केरळ विमान अपघातः कोळीकोडच्या हॉस्पिटलबाहेर कुणी दिलासादायक बातमीची, तर कुणी मृतदेहाची वाट पाहतोय...

केरळ अपघात
फोटो कॅप्शन, या रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.
    • Author, मुहम्मद साबिथ
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

कोळीकोडमधील बहुतांश मोठ्या हॉस्पिटलमध्ये सध्या शोकाकुल वातावरण आहे.

विमान अपघातातील जखमींवर मुख्यत: कोळीकोडमधील MIMS हॉस्पिटल आणि बेबी मेमोरियल हॉस्पिटल (BMH) मध्ये उपचार सुरू आहेत.

या सर्व हॉस्पिटल्सच्या बाहेर अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनीही गर्दी केलीय. आपल्या नातेवाईकाला किरकोळ दुखापत झाल्यानं काहीसे हायसं वाटून बसलेले कुटुंबीयसुद्धा इथे आहेत आणि आपल्या नातेवाईकाचा या अपघातात जीव गेल्यानं त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी थांबलेले कुटुंबीय सुद्धा आहेत.

काही कुटुंबीयांना तर अजून त्यांच्या नातेवाईकाच्या आरोग्याबाबत नेमकी काय स्थिती आहे, हेच कळलं नाहीय.

अपघातात अनेकजण जखमी झाले आणि परिणामी रक्ताचीही गरज भासली. त्यामुळे रक्तदानासाठी आलेल्यांची गर्दीही हॉस्पिटलबाहेर दिसून येते.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, "MIMS हॉस्पिटलमध्ये 35 जणांवर उपचार सुरू आहेत आणि BMH हॉस्पिटलमध्ये 25 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, MIMS मध्ये उपचार घेणाऱ्या चार, तर BMH मधील दोन प्रवाशांना मृत घोषित करण्यात आले आहे."

उपजिल्हाधिकारी हिमा यांच्याकडे MIMS मध्ये भरती करण्यात आलेल्या प्रवाशांची जबाबदारी देण्यात आली आहे. हिमा यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "MIMS हॉस्पिटलमध्ये 39 प्रवाशांना भरती करण्यात आलं होतं. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, आणखी चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे."

ज्या प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली. सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, अशीही माहिती हिमा यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अब्दुल रेहमान यांच्याकडे बेबी मेमोरियल हॉस्पिटल (BMH) मध्ये भरती करण्यात आलेल्या प्रवाशांची जबाबदारी आहे. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "28 प्रवाशांना उपचारासाठी BMH मध्ये दाखल करण्यात आलं. त्यातील दोघांचा आधीच मृत्यू झाला होता."

बेबी मेमोरियल हॉस्पिटल

एका प्रवाशाला बेबी मेमोरियल हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आल्याची माहिती रेहमान यांनी दिली.

तसंच, BMH मध्ये आता एकूण 25 जण उपचार घेत आहेत आणि त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती रेहमान यांनी बीबीसीला दिली.

कुणी दिलासादायक बातमीची, तर कुणी मृतदेहाची वाट पाहतोय...

करुणाकरन वरियथ हे मूळचे मलप्पुरम जिल्ह्यातील आहेत. ते आणि त्यांच्या कुटुंबातील आणखी एकजण MIMS हॉस्पिटलबाहेर उभे होते. त्यांचा पुतण्या सुधीर वरियथ हा अपघातग्रस्त विमानात होता. सुधीरचा या अपघातात मृत्यू झाला.

सुधीरच्या नातेवाईकांच्या माहितीनुसार, विमान अपघातानंतर ज्यावेळी सुधीरला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि कोरोना चाचणी केली गेली, तेव्हा तो पॉझिटिव्ह आढळला.

आता सुधीरचे नातेवाईक त्याच्या अंत्यसंस्काराबाबतच्या प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. मात्र, सुधीर ज्यावेळी दुबईतून निघाला होता, त्यावेळी त्यानं कोरोना चाचणी केली होती आणि तो निगेटिव्ह आला होता, असं सुधीरच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

केरळ विमान अपघात

फोटो स्रोत, SN RAJEESH

46 वर्षीय सुधीर दुबईतील मल्टिनॅशनल कंपनीत अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची नोकरी गेली.

सुधीर अत्यंत सभ्य आणि कुटुंबवत्सल माणूस होता, असं त्याचे काका करुणाकरन सांगत होते. सुधीरला कुणी भावडं नाहीत. त्याच्या पश्चात आता त्याची पत्नी, आई आणि दोन मुलं (पाच आणि दहा वर्षांची मुलं) आहेत.

आखाती देशांमध्ये सुधीरनं वीस वर्षांहून अधिक काम केलंय. यातील 15 वर्षांचा कालावधी जवळपास दुबईतच घालवला आहे.

MIMS हॉस्पिटलमध्येच विमानात जखमी झालेलं एक जोडपं भरती आहे. खादिजा नसरीन (वय 24 वर्षे) आणि तिचा पती इरफान (वय 28 वर्षे) अशी या जोडप्याची नावं आहेत. मलप्पुरममधील पोण्णानी येथील हे जोडपं आहे.

खादिजा आणि इरफानचे नातेवाईक हॉस्पिटलच्या बाहेर उभे आहेत. खादिजा आणि इरफान यांना नेमकी किती दुखापत झालीय आणि आता त्यांची प्रकृती कशी आहे, याची नातेवाईकांना काहीच माहिती दिली गेली नाहीय.

खादिजा कोरोनाचा प्रसार होण्याच्या काही दिवस आधीच म्हणजे मार्च महिन्यात दुबईत गेली होती. इरफान आधीपासूनच म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून दुबईत काम करत होता, अशी माहिती खादिजाचा चुलत भाऊ सिराजनं दिली.

खादिजा आणि इरफानच्या प्रकृतीची आताची स्थिती काय आहे, हे तरी प्रशासनानं आम्हाला सांगावं, असं त्यांचं म्हणणं आहे.

"हॉस्पिटल प्रशासनानं काही नातेवाईकांना आत जाण्यास परवानगी दिली. मात्र, आत गेलेले नातेवाईक अजून बाहेर आले नाहीत. खादिजा आणि इरफानची प्रकृती कशी आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे," असं भावनिक स्वरात सिराज सांगत होता.

स्वयंसेवक

प्रशासनातील अधिकारी, पोलीस, कुटुंबीयांबरोबरच अनेक स्वयंसेवक मदतीला आले आहेत.

केशवन नंबुद्री (56) हे गणिताचे शिक्षक नुकतेच सरकारी शाळेतून निवृत्त झाले आहेत. जखमींवर उपचार करताना रक्ताची गरज आहे हे लक्षात आल्यावर ते तात्काळ रुग्णालयात रक्त देण्यासाठी आले आहेत.

त्यांची मुलगी तीर्था राज (19) आणि अक्षय राज (25) सुद्धा त्यांच्याबरोबर रुग्णालयात आले. त्यांनीही रक्तदान केले आहे.

विमानतळ यंत्रणेवर दोषारोप

या अपघातासाठी काही लोकप्रतिनिधी विमानतळ प्रशासनावर दोषारोप करत आहेत.

विमानतळाची स्थिती सुधारण्यासाठी विमानतळ प्रशासन, विमानतळाचे संचालक पुरेसे लक्ष देत नव्हते असे मत कोळीकोडचे खासदार के. मुरलीधरन यांनी व्यक्त केले आहे.

केरळ विमान अपघात

फोटो स्रोत, ARUNCHANDRA BOSE

ते म्हणाले, विमानतळ प्रशासन स्थानिक खासदारांना सहकार्य करत नाहीत.

मुरलीधरन भारताच्या 'सिव्हिल एव्हिएशन कन्सलटेटिव्ह कमिटी'चेही सदस्य आहेत. मी संचालकांना स्वतः भेटलो तेव्हाही ते विमानतळाच्या गरजांबद्दल बोलायला तयार नव्हते असं मुरलीधरन म्हणाले.

याबाबत विमानतळ प्रशासनाला वारंवार फोन करुनही बीबीसी हिंदीला प्रतिसाद मिळाला नाही.।

हे वाचलंत का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)