You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रकाश आंबेडकर : विठ्ठल मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी 1 लाख वारकऱ्यांसह आंदोलन करणार #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. विठ्ठल मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी 1 लाख वारकऱ्यांसह आंदोलन करणार - प्रकाश आंबेडकर
कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमधून काही गोष्टी वगळल्या असल्या तरी राज्यातील सर्व मंदिरं अद्याप बंद आहेत.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर पुन्हा उघडण्यात यावं अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसोबत मिळून मंदिर प्रवेश आंदोलन करेल, याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करतील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.
या मुद्द्यावर सोलापूरचे जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना आणि वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार असल्याच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं. ही बातमी द लोकमतने दिली आहे.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात जुलै महिन्यात काय अनलॉक होणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
2. वंदे भारत एक्सप्रेसच्या 44 रेल्वेगाड्यांचा करार रद्द
केंद्र सरकारने हायस्पीड वंदे भारत एक्सप्रेसच्या 44 रेल्वेगाड्यांबाबत चीनच्या एका कंपनीसोबत करार केला होता. हा करार भारतानं रद्द केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
या रेल्वेसंदर्भात पुढील आठवड्यात नवं कंत्राट काढण्यात येणार असून यामध्ये 'मेक इन इंडिया' अंतर्गत कराराला प्राधान्य दिलं जाईल, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
44 सेमी हायस्पीड रेल्वेगाड्यांचा पुरवठा करण्यासाठीचं कंत्राट मिळवण्यासाठी चीनची भागीदारी असलेल्या CRRC Pioneer PVT. Ltd कंपनीने प्रस्ताव ठेवला होता. 10 जुलै रोजी याबाबतची निविदा चेन्नई इंटेग्रल कोच फॅक्टरीकडून पाठवण्यात आली होती.
त्यात इतर कंपन्यांसोबतच्या स्पर्धेत CRC कंपनी पुढे असल्याचं लक्षात आल्यानंतर हे पूर्ण कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
3. दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न बसवल्यास कर्नाटकात घुसण्याचा इशारा
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने अचानक हटवला होता. हा पुतळा 24 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत पुन्हा न बसवल्यास कर्नाटकात घुसण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
पुतळा न बसवल्यास कवळी कट्टी ते मनगुत्तीपर्यंत दांडी मार्च काढण्यात येईल असं शिवसेनेने म्हटलं आहे.
शिवाजी महाराजांच्या मनगुत्ती येथील पुतळ्याचं अनावरण काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं. पण पंधरा दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने हा पुतळा हटवल्यानंतर इथलं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना पत्र लिहून पुतळा तातडीने बसवण्याची मागणी केली होती.
यानंतर गावात बैठका होऊन पुतळा बसवण्याचं आश्वासन देण्यात आलं तरी अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
4. "आई बबड्यासाठी एवढं तर करणारच," मनसेची महापौर पेडणेकरांवर टीका
वरळी येथील जंबो कोव्हिड केंद्रात कामगार पुरवण्याचं कंत्रात महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला मिळाल्याचा आरोपावरून सध्या वाद सुरू आहे.
या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापौर पेडणेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
"मी, माझं आणि मलाच... आई बबड्यासाठी एवढं तर करणारच," अशा आशयाचं ट्वीट मनसे नेते संतोष धुरी यांनी केलं.
माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनीही महापौरांच्या मुलाला कंत्राट मिळाल्याच्या मुद्द्यावर टीका केली आहे.
महापौर पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. याबाबतची बातमी ई-सकाळने दिली आहे.
5. पंकजा मुंडे यांचा राजकारणातून काही दिवसांचा ब्रेक
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे राजकारणातून काही दिवसांचा ब्रेक घेणार आहेत. एका फेसबुक पोस्टमधून मुंडे यांनी याबाबत माहिती दिली.
सर्वप्रथम त्यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. गेले अनेक दिवस लॉकडाऊन असल्यामुळे आपण कुणाला भेटू शकलो नाही. क्वारंटाईनमुळे जास्त लोकांना पूर्वीप्रमाणे भेटू शकत नाही. त्यामुळे त्यांनी लोकांना भेटणं थांबवलं.
शिवाय आता मुलाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात काही दिवस जावं लागणार आहे, तिथंसुद्धा क्वारंटाईनचे नियम पाळावे लागणार असल्यामुळे यात काही दिवसांचा कालावधी जाईल.
त्यामुळे यादरम्यान काही काळ विश्रांती घेऊन देशात परतल्यानंतर पुन्हा कामाला सुरूवात करणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. याबाबतची बातमी झी 24 तासने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)