चंद्रकांत पाटील: महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचे भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले संकेत

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली.
प्र. चंद्रकांत पाटील तुम्ही नुकतंच एक विधान केलं ज्यामुळे तुमचं नाव सध्या चर्चेत आहे. राज्याच्या हितासाठी सत्तेत जावं लागलं तर आम्ही शिवसेनेसोबतसुद्धा जायला तयार आहोत, असं तुमचं विधान आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच म्हटलं आहे की असा प्रस्ताव शिवसेनेकडून आलेला नाही किंवा आम्ही त्यांना दिलेला नाही. त्यामुळे याबद्दल चर्चा करण्यात अर्थ नाही. पण तुम्हाला अजूनही वाटतंय का की शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता आहे? शिवसेनेबाबतच्या तुमच्या अजूनही अपेक्षा आहेत का?
चंद्रकांत पाटील : आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काल आमच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये असं म्हटलं की यापुढे एकट्याने राज्य आणण्याच्या तयारीला लागा. त्या कंटीन्युएशनमध्ये मी असं म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
प्र. म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ असा घ्यायचा का की यापुढे महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेसोबतच काय इतर कुणाहीसोबत निवडणुका लढणार नाही?
चंद्रकांत पाटील : कुणाबरोबरही लढणार नाही, असं नाही. आधीच आमचे चार मित्रपक्ष आमच्यासोबतच आहेतच. रासप आमच्याबरोबर आहे, आरपीआय आमच्याबरोबर आहे, रयत आमच्याबरोबर आहे, शिवसंग्राम आमच्यासोबत आहे.
त्यामुळे आम्ही असं म्हटलेलं नाही की आम्ही कुणाबरोबरही निवडणूक लढणार नाही. पण वर्षानुवर्ष बाकीचे घटकपक्ष असले तरी ते नाममात्र असायचे. मुख्य शिवसेना, भाजप असायची. यापुढे आम्ही शिवसेना-भाजपा युतीमध्ये लढणार नाही.
ज्या युतीमध्ये शिवसेना आमच्या सगळ्या यंत्रणेचा फायदा घेते, मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा फायदा घेते, मोदीजींनी केलेल्या कामाच्या आधारे तुमचे लोक निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर मात्र, वेगळं काहीतरी करतात, हे आम्ही चालवून घेणार नाही. पण, आता निवडणुकीला चार वर्ष आहेत. तोपर्यंत समजा सरकार येणार असेल, केंद्र म्हणणार असेल, योग्य प्रस्तावासह केंद्राकडून सूचना येणार असेल तर आम्ही सहभागी होऊ. हे जर-तर आहे.
प्र. याचा अर्थ तुम्हाला असं वाटतंय की निवडणुका सोबत नसल्या तरी शिवसेना-भाजप पोस्ट पोल अलायंस करू शकते. प्रि-पोल अलायंसमध्ये नाही.
चंद्रकांत पाटील : हो, हो. अगदी बरोबर.
प्र. शिवसेना हा भाजपचा महाराष्ट्रात मित्र आहे, प्रतिस्पर्धी आहे की शत्रू आहे? आता तुमचं शिवसेनेसोबतच रिलेशनशिप स्टेटस नेमकं काय आहे, हे स्पष्ट होत नाहीय.
चंद्रकांत पाटील : 25-30 वर्ष युती ज्यावेळेला होती त्यावेळी आम्ही मित्र होतो. 2014 ला युती तुटली त्यावेळेला आम्ही एकमेकांचे शत्रू झालो. पुन्हा सरकार आलं, आम्ही एकमेकांचे मित्र झालो.

फोटो स्रोत, facebook
2019 ला मित्र म्हणून लढलो आणि आता एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत. कारण त्यांनी त्यांची वाट वेगळी ठरवलेली आहे. त्यामुळे आम्ही सोयीप्रमाणे वाट ठरवू, असं काही चालणार नाही.
प्र: म्हणजे भविष्यात ते पुन्हा मित्र होऊ शकतात, पोस्ट पोल मैत्री होऊ शकते, असं तुम्हाला वाटतंय.
चंद्रकांत पाटील : हे बघा, मी आता जरी हे म्हणत असलो की यापुढे आम्ही निवडणूक वेगळी लढणार आहोत, स्वतःच्या ताकदीवर लढणार आहोत. पण, राजकारणामध्ये जी गोष्ट आज म्हटली ती चार वर्षांनी असेल, असं नाही.
प्र: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना या त्यांच्याच मुखपत्राला दिलेली मुलाखत तुम्ही ऐकली असेल. त्यात ते म्हणाले होते की विरोधक पाडापाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच शरद पवार यांनी सीएनएन-आयबीएनला दिलेल्या मुलाखतीतही म्हटलं आहे की भाजप सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहिलं आहे की मध्यप्रदेश असेल, कर्नाटक असेल, राजस्थान असेल, या ठिकाणी ऑपरेशन लोटसची चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्यासाठी तुम्ही अॅक्टिव्हली प्रयत्न करत आहात का? प्रामाणिक उत्तर अपेक्षित आहे.
चंद्रकांत पाटील: तुम्हाला एवढी तर जाणीव आहे की ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांच्याकडे गुप्तहेर यंत्रणा असतात. तर मग अशाप्रकारचे सरकार पाडण्याचे प्रयत्न आयडेंटीफाय झाले असतील तर हवेत बाण मारण्यापेक्षा त्यांनी ओपन करावे. हे हवेत बाण मारणं चाललेलं आहे. राज्याचं गृहमंत्रीपद तुमच्याकडे आहे, राज्याचं मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आहे. कोण प्रयत्न करतंय?
फोन टॅपिंगमध्ये काही सापडलं का? पैशांचे काही व्यवहार झाले का? की नुसतं हवेतच गोळ्या मारायच्या. कार्यकर्त्यांना आणि प्रशासनाला विश्वास देण्याचा प्रयत्न चाललाय की हे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पडणार नाही. तुमच्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी आम्हाला कशाला ओढता? मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमध्येसुद्धा भाजप स्वतःहून कुणाला आमिष दाखवायला गेला नाही. त्या-त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या तरुण नेतृत्त्वाला आपलं भविष्य आता काँग्रेसमध्ये नाही, असं वाटलं.
प्र. भाजप स्वतःहून गेला नाही, असं तुम्ही कसं म्हणू शकता. कर्नाटकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार तुम्ही फोडले. त्यांना पुन्हा निवडून आणलं आणि तुम्ही म्हणताय की आम्ही त्यांच्या लोकांना आणलं नाही?
चंद्रकांत पाटील: फोडले या शब्दाशी मी सहमत नाही. फोडायला काही ती लहान पोरं नाहीत. ज्यांना ज्यावेळी आपल्या पक्षात आपलं भवितव्य नाही, असं जाणवतं. ज्योतिरादित्य शिंदे यांना जेव्हा जाणवतं की कमलनाथ आपली वाट लावणार आहे.
सचिन पायलटला जेव्हा जाणवतं की गहलोत तर आपल्याला संपवूनच टाकणार आहे. आता तुम्ही पाहाताय ना की पायलट यांच्या घरावर नोटीस चिकटवण्यापर्यंत मजल गेली. तर अशावेळी जर त्यांना वाटलं की या पक्षात आपलं भवितव्य नाही, वरचं नेतृत्व रोज काहीतरी नवीनच बोलतं आणि मोदी मात्रं पुढची 8-10 वर्ष या देशाला जागतिक स्तरावर उंचीवर नेणार आहे.
वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, राष्ट्रीय लक्ष्य, असं जर तरुणांना वाटलं. उद्या महाराष्ट्रातही एखाद्या तरुणाला वाटलं तर त्यात फोडाफोडीचा काय संबंध?
प्र : तुमच्या पक्षाचा जो कार्यक्रम झाला त्यात कार्यकर्त्यांशी बोलताना तुम्ही असं म्हटलं की चंपा असेल, टरबूज असेल, यासारखे अवमानकारक शब्द आपण खपवून घ्यायचे नाहीत आणि त्याविरुद्ध कारवाई करायची. याप्रकारची भाषा वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांसाठी सोशल मीडियावरून सर्रास वापरली जाते. तर तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सांगाल का की त्यांनी इतर राजकीय नेत्यांसाठीसुद्धा अशी भाषा वापरू नये.
चंद्रकांत पाटील : भाजप कार्यकर्त्यांनासुद्धा आमची सक्त ताकीद आहे की लोकशाहीमध्ये शब्द फार जपून वापरायचे असतात. महाराष्ट्राची परंपरा ही सांस्कृतिक परंपरा आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये पातळी सोडून काही चालणार नाही.
प्र. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल का?
चंद्रकांत पाटील: सध्या तरी आमचा तसा काही विचार नाही पण भविष्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असं मी सांगू शकत नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























