पाकिस्तान : मशिदीवर उभा राहिलेला गुरुद्वारा का ठरत आहे वादाचं केंद्र?

    • Author, शुमायला जाफरी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, पाकिस्तानहून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पाकिस्तानमध्ये लाहौर इथल्या नौलखा बाजार परिसरात असलेल्या गुरुद्वारा 'शहीदी स्थान भाई तारू जी' संदर्भात एक व्हीडिओ भारतात सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

सोहैल बट्ट नावाचा माणूस शीख धर्मीय लोक आणि पाकिस्तानातील त्यांच्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह बोलत असल्याचं व्हीडिओत दिसत आहे.

व्हीडिओत एक अज्ञात माणूस काही प्रश्न विचारतो. त्याला उत्तर देताना सोहैल बट्ट म्हणतो, "शीख धर्मीय मशिदीच्या बाजूला असलेल्या जमिनीवर डोळा ठेऊन आहेत. ती जमीन त्यांची आहे याचा त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही."

सोहैल बट्ट लाहौर शहरातल्या नौलखा बाजार इथल्या शहीदी स्थान भाई तारु जी जवळचा ऐतिहासिक गुरुद्वारा शहीद गंजच्या जवळच्या जमिनीविषयी बोलत आहे. शीख धर्मीयांसाठी ही अतिशय पवित्र जागा आहे कारण 1745 मध्ये भाई तारू यांची याठिकाणी हत्या करण्यात आली होती.

त्या व्हीडिओत सोहैल बट्ट दावा करताना दिसतात. ते म्हणतात की, ती जमीन जवळच्याच एका मशिदीची आहे. मदरसा उभारण्यासाठी त्यांनी ती देण्यात आली आहे.

इतिहास काय सांगतो?

पाकिस्तानातील एक नामवंत इतिहासकारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की अठराव्या शतकाच्या सुरुवातीला या जागी मशीद होती, मुघलांच्या काळात ती बांधण्यात आली होती.

शीखांनी या जागेवर कब्जा केला तेव्हा याच परिसरात शीख योद्धा भाई तारू सिंह यांच्या स्मरणार्थ गुरुद्वारा उभारण्यात आला. मुघल गव्हर्नरांच्या हातून भाई तारु सिंह यांचा मृत्यू झाला.

पंजाब प्रांतावर इंग्रजांनी कब्जा केला तेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेलं. परंतु प्रत्यक्षात हा गुरुद्वाराच राहिला.

1940 मध्ये भारतातील सगळ्यांत मोठ्या ब्रिटनच्या न्यायालयाने अर्थात प्रीव्ही काऊंसिलने शीख समाजाच्या बाजूने निर्णय दिला. ती जमीन आणि गुरुद्वाराचा अधिकार शीखांकडेच राहिला. न्यायालयाने सांगितलं की अनेक वर्षं ही वास्तू गुरुद्वाराच होती. त्यादरम्यान मुसलमानांनी जागेवर किंवा वास्तूवर दावा सांगितला नाही.

फाळणीनंतरही हे प्रकरण वादग्रस्तच राहिलं. 1988 साली सबळ पुराव्यांअभावी ही जमीन गुरुद्वाराची असल्याचा निर्णय लाहौरच्या उच्च न्यायालयाने दिला होता.

आजही या जागेची जबाबदारी इवैकुई ट्रस्ट प्रॉपटी बोर्डाकडे आहे. बोर्डाने सोहैल बट्ट यांचे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत.

शीख समाजाचं काय म्हणणं?

या घटनेमुळे जगभरातील शीख बांधव दु:खी आहेत आणि त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, असं शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष सतवंत सिंह यांनी फेसबुकरच्या व्हीडिओत म्हटलं आहे.

सोहैल बट्ट यांचा व्हीडिओ पाकिस्तान सरकारच्या धोरणाविरुद्ध आहे आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा दृष्टिकोन शांतता आणि बंधुभाव जोपासणारा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या मते ही घटना एका व्यक्तीपुरती मर्यादित आहे आणि हा जमीन बळकावण्याचा प्रकार आहे.

सतवंत सिंह म्हणाले, "मशिदीच्या लगत जमिनीची तुकडा आहे जो शीखांचा आहे. मात्र काही लोक या जमिनीवर कब्जा करू पाहत आहेत. आम्ही हे कधीही सहन करणार नाही. परंतु याविरोधात आम्ही काही केलं तर शीख आणि मुसलमान यांच्यातील बंधूभावाला ठेच लागेल."

सतवंत सिंह यांनी इवैकुई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे चेअरमन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांचं अन्य संस्थांच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे.

अल्पसंख्याकासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शांततेच्या धोरणाविरोधात तसंच शीख आणि मुसलमान यांच्यातील संबंधांना तडा देणाऱ्या लोकांविरुद्ध शीख समाज उभा राहील असं ते म्हणाले.

सतवंत सिंह म्हणाले, "शीख समाजासाठी पाकिस्तान सरकार आणि प्रशासनातर्फे काय प्रयत्न केले जात आहेत हे लक्षात घ्यायला हवं. वादग्रस्त व्हीडिओ एका माणसाने बनवला आहे, आपण त्या व्यक्तीचा बीमोड करू शकतो परंतु हे आपल्या मूल्यांच्या विरोधात आहे."

ते पुढे म्हणाले, आम्हाला असं वाटतं सरकारने हे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळावं. कायदा हातात घेण्याची शीख समाजाची इच्छा नाही.

अटकेची मागणी

इवैकुई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे प्रवक्ते आमिर हाश्मी यांनी बीबीसीशी बोलताना ही जमीन गुरुद्वाऱ्याची असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. वास्तूची देखभाल बोर्डाकडेच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बोर्डाने पोलीस आणि केंद्रीय तपास संस्था एफआयएला पत्र लिहिलं आहे. लाहौरमध्ये राहणाऱ्या सोहैल बट्ट नावाच्या माणसाने व्हीडिओ तयार केला असून हा पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

बोर्डाचे सचिव सनाउल्लाह खान यांनी पत्र लिहून हा व्हीडिओ म्हणजे शीख समाज आणि पाकिस्तान सरकाराविरुद्ध तथ्यहीन प्रोपगंडा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.

पत्रात म्हटलं आहे, 'करतारपूर कॉरिडॉर यशस्वी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रशंसा झाली. पाकिस्तानविरोधी देश पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत.'

सोहैल बट्ट आणि त्याचे सहकारी ऐतिहासिक गुरुद्वाराविरुद्ध लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारतीय प्रसारमाध्यम याचा वापर करून घेत आहेत, असं सनाउल्लाह खान यांनी पत्रात म्हटलं आहे.

सोहैल बट्ट आणि त्याच्या साथीदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

अजूनही सोहैल बट्ट याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

भारताला काळजी कसली?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांना याप्रकरणाविषयी विचारलं असता ते म्हणाले, "भारताने याप्रकरणी पाकिस्तानकडे कठोर विरोध दर्शवला आहे. शीख धर्मीयांसाठी हा गुरुद्वारा श्रद्धेय ठिकाण आहे. त्यांच्यासाठी ही पवित्र जागा आहे. भारतासाठी ही घटना चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानात शीख समाज अल्पसंख्याक आहे. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी जोर धरते आहे."

भारताने याप्रकरणी पाकिस्तानकडे कठोर शब्दात चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणाचा लवकरात लवकर तपास व्हावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी पाकिस्तानकडे मागणी केली आहे, असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.

अल्पसंख्याकाची सुरक्षा, त्यांचं राहणीमान सुधारावं, त्यांच्या धार्मिक हक्कांचं रक्षण व्हावं आणि त्यांचा सांस्कृतिक वारसा जपला जावा अशी मागणी पाकिस्तानकडे केल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)