You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भगवान राम यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या प्राध्यापकांविरोधात तक्रार
- Author, दिलीप कुमार शर्मा
- Role, गुवाहटीमधून बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
आसाम विद्यापीठातील इंग्रजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक अनिंद्य सेन यांच्याविरोधात सिल्चर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
भगवान राम यांच्याविरोधात अवमानास्पद टिप्पणी करुन धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवल्याचे सांगितले जात आहे.
5 ऑगस्ट रोजी प्राध्यापक सेन यांनी फेसबूकवर भगवान रामाने त्यांची पत्नी सीतेला त्यागण्यासंदर्भात एक पोस्ट लिहिली होती.
आपल्या चार ओळींच्या पोस्टमध्ये त्यांनी हिंदीमध्ये लिहिलं होतं, 'यह सब नाटक एक आदमी के लिए है जिसने अपनी पत्नी को छोड़ दिया था.'
त्यांच्या पोस्टच्या शेवटच्या वाक्यात भगवान राम यांचं नावही लिहिलं होतं. त्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला होता.
प्रा. सेन यांनी सोशल मीडिया पोस्टमधून अवमानजनक टिप्पणी करुन हिंदूधर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
सेन यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान, गृहमंत्री यांनी घटनात्मक पदाचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे.
पोलिसांनी सेन यांच्याविरोधात भादंविच्या 295 अ, 294 अ, 501 या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
सेन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवणारे रोहत चंदा म्हणतात, "5 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात शांततामय पद्धतीने राममंदिर भूमिपूजन सोहळा साजरा केला जात असताना या प्राध्यापकांनी अशांतता पसरवून धार्मिक दंगलीसाठी समाजाला उचकण्याचा प्रयत्न करणारी पोस्ट केली."
सिल्चर येथील गुरुचरण कॉलेजमध्ये शिकणारे रोहित अभाविपच्या सिल्चर विभागाचे प्रमुख आहेत.
याबद्दल बोलताना ते बीबीसीला म्हणाले, "प्रा. सेन गेल्या काहीकाळापासून अशाप्रकारच्या पोस्ट करत होते. केंद्रीय विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी असं करणं योग्य नाही. त्यांनी सरकारविरोधातही टिप्पणी केली आहे. तुम्हाला सरकारमध्ये असेलला राजकीय पक्ष आवडत नसेल पण एखाद्या धर्माविरोधात अवमानजनक गोष्टी करणं कसं बरोबर असू शकेल? प्राध्यपक सेन यांनी श्रीरामांच्या जीवनाला अपमानास्पद संदर्भातून लिहिलं आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या."
बंजरंग दलाचे कार्यकर्ते स्नेहांग्शु चक्रवर्ती यांनीही सेन यांच्याविरोधात एफआयआऱ नोंदवल्याचे सांगितले.
कछार जिल्ह्याचे पोलीस आधीक्षक भंवरलाल मीणा यांनी प्रा. सेन यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, "प्रा. सेन यांनी केलेल्या फेसबूक पोस्टसंदर्भात हे प्रकरण आहे. धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवली गेली आहे. यासंद्रभात तपास सुरू आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)