भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक यांनी केली आत्महत्या, अभिनेते समीर शर्मांपाठोपाठ दुसरा धक्का

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

(सूचना : - आत्महत्या हे एक गंभीर पाऊल असून ती नक्कीच टाळता येऊ शकतं. यासाठी आपण मानसशास्त्रज्ञांकडून मदत मिळवू शकता. त्याचबरोबर टेलिफोन हेल्पलाईनचा वापर करून मदत घेऊ शकता.1800120820050 किंवा 18001024040 या क्रमांकावर तुम्ही मदत मागू शकता. )

अभिनेता सुशांत सिंह राजपूत, मराठी अभिनेता आशुतोष भाकरे, हिंदी मालिकांमधला अभिनेता समीर शर्मा यांच्यानंतर भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतल्या दहिसर इथे राहत्या घरी गळफास लावून अनुपमा यांनी आत्महत्या केली.

कालच लोकप्रिय टीव्ही अभिनेते समीर शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या मुंबईतल्या मालाड इथल्या घरी सापडला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

दोन महिन्यात चार सिनेतारकांच्या आत्महत्या

बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुशांस सिंह राजपूत यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर देशभरात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

या चर्चा सुरू असतानाच मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख यांचे पती आणि अभिनेते आशुतोष भाकरे यांच्या आत्महत्येची बातमी आली.

त्यांच्यानंतर आता भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठक यांनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली. दोन महिन्यात सिनेजगतातल्या चार ताऱ्यांनी आपलं जीवन संपवल्याने देशात खळबळ माजली आहे.

मुळात म्हणजे अनुपमा यांनी आत्महत्येपूर्वी काही दिवस आधी फेसबुक लाईव्ह करत त्यात आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर गुडबायची वेगळी पोस्टही केली होती. ही त्यांची शेवटची पोस्ट ठरली.

सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येची दोन कारणं नमूद केली आहेत. ज्याचा पोलीस आता तपास करत आहेत. पहिलं म्हणजे, मित्रानं दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांनी एका कंपनीत १० हजारांची गुंतवणुक केली होती.

कंपनी त्यांचे पैसे व्याजासकट मागील वर्षी डिसेंबरमध्ये देणार होती. मात्र, आता ती कंपनी माझे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहलं आहे. तर, एका व्यक्तीनं लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांची बाईक घेतली होती. तेव्हा त्या त्यांच्या मुळ गावी होत्या. जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्या व्यक्तीने त्यांची दुचाकी देण्यास नकार दिला, असं दुसरं कारण त्यांनी सुसाइट नोटमध्ये लिहलं आहे.अनुपमा यांच्या घरात मिळालेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतच घरात मृतावस्थेत आढळलेले समीर शर्मा यांनी यापूर्वी टीव्ही मालिकांमध्ये अनेक भूमिकांमध्ये काम केलं आहे.

टीव्ही मालिकांमध्ये काम

44 वर्षीय समीर शर्मा यांनी 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कहानी घर-घर की', 'ये रिश्ते है प्यार के' या गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मुंबई पोलिसांमधल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री समीर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला.

ते राहत असलेल्या इमारतीच्या वॉचमनला त्यांच्या किचनच्या खिडकीतून त्यांचा मृतदेह दिसला. त्यानंतर वॉचमनने इमारतीतल्या इतरांना ही माहीती दिली.

सोसायटीच्या लोकांनी याबद्दल पोलिसांना कळवलं. पोलिसांनीही लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जिथे समीर यांना मृत घोषित करण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फेब्रुवारीपासूनच समीर आपल्या घरात एकटे राहत होते. पोलीस सध्या समीर यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडीस सांगतात की, "त्यांच्या घरात कोणतीच सुसाईड नोट मिळालेली नाही. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी अशी आम्हाला शंका आहे. त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा झाल्यावर अधिक माहीती मिळू शकेल. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत."

समीर शर्मा हे मूळचे दिल्लीला राहणारे आहेत. त्यांनी बंगळुरूमधून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. शिक्षणानंतर त्यांनी एका अॅडव्हर्टायझिंग कंपनीत काम केलं होतं. 2003मध्ये ते मुंबईत आले आणि त्यांनी आपल्या अभिनयाच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)