कोरोना महाराष्ट्र : पुण्यातल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊननं नेमकं काय साधलं?

फोटो स्रोत, Hindustan Times
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर पुण्यात नव्या अटी-शर्थींसह पुन्हा व्यवहार सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. पण या लॉकडाऊननं नेमकं काय साधलं, असा प्रश्नही लोक विचारत आहेत. कारण या काळातही पुण्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत जाताना दिसली.
मग या काळात पुण्यातील प्रशासनानं कोणती पावलं उचलली आहेत? किती बेड्स वाढवण्यात आले? ते पुरेसे आहेत का, याविषयी आम्ही जिल्हा प्रशासन आणि पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींकडून माहिती घेतली.
लॉकडाऊनमध्येही रुग्णसंख्या का वाढली?
13 जुलै ते 23 जुलै या कालावधीत पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला, पण या काळातही कोव्हिडग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत जाताना दिसला.
आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण रुग्णांची संख्या पाहिली तर 12 जुलैपर्यंत पुणे महापालिका क्षेत्रात 29048, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 6448 आणि उर्वरित पुणे जिल्ह्यात 3629 रुग्ण होते. 23 जुलैच्या संध्याकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, पुणे महापालिका क्षेत्रात 45446, पिंपरी चिंचवडमध्ये 14263 तर उर्वरित पुणे जिल्ह्यात 6809 अशी एकूण रुग्णसंख्या होती. म्हणजे लॉकडाऊनच्या दहा दिवसांत पुणे महापालिका क्षेत्रात 16,398 नवे रुग्ण समोर आले. ही संख्या पिंपरी चिंचवडमध्ये 7815 आणि उर्वरीत पुणे जिल्ह्यात 3180 एवढी आहे.

हे कशामुळे झालं असावं? पुणे जिल्ह्याचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव सांगतात, की यादरम्यान पुण्यात होत असलेल्या तपासण्यांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढलेली दिसते आहे.
"रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी लागण झालेल्या व्यक्तींना शोधणे, त्यांना वेगळे करणे ही महत्त्वाचं गोष्ट आहे. लॉकडाऊनमुळे आम्हाला अशा लोकांना शोधण्याची संधी मिळाली. कारण आधी अनेकजण नोकरीसाठी, कामासाठी बाहेर पडलेले असायचे, ते घरीच असल्यानं टेस्टिंग करणं सोपं झालं."
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, लॉकडाऊन हे मुळात कोव्हिडवरचं औषध नाही. " सोशल डिस्टंसिंग, मास्क घालणं असे प्रतिबंधात्मक उपाय लोक पाळत नाहीत त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क टाळण्यासाठी सक्तीनं लॉकडाऊन करावं लागतं. पण सात-आठ दिवसांच्या लॉकडाऊननं रुग्णसंख्येवर मोठा परिणाम दिसणार नाही. कारण कोरोना विषाणू शरीरात शिरला की, चौदा ते एकवीस दिवस राहतो. म्हणजे सलग अठ्ठावीस दिवस लॉकडाऊन झालं, कोरोनाची एक पिढी बाजूला केली तरच त्याचा परिणाम दिसू शकतो."
पुण्यात बेड्सची संख्या किती वाढवली आहे?
रुग्णांची संख्या वाढते तशी आवश्यक बेड्सची मागणी वाढते. पुण्यात गेल्या महिनाभरात हे दिसून आलं आहे. दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये प्रशासनानं विशेषतः पुणे शहरात बेड्सची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे.
सौरभ राव सांगतात, "साधारण नव्वद टक्के लोकांना सौम्य किंवा मध्यम लक्षणं असल्यानं कोव्हिड केअर सेंटरची क्षमता वाढवण्याची आवश्यकता होती, ते करण्यात आम्हाला यश आलं आहे. पुण्यात कोव्हिड केअर सेंटर्समध्ये चार हजार बेड्स वाढवले आहेत."
शासकीय यंत्रणेतील रुग्णालयांची क्षमताही वाढवली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. ससून हॉस्पिटलमध्ये बेड्सची क्षमता जुलै अखेरपर्यंत 220 वरून 870 पर्यंत वाढवली जाणार असून हे बहुतांश बेड्स ऑक्सिजन बेड्स असतील तर साधारण दीडशेपर्यंत आयसीयू विथ व्हेंटिलेटर बेड्स वाढवले जात आहेत.

अनेकांच्या मते ही क्षमता आणखी वाढवण्याची गरज आहे. जनआरोग्य आंदोलनाचे कार्यकर्ता डॉ. अभिजीत मोरे सांगतात, "गेल्या चार पाच दिवसांत बेड्सची क्षमता वाढवण्याचे प्रयत्न नक्कीच झाले आहेत. पण हे आधीच केलं असतं, तर लॉकडाऊनही करण्याची वेळ आली नसती. प्रशासनाचा अंदाज आणि त्यानुसारचं नियोजन यात असलेली तफावत आणि कमतरता जाणवली आहे."
"पुणे महानगरपालिकेचं कमला नेहरू हॉस्पिटल आहे, तिथला आयसीयू आठ वर्ष बंद आहे. तिथे सर्व सुविधा आहेत, पण स्टाफची कमतरता आणि काही तांत्रिक कारणांमुळे आयसीयू सुरू नाही. साथीच्या काळातही तो बंद आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे."
"पुणे शहरावर जिल्ह्याचाही भार पडणार हे स्पष्ट होतं, त्यादृष्टीनं तयारी व्हायला हवी होती," असं ते नमूद करतात.
मनुष्यबळाची कमतरता कायम?
प्रशासनानं बेड्सची संख्या वाढवली आणि खासगी डॉक्टर्सनाही कोव्हिड ड्युटीसाठी आवाहन केलं आहे. पण तरीही पुण्यात मनुष्यबळाची कमी जाणवत असल्याचं डॉ. भोंडवे नमूद करतात. "लॉकडाऊनचा दुसरा तिसरा टप्पा संपताना परराज्यातले कामगार परत गेले तशा पुण्यातल्या केरळी नर्सेस मोठ्या प्रमाणात गावी परत गेल्या. त्यामुळं अनुभवी आणि कुशल नर्सेसची कमतरता जाणवते आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेमडेसिव्हिरसारख्या औषधांचा साठाही आधीच आणखी वाढवायला हवा होता, ते होताना दिसत नाही."

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा- कोरोना झाल्यानंतर बरं व्हायला रुग्णाला किती वेळ लागतो?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?

मनुष्यबळाची कमतरता सौरभ राव यांनीही मान्य केली. प्रशासन नर्सिंग असोसिएशन्सशी बैठका घेऊन आता नर्सेस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते सांगतात.
"प्रत्येक गोष्टीची कमतरता आहे, त्यामुळे जबाबदारी अजून कायम आहे. आम्ही बेड्स वाढवले असं जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यामागे बेड्ससोबत साफसफाई, कर्मचारी, केटरिंग, वैद्यकीय आणि इतर कर्मचारी ही सगळी व्यवस्थाही उभी करावी लागते. बेड्स वाढवण्यात उशीर होण्याचं कारणही तेच आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की आपली सगळी ताकद अजून संपलेली नाही. कोव्हिड आजारग्रस्त आणि डॉक्टर्सना मानसिक आधाराची गरज लागली तर तीही सिस्टीम प पुण्यात उभी केली जात आहे."
टेस्टिंग, ट्रेसिंग आणखी वाढवण्याची गरज
गेल्या दहा दिवसांत प्रशासनानं पुण्यात बेड्स आणि तपासण्यांची संख्या वाढवली असली, तरी काँटॅक्ट ट्रेसिंग तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही आणि त्यामुळेच रुग्णसंख्या वाढते आहे, असं डॉ. भोंडवे यांचं निरीक्षण आहे.
"एक रुग्ण साधारण पंधरा ते वीस जणांना इन्फेक्ट करू शकतो. त्यामुळे तितक्या जणांची माहिती घेणं, प्रसंगी तपासणी होणं गरजेचं असतं. पण मी व्यक्तिशः पुण्यात पाहिलं आहे की, घरातल्या दोन-तीन व्यक्तींपलिकडे ते होत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
धारावीत तपासण्या केल्या तसं पुण्यातील काही भागात करण्याची गरज असल्याचंही ते सांगतात. डॉ. मोरे यांनाही स्टिंग ट्रेसिंगच्या बाबतीत पुणे महानगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडते आहे, त्यामुलेच पुण्यातली चेन ब्रेक होत नाहीये.
लॉकडाऊननं साधलं, ते पुणेकर पुन्हा गमावणार?
लॉकडाऊनच्या हा दिवसांत रुग्णसंख्या कमी झाली नसली, तरी काही प्रमाणात पुण्यातल्या सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. पण लोकांनी शिस्त पाळली नाही, तर परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाईल, अशी चिंता जाणकारांना वाटते.
"कालपर्यंत लॉकडाऊन होता पण आज सकाळी मी पाहिलं तर रस्त्यावर पूर्ण गर्दी आहे. मी साडेनऊ वाजता आणि बारा वाजता जंगली महाराज रोड, फर्ग्युसन रोडवरून गेलो तर पुण्यात साथ आहे की नाही असं वाटण्याइतकी गर्दी होती. सिग्नलला गर्दी, सगळीकडे दुकानं उभी आहेत, लोक शेजारी शेजारी उभे आहेत. माझ्या स्वतःच्या दवाखान्यात आलेल्या लोकांनाही मला सांगावं लागतं की अंतर ठेवून बसा. सोशल डिस्टंसिंग स्वतःहून पाळा, मास्क वापरा, मग रुग्णसंख्या कमी होईल हे निश्चित आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























