You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर : कोव्हिडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या - #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. कोव्हिडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या- आंबेडकर
राज्यात ई-पास बाबतच्या नियमावरून विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडीला ई-पास नियमावलीवरून लक्ष्य केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, "पती-पत्नी घरी एकत्र राहू शकतात मात्र स्कूटरवर बसू शकत नाहीत. अनोळखी लोकांबरोबर प्रवास करायला परवानगी आहे मग परिवाराला एकत्र प्रवास करण्यावर निर्बंध का? उद्धव सरकारपण मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. लोकांच्या वैयक्तिक गोष्टींवर निर्बंध आणणं बंद करा. सरकारने कोव्हिडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, पूरस्थिती याकडे सरकारने लक्ष द्यावे अन्यथा राज्यावर मोठं संकट येईल."
राज्यामध्ये ई-पासचं बंधन आता संपुष्टात आणले पाहिजे अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.
2. मालेगाव काढ्यामुळे लोकांना त्रास
मालेगावात तयार होणाऱ्या काढ्यामुळे लोकांना पोटाचे आजार आणि मूळव्याधीचा त्रास होत असल्याचं आता दिसून आलं आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे.
व्हॉट्सअॅप आणि समाजमाध्यमांवर या काढ्याची माहिती वाचून लोकांनी तो मोठ्या प्रमाणात खरेदी केला. मात्र या काढ्याला सरकारची किंवा सरकारच्या कोणत्याही संस्थेची मंजूरी नाही.
हा काढा अतिप्रमाणात आणि सतत सेवन केल्यास आतड्यांना तो पचवण्यासाठी जास्त परिश्रम कराने लागतात. यातून निर्माण होणारी उष्णता शरीरात संतुलित झाली नाही तर त्याचे पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतात. हायपरअॅसिडिटी, मूळव्याध, पोटासंबंधीचे इतर आजार होऊ शकतात, असं या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितल्याचं या बातमीत नमूद करण्यात आलं आहे.
3. जीम सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा- पटोले
राज्यभरात व्यायामशाळा सुरू करण्याची मागणी गेले अनेक दिवस होत आहे. आता केंद्र सरकारची अॅडवायजरी येण्याआधी राज्य सरकारने स्वतंत्र अॅडवायजरी काढून जीम सुरू कराव्यात अशी सूचना राज्य सरकारला दिल्याचं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. सकाळने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
जीम लवकरच सुरू होतील असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केलं होतं. त्या फाईलवर माझी सही झालेली आहे, एकदोन दिवसांत मुख्यमंत्री त्यावर सही करतील, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं. आता नाना पटोले यांनीही असे संकेत दिल्याने जीमचालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
4. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी
धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यामुळे सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
"विद्यार्थ्यांच्या मागण्यांची संवेदनशीलतेने दखल घेण्याऐवजी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी पोलिसांकरवी मारहाण करणे हा मस्तवालपणा आहे," अशा शब्दांमध्ये पाटील यांनी टीका केली आहे.
'पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची बिनशर्त सूटका करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्याची दखल घ्यावी.
या सरकारचा मुखवटा फाटला आहे आणि मस्तवाल चेहरा दिसला आहे' असं चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्ध केली आहे.
5. 'जो स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्षाचे निर्णय काय घेणार'
काँग्रेस पक्षामधील अध्यक्षनिवडीचा वाद अजूनही काही दिवस चर्चेत राहाण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी याच्या नावाला पाठिंबा दर्शवताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जर राहुल गांधी यांनी सांगितलं तर राज्यातली सत्ताही सोडू असं सांगितलं. त्यावर प्रतिक्रिया देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमधील अंतर्विरोधावर बोट ठेवलं.
"महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचं मत काय आहे, याकडे आम्ही लक्ष देणार नाही. एका अध्यक्षपदावरून त्यांच्यात इतके वाद आहेत. सोनिया गांधी यांना अध्यक्षपदी राहायचं नाही तरीही त्यांना पदावर राहावं लागत आहे.
जो स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्षाचे निर्णय काय घेणार" असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)