प्रवीण तरडे गणपतीच्या सजावटीवरून का झाले ट्रोल?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गणपतीसाठीच्या पुस्तकांच्या सजावटीमध्ये भारताचं संविधान गणपतीच्या पाटाखाली ठेवल्याबद्दल अभिनेता - दिग्दर्शक प्रवीण तरडेंवर सोशल मीडियातून टीका झाली. यानंतर तरडेंनी एका व्हिडिओद्वारे याबद्दल माफी मागितली आहे.

घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करताना प्रवीण तरडेंनी त्यासाठी पुस्तकांची आरास केली. याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. पण या देखाव्यात भारताची घटना गणपतीच्या पाटाखाली ठेवण्यात आल्याचं अनेकांनी तरडेंच्या लक्षात आणून दिलं आणि यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.

यामुळे संविधानाची विटंबना झाल्याचं काहींनी म्हटलं.

संविधानाच्या प्रतीचा अशा प्रकारे वापर केल्याबद्दल प्रवीण तरडेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली

यानंतर प्रवीण तरडेंनी या सगळ्या प्रकाराबद्दल माफी मागत हा फोटो काढून टाकला आणि सजावटीतही बदल केला.

माफीचा एक व्हिडिओ प्रवीण तरडेंनी फेसबुकवर पोस्ट केलाय. त्यात ते म्हणतात, "माझ्या घरी पुस्तक गणपती अशी कॉन्सेप्ट होती. आणि बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सगळ्यात मोठं प्रतीक अशी माझी भावना होती. परंतु ती किती मोठी चूक आहे, हे माझ्या लक्षात अनेक लोकांनी आणून दिलं. RPI, भीम आर्मी, लातूरची संघटना, पुण्यातल्या अनेक संघटना...मी सर्व माझ्या दलित बांधवांची, ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या, त्या सगळ्यांची जाहीर माफी मागतो. माझी चूक मान्य करतो. आणि मी हा केलेला बदल तुमच्या सगळ्यांना दाखवतो."

प्रवीण तरडे कोण आहेत?

अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार अशी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवीण तरडेंची ओळख आहे. 2018मध्ये आलेला 'मुळशी पॅटर्न' हा त्यांचा गाजलेला चित्रपट. या सिनेमाचं लेखन - दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. या सिनेमातली नन्या भाईची भूमिकाही त्यांनी केली होती. देऊळ बंद या सिनेमाचं दिग्दर्शनही तरडेंनी केलं होतं.

प्रवीण तरडेंनी कन्यादान, कुंकू, कुटुंब, तुझं माझं जमेना, पिंजरा या मालिकांचं लेखन केलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी पितृऋण, रेगे या चित्रपटांची पटकथा आणि संवाद लिहिले होते.

त्यांनी कोकणस्थ, देऊळ बंद या चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शन केलं होतं.

प्रवीण तरडेंचा आगामी सिनेमा 'सरसेनापती हंबीरराव' हा हंबीरराव मोहीतेंच्या आयुष्यावर आधारित आहे.

कोरोना काळात, 26 जूनला तरडे यांनी शेतात काम करताना फेसबुक लाईव्ह केलं होतं. भात लावायला आलोय, कोरोनामुळे कामाला माणसं मिळत नसल्याने आम्ही भात लावायला आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)