केरळच्या मुन्नारमध्ये भूस्खलन, आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

केरळमधल्या पर्यंटकांचं आकर्षण असणाऱ्या मुन्नारमध्ये भूस्खलन झाल्यामुळे किमान 16 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय.

अजूनही 60 व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत 12 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे.

केरळच्या सरकारने बचावकार्यात वायूसेनेची मदत घेतली आहे. पण गावाला जोडणारा पूल आणि रस्ता वाहून गेल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

मुन्नारमधल्या राजामाला या गावात ही घटना घडली आहे. अनेक जण अजूनही चिखलमातीखाली अडकलेले आहेत, अशी माहिती केरळचे महसूलमंत्री ई. चंद्रशेखरन यांनी दिली.

"त्या भागापासून जवळ असणाऱ्या काही वनाधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केलंय. पण रस्ता वाहून गेल्याने या कामात अडथळे येत आहेत," केरळ पोलिसाच्या जनसंपर्क विभागाचे उपसंचालक व्ही. पी. प्रमोद कुमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

राजामाला भागात बहुतांश आदिवासी लोकांची वस्ती आहे. संपूर्ण पश्चिम घाटात जोराचा पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे केरळ आणि कर्नाटकातल्या अनेक भागात भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)