राहुल गांधी काँग्रेसचं नेतृत्व करू शकतात, असं कुमार केतकर यांना का वाटतंय?

छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकलं. गुजरातमध्येही जवळपास जिंकलं. यात राहुल गांधींचा मोलाचा वाटा आहे. ते अध्यक्ष झाले नाहीत तरी नेतृत्व गटात त्यांनी असायला हवं असं मत काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केलं.
बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून निर्माण झालेल्या पेचाच्या निमित्ताने केतकर यांच्याशी बातचीत केली.
राहुल गांधीच अध्यक्ष व्हावेत असं तुम्हाला का वाटतं? 2014 नंतर काँग्रेसचा अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. 2019 नंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी दोन दशकांपासून राजकारणात आहेत. ते अजूनपर्यंत चमक दाखवू शकलेले नाहीत अशा आशयाचे अनेक लेख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या इतक्या हलाखीच्या परिस्थितीत वर काढू शकतील असं तुम्हाला कशाच्या आधारावर वाटतं?
पहिली गोष्ट म्हणजे ते दोन दशकं राजकारणात आहेत हे खरं नाही. महत्त्वाच्या पदी तसंच निवडणूक प्रचार मोहिमांमध्ये ते जेमतेम एक दशकभर आहेत. दोन दशकं एकूण राजकारणात आहेत. ते चमक दाखवू शकले नाहीत हा प्रचार प्रसारमाध्यमांनी, बीबीसीने सुद्धा खोटा ठरवला आहे.
गुजरात निवडणुकांवेळी मी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं, की गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार येईल अशी परिस्थिती होती. त्यावेळी तुम्ही इतर लोकांच्या मुलाखती घेत होतात. ते सगळे लोक म्हणत होते की, राहुल गांधींनी कमाल केली आहे. आम्हाला एवढी अपेक्षाच नव्हती.
2017-18च्या काळातली गोष्ट आहे. राहुल गांधींचं कॅम्पेन यशस्वी झालं, ते सत्तेच्या जवळ आले. ते गुजरात जिंकू शकले नाहीत पण ते सत्ता मिळवण्याच्या इतक्या जवळ येतील अशी कल्पना कोणी केली नव्हती.
हे म्हणजे आमचा मुलगा एवढं करेलअसं वाटलं नव्हतं, असं म्हणण्यासारखं आहे. ते लोकसभेत विजय मिळवून देऊ शकलेले नाहीत?
तुमची स्मृती तुम्ही तपासून पाहायला हवी. अमित शहांची जाहीर सभेतली भूमिका अशी होती की, आम्हाला गुजरातमध्ये 150 जागा मिळतील. त्यांना शंभर जागाही मिळू शकल्या नाहीत.

काँग्रेस पक्षाचा पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे...
असं तुम्ही कसं म्हणू शकता? भारतीय जनता पक्षाचाही 84-85 साली पराभव झाला होता.
गुजरातमध्ये भाजप सत्तेत आलं...
पराभव हा निकष ठरत नाही. सत्तेत येणं हा निकष ठरत नाही. तुम्ही कशी लढाई केली हे महत्त्वाचं असतं.
काँग्रेस पक्ष सत्तेत येण्यासाठी नाहीये का?
85 साली तुम्ही हाच प्रश्न अडवाणी-वाजपेयींना पर्यायाने भाजपला का विचारला नाही? वाजपेयी स्वत: हरले होते. ते सत्तेत नव्हते पण त्यांनी उमेद दाखवली. सत्तेत नसलो तरी लढायला तयार आहोत, असा त्यांचा दृष्टिकोन होता.
त्यावेळेच्या आणि आताच्या परिस्थितीची तुलना आपण कशी काय करू शकतो?
पक्षाची तुलना करतोय, नेत्यांची तुलना करत नाहीये.

फोटो स्रोत, Hindustan Times
तो पक्ष (भाजप) नव्याने स्थापन झाला होता. काँग्रेस पक्ष इतकी दशकं सत्तेत आहे?
भाजपची स्थापना 1980 मध्ये झाली होती. आपल्याला शब्दच्छल करून चालणार नाही. भाजपची स्थापना 1980 मध्ये झाली असली तरी सगळं नेतृत्व जनसंघापासूनचं होतं. अत्यंत अनुभवी नेतृत्व होतं. त्यावेळी राजीव गांधी एकदम नवीन होते. किंबहुना, जुन्या गोष्टी किती उकराव्यात हा मुद्दा वेगळा.
1985 सालच्या निवडणुकीपूर्वी 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेव्हाचे पेपर तपासून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल- जॉर्ज फर्नांडिस, फारुख अब्दुल्ला, एनटी रामाराव, करुणानिधी सगळेजण म्हणत होते की, हा पायलट आता कुठे आलाय. त्याला लगेच पंतप्रधान करणार? त्यांना सरकार बनवता येणार नाही. याला जास्त जागा मिळणार नाहीत.
आता आपलं खऱ्या अर्थाने कोअॅलिशन अर्थात गठबंधनाचं सरकार सत्तेत येईल. जनता पार्टीचा पराभव झालेला असला तरी आपण उमेदवार उभे करू शकू. श्रीनगरला, हैदराबादला, दिल्लीमध्ये, चेन्नईत कॉन्क्लेव्ह झाल्या. राजीव गांधी निश्चित हरणार असा होरा वर्तवण्यात आला. इंदिरा गांधींची हत्या झाली म्हणजे नेहरू घराणं संपलं, काँग्रेसही संपली. प्रत्यक्षात 414 म्हणजे नेहरू आणि इंदिरा गांधी यांनाही मिळाल्या नव्हत्या एवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या.

फोटो स्रोत, AFP
त्यावेळी काँग्रेसला सहानुभूतीचा फायदा मिळाला.
खून करायचे की काय गांधी घराण्यातील लोकांचे यांना सहानुभूती मिळावी म्हणून. काँग्रेसला 414 जागा मिळाल्या. तेव्हा भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या. मुद्दा पक्षाचा आहे.
राहुल गांधींनी असं काय करून दाखवलं आहे जेणेकरून त्यांना नेतृत्व मिळावं असं तुम्हाला वाटतं?
राहुल गांधींनी सगळ्या निवडणूक प्रचार मोहिमांमध्ये धडाडीने भाग घेतला. राजस्थानमध्ये जिंकले, मध्य प्रदेशात जिंकले. छत्तीसगढमध्ये जिंकले. त्याचा उल्लेख नाही करायचा? गुजरातमध्ये जवळजवळ जिंकले. सरकार नाही आलं.
पण अन्य तीन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आलं. राहुल गांधींनी त्यांच्या राजीनामापत्रात म्हटलं आहे की, मीच नव्हे तर आमच्या कुटुंबातील कोणीही अध्यक्ष असता कामा नये. मला असं वाटतंय की, त्यांनीच पक्षाचं नेतृत्व करावं. परंतु त्यांची इच्छा नसेल तर त्यांच्यावर नेतृत्व लादणं बरोबर नाही. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोणीही असेल, नेतृत्वामध्ये जी अनेक माणसं असतात त्यामध्ये राहुल गांधी तसंच सोनिया गांधी यांनी असावं असं मी माझ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























