You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मृत बायकोचा मेणाचा पुतळा बनवणारा पती ठरला चर्चेचा विषय
- Author, रविशंकर लिंगुतला
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
पहिल्या नजरेत कुणीही सांगू शकणार नाही की चित्रात दिसणारी महिला खरोखरची महिला नसून तो एक पुतळा आहे.
कर्नाटकातले उद्योजक श्रीनिवास गुप्ता यांनी त्यांच्या पत्नी माधवी यांचा सिलिकॉन आणि मेणाचा हा पुतळा तयार करून घेतला आहे. कोप्पल शहात बांधलेल्या नवीन घरात त्यांनी या पुतळ्यासोबत गृहप्रवेश केला.
तीन वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात माधवी यांचं निधन झालं होतं. गृहप्रवेशावेळी भावुक झालेले श्रीनिवास गुप्ता यांनी सांगितलं, "माधवीला नेहमीच एक चांगलं घर हवं होतं. ती मला नेहमीच एका मोठ्या घरात जायचं आहे, असं म्हणायची आणि आज तिची इच्छा पूर्ण झाली आहे."
श्रीनिवास आणि माधवी यांना दोन मुली आहेत. श्रीनिवास मूळचे आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातले. मात्र, व्यवसायानिमित्त जवळपास 32 वर्षांपूर्वी ते कर्नाटकातल्या कोप्पलमध्ये स्थायिक झाले.
माधवी-श्रीनिवास यांची थोरली मुलगी अनुषाने बीबीसीशी बोलताना सांगितलं, "5 जुलै 2017 रोजी कोप्पलहून तिरुमालाकडे जात असताना कोलार भागात आमच्या गाडीला अपघात झाला. आमची कार ट्रकला धडकली. त्यात आईचा मृत्यू झाला. त्यावेळी ती 45 वर्षांची होती.
असा बनवला पुतळा
"आईच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी करावं, अशी वडिलांची इच्छा होती. त्यानुसार आमच्या परिचयाचे आर्किटेक्ट महेश रंगनवार यांनी पुतळा बनवण्याचा सल्ला दिल्याचं अनुशाने सांगितलं. पुतळा बनवण्याचं निश्चित केल्यानंतर मूर्तीकाराचा शोध सुरू झाला. हा शोध बंगळुरूमधले आर्टिस्ट श्रीधर मूर्ती यांच्यापर्यंत येऊन संपला. त्यांनीच हा पुतळा बनवला.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना श्रीनिवास म्हणाले, "माझ्या घरात पत्नीला पुन्हा बघून मला खूप आनंद होतो आहे. बंगळुरूचे आर्टिस्ट श्रीधर मूर्ती यांना माझ्या पत्नीचा पुतळा बनवण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. पुतळा दीर्घकाळ टिकावा, यासाठी यात सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे."
कोप्पलमध्ये वर्षभर उष्ण वातावरण असतं. शिवाय दिवस-रात्र एसी सुरू ठेवू शकत नाही. त्यामुळे श्रीधर मूर्ती यांनी मेणासोबतच सिलिकॉनच्या वापराचा सल्ला दिला होता.
"आईची स्वप्नपूर्ती"
अनुशाने सांगितलं, "एक सुंदर आणि मोठं घर असावं, असं तिचं स्वप्न होतं. आज तिचं स्वप्न बाबांनी पूर्ण केलं आहे. मात्र, ती या जगात नाही. ती जगात नसली तरी या पुतळ्याच्या रुपाने तिने तिच्या स्वप्नाच्या घरात गृहप्रवेश केला आहे. यापुढे अनेक दशकं ती या घरात राहणार आहे.
"गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांना पुतळ्याची जराही कल्पना नव्हती. त्यामुळे घरी आल्यावर जेव्हा पाहुण्यांनी सोफ्यावर बसलेल्या माधवी यांना बघितलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. नंतर हा पुतळा असल्याचं त्यांना कळलं.
अनुशाने सांगितलं, "पाहुण्यांनी आईच्या पुतळ्याचे फोटो काढले आणि ते व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर शेअर केले. काहींनी व्हिडियोसुद्धा पोस्ट केले."
सोशल मीडियावर या पुतळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. एएनआयने पोस्ट केलेल्या फोटोला 7 हजारांहून जास्त लाईक्स आणि हजारांहून जास्त शेअर आणि रिट्विट्स मिळाले आहेत. या पुतळ्याची माहिती कळाल्यानंतर अनेकांनी वडिलांना फोन करून प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ पुतळा बनवण्याची कल्पना आवडल्याचं सांगितलं.
अनेकांनी पुतळा कुठून बनवून घेतला. किती वेळ लागला, किती खर्च आला, असे तपशीलही विचारल्याचं अनुशा सांगते. हाच प्रश्न जेव्हा बीबीसीने श्रीनिवास यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, "माझी जीवनसोबती माधवी हिच्यासाठी मी कितीही पैसे मोजू शकतो. ती माझ्यासाठी अमूल्य आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)