You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी: तरुणांसाठी मोदी सरकारनं कोणता महत्त्वाचा निर्णय घेतलाय?
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा देऊन संधीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणण्याकरता National Recruitment Agency अर्थात राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती देताना National Recruitment Agency ची घोषणा केली.
'हा निर्णय कोट्यवधी तरुणांसाठी वरदान ठरेल. सामयिक पात्रता परीक्षेमुळे भारंभार परीक्षा द्याव्या लागणार नाहीत. त्यामुळे वेळेची बचत होईल. यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकताही येईल,' असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
National Recruitment Agency मध्ये एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. "युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल," असं प्रकाश जावेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटलं.
यासंबंधी आम्ही राज्य सरकारांनाही सूचना करू आणि भविष्यात खासगी क्षेत्रासाठीही अशा संस्थेचा विचार होऊ शकतो, असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं.
कशी असेल परीक्षा?
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल माहिती दिली. या निर्णयामुळे नोकरी शोधणाऱ्या तरुणांना फायदा होईल असं जावडेकर म्हणाले.
एनआरएद्वारे सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा केंद्र सरकारच्या सर्न नॉन गॅझेटेड म्हणजे अराजपत्रित पदांसाठी (वर्ग ब आणि क) पदांसाठी असेल.
स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स आणि इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग सर्विस पर्सनलसाठी किमान पात्रता चाचणी परीक्षा एनआरए घेईल.
पदवी, 12 वी, 10वीच्या उमेदवारांसाठी वेगवेगळी परीक्षा असेल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार आणि प्राथमिकतेनुसार ते कोणत्याही क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करू शकतील.
जे सीईटी पास करतील ते रिक्रूटमेंट एजन्सीमध्ये उच्च स्तरावरील परीक्षेसाठी अर्ज करु शकतील. त्या टप्प्यात टीयर2 आणि टीयर 3 सारख्या परीक्षा होतील मात्र सीईटीसाठी अभ्यासक्रम सर्वांसाठी समान असेल.
सीईटीमध्ये मिळवलेले गुण तीन वर्षांसाठी वैध असतील. ही परीक्षा इंग्रजीसह 12 भाषांमध्ये होईल. प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)