You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तर कंत्राटदाराला देशद्रोही ठरवून फौजदारी कारवाई #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1.काम निकृष्ट केल्यास कंत्राटदाराला देशद्रोही ठरवून फौजदारी कारवाई
कामात त्रुटी अथवा दर्जा निकृष्ट आढळल्यास कंत्राटदारास देशद्रोही ठरवतानाच त्याच्यावर फौजदारी करण्याचा निर्णय राज्य सरकरने घेतला आहे. पण याचवेळी ज्याच्यावर या कामाच्या देखरेखीची जबाबदारी असते, त्या सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांना मात्र नामनिराळे ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, तीन हजार कोटींची बिले अडकली असताना त्यातील एकही रुपया न दिलेल्या सरकारने हा नवा नियम करून छोट्या कंत्राटदारांना संपवण्याचा घाट घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
राज्यात साडे तीन लाख छोटे कंत्राटदार आहेत. त्यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्यातील विविध कामे होतात. या कंत्राटदारांना बाजूला करण्यासाठी सर्वच कामे बड्या कंत्राटदारांना देण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी घेण्यात आला. यामुळे बडे कंत्राटदार निविदा भरतात आणि ते अशा छोट्या कंत्राटदाराकडून कामे करून घेतात. ज्यातून ते वरच्या वर लोणी खातात. या कठीण स्थितीतून सावरत असतानाच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने ३० जुलै रोजी एक परिपत्रक काढले आहे. यामध्ये राज्यातील छोट्या कंत्राटदारांना अनेक जाचक अटी व नियम लावण्यात आले आहेत. दर तीन वर्षानी नामनोंदणी करण्याचा नवा नियम करण्यात आला आहे.
या नियमामुळे राज्यातील कंत्राटदारामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने हे परिपत्रक तातडीने मागे घ्यावे यासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने दिला आहे.
2. पवार कुटुंबीयांमध्ये वाद नाही- जयंत पाटील
पवार घराण्यात कोणताही वाद नाही, विरोधकांनी बाऊ करू नये असं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पवार साहेब आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. प्रत्येकाच्या बाबतीत सूचना, आदेश देण्याचा पूर्ण अधिकार आहे. पार्थ त्यांच्या घरातलाच आहे. पवारसाहेब जे बोलतीत ते सूचनावजा सल्ला ते पाळतील. विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा उरलेला नाही. म्हणून विरोधी पक्ष टीका करत आहेत असं पाटील यांनी सांगितलं. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
3. सोने, चांदीच्या दरात घसरण
कोरोना लशीसंदर्भात सकारात्मक बातम्यांनंतर जगभरातील शेअर बाजारात उसळी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात खरेदी वाढली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला असून दरात घसरण झाली आहे. 'झी न्यूज'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती 5 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात घसरल्या आहेत. या वृत्तसंस्थेच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीमध्ये सात वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरून 1921 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या आहेत.
गेल्या चार दिवसांत ६००० रुपयांची घसरण झाली आहे. आज पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. आज दिल्लीच्या स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमती १५०० रुपयांनी खाली आल्या. काही दिवसांपूर्वी सोन्याची किंमत ५६ हजार रुपयांवर पोहोचली होती, पण आजच्या घसरणीनंतर पुन्हा ते प्रति १० ग्रॅम ५० हजारांची खाली आली आहे. काल सोने दरात ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. आजही अडीच टक्के सोने खाली आले आहे. आज चांदी देखील प्रतिकिलो चार हजार रुपयांच्या घसरणीसह बाजाराला सुरुवात झाली. चांदी ६३ हजार रुपये प्रति किलोच्या खाली किंमत आली आहे. याआधी चांदीचा दर ७६ हजार रुपये किलोचा भाव होता. हा विक्रमी दर होता. मंगळवारी चांदी १२ टक्क्यांनी घसरली.
4.जलसंधारणाचा गडकरी पॅटर्न नीती आयोगाने स्वीकारला
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विदर्भातील दोन जिल्ह्य़ात महामार्गाच्या बांधकामादरम्यान राबवण्यात आलेला जलसंधारण पॅटर्न नीती आयोगाने स्वीकारला असून आता तो संपूर्ण देशात राबवण्याची शिफारस विविध राज्यांना करणार आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
विदर्भातील वर्धा आणि बुलढाणा जिल्ह्य़ात हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला. त्याबद्दल आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गडकरी यांचे एका पत्राद्वारे कौतुकही केले आहे.
वर्धा जिल्ह्य़ात तामसवाडा या आदिवासी गावात खडकाळ जागेवर खड्डे करून. यातील मुरुम आणि माती महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात आली होती. तसेच नदीनाल्यांचे खोलीकरण करून त्यातील माती, वाळूचाही वापर करण्यात आला होता. पावसाळ्यात खड्डय़ामध्ये पाणी साचले तर नदी नाल्यांमध्ये खोलीकरणामुळे मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आणि आसपाासच्या नैसर्गिक जलस्रोतांचा पाण्याचा स्तर वाढला. परिणामी पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले.
राज्यात विदर्भाच्या नागपूर विभागात ३४ प्रकल्प, कोकणच्या मुंबई विभागात ३ प्रकल्प, पुणे विभागात ५ प्रकल्प तर मराठवाडय़ाच्या औरंगाबाद विभागात १८ प्रकल्प बुलढणा पॅटर्ननुसार राबवले जात आहे.
असा आहे गडकरी पॅटर्न
महामार्गासाठी लागणारी माती व मुरूम उपलब्ध व्हावा म्हणून रस्त्यालगतच खड्डे खोदणे व त्यातील मुरूम घेणे तसेच नदी व नाल्यांचे खोलीकरण करून त्यातून माती काढून ती महामार्गासाठी वापरणे. केलेल्या खड्डय़ात व खोलीकरणामुळे नद्या व नाल्यांमध्ये पावसाळ्यात पाणीसाठा वाढत असल्याने परिसरातील नैसर्गिक जलस्रोतात वाढ होते व त्यामुळे पाणी टंचाईवर मात करता येते व शेतीलाही पाणी मिळते.
5.काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं निधन
काँग्रेस प्रवक्ते आणि नेते राजीव त्यांगी यांचं बुधवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. राजीव त्यागी यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना त्याच परिस्थितीत गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक ठिकाणी राजीव त्यागी यांनी काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडली होती. 'जनसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
सकाळपासून त्यांची प्रकृती चांगली होती. याव्यतिरिक्त संध्याकाळी पाच वाजता त्यांनी एका हिंदी खासगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर घरी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)