजारी श्रीलंकेचा पर्यायही समोर आला होता. मात्र कोरोनाचा मर्यादित संसर्ग, बायोबबलची व्यवस्था, सगळया टीम्सची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल अशी हॉटेल्स, एकमेकांच्या टप्प्यात असणारी हॉटेल्स, जाण्या-येण्याची व्यवस्था यामुळे युएईला प्राधान्य देण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
19 सप्टेंबरला 13व्या हंगामातील पहिली मॅच खेळवण्यात येईल तर 10 नोव्हेंबरला अंतिम लढत खेळवण्यात येईल.
सार्वत्रिक निवडणुकांमुळे 2009 मध्ये आयपीएलचा अख्खा हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला होता. 2014मध्येही सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचा अर्धा हंगाम युएईतच आयोजित करण्यात आला होता.
युएईतली शारजा, अबूधाबी आणि दुबई इथे मॅचेस खेळवल्या जाणार आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























