You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार यांच्या राम मंदिराविषयीच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
"काही लोकांना असं वाटत असेल की कदाचित मंदिर बांधून कोरोना जाईल आणि त्या भावनेनं त्यांनी हा कार्यक्रम घेतला असावा," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असं वेगवेगळ्या वृत्तपत्रात छापून आलं आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिल्याचं राम मंदिर न्यासानं म्हटलं आहे.
त्यावर आता शरद पवारांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. शरद पवार नेमकं काय म्हणाले, त्यांच्या विधानाचा अर्थ काय आहे, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले,
"कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं याचा निर्णय मी स्पष्टपणे घेत असतो. आम्हाला असं वाटतं की कोरोनामध्ये सापडलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं, त्या कामाला आपण प्राधान्य देऊ. काही लोकांना असं वाटत असेल की कदाचित मंदिर बांधून कोरोना जाईल आणि त्या भावनेनं त्यांनी हा कार्यक्रम घेतला असावा. कार्यक्रमाची कारणं मला माहिती नाही. पण, आमच्या दृष्टीनं आम्हाला कोरोना हे संकट महत्त्वाचं वाटतं."
ते पुढे म्हणाले, "कोरोनामुळे लॉकडाऊन आणि इतर गोष्टींचा संबंध अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्याची आम्हाला चिंता आहे. राज्य आणि केंद्र सरकारनं त्या गोष्टीत अधिक लक्ष घालावं असा आमचा आग्रह आहे. यामुळे आमचे सहकारी दिल्लीत याविषयी बोलणार आहोत आणि कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत."
शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचा पलटवार
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ट्वीट करत शरद पवार यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
"कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कोणत्या नाही, याचं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला भान आहे. कोरोना संपवण्यासाठी मोदी सर्वाधिक उपाययोजना करत आहेत. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, याचं निश्चित भान आहे. पण, आपल्या देवदैवतांचा आशीर्वादही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जर मंदिर बांधून देवाची उपासना करून कोरोना जाणार नसेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठ्ठलाच्या चरणी जाऊन कोरोना नष्ट कर असं म्हणालेत, यावर आपलं काय उत्तर राहिल?
"कोरोनाच्या काळात 1 लाख 70 हजार कोटींचं गरीब कल्याण पॅकेज आणि त्यानंतर २० लाख कोटींचं आत्मनिर्भर पॅकेज मोदींनी आणलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी कोरोना संकटाच्या काळात अर्थव्यवस्थेला सावरत आहेत.
शिवसेनेची भूमिका काय?
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या शिवसेनेबरोबर राज्यात सत्तेत आहे. शिवसेना आणि राम मंदिर यांचा पूर्वीपासूनचा संबंध आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राम मंदिराविषयी केलेल्या वक्तव्याची शिवसेनेची भूमिका आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण, शिवसेना नेत्यांनी याविषयावर प्रतिक्रिया देण्यास टाळलं.
पण, शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "आम्हाला निमंत्रण द्यायचं की नाही हा आयोजकांचा विषय आहे. प्रभू रामचंद्र हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे त्याला राजकीय रंग देण्याची गरज नाही. राम मंदिराच्या निर्माणासाठीचा पाया शिवसेनेनं रचला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि झाल्यावरही अयोध्याला गेले. त्यांनी शिवसेनेच्या वतीनं 5 कोटी रुपयांचा निधी राम मंदिराच्या निर्माणासाठी दिला. निमंत्रण आहे की नाही ते मला माहिती नाही. निमंत्रण आलं तर जायचं की नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील. आमचं प्रभू रामचंद्राशी थेट नातं आहे."
शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय?
शरद पवार हे भाजपपासून आपण वेगळे आहोत, असं सांगू पाहत असल्याचं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात.
ते म्हणाले, "ज्यावेळेस बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेस शरद पवार केंद्रात मंत्री होते. ते असो की दुसरे कोणतेही नेते असो, बाबरी मशीद पाडण्यापासून वाचवण्यात सगळ्यांना अपयश आलं. त्यानंतर मंग मुंबईत ज्या दंगली उसळल्या त्या नियंत्रणात आणण्यासाठी शरद पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं.
"आता राम मंदिर उभारणीचं राजकारण करू नका, अशी शिवसेनेची भूमिका आहे, तर आम्ही कोरोना निवारणाला प्राधान्य देत असल्याची भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. त्यातून त्यांना हे स्पष्ट सांगायचं आहे की, आता आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यापूर्वी सामनाला दिलेल्या मुलाखतीतही पवारांनी हीच भूमिका घेतली होती. त्यांची भूमिका पटवून देणारं हे दुसरं विधान आहे."
देसाई पुढे म्हणाले, "पण, हेही तितकंच खरं आहे की, राम मंदिराची उभारणी सुरू असताना कोरोनाच्या उपाययोजनांवर त्याचा काही फरक पडणार नाही. या दोन्ही गोष्टी एकावेळेस होऊ शकतात. हे माहिती असूनही आपण भाजपपासून कसे वेगळे आहोत, हे दाखवण्याचा पवारांनी प्रयत्न केला आहे."
लक्ष वळवण्याचा प्रयत्न?
राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे जनतेचं लक्ष वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं शरद पवारांना अधोरेखित करायचं आहे, असं ज्येष्ठ पत्रकार सुनिल चावके यांना वाटतं.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "राम मंदिर बांधकामाचं भाजपचं काम कोरोनामुळे बरंच लांबणीवर पडलं होतं. ज्या वेगाने कोरोनाचा फैलाव होतोय तो चिंतेचा विषय आहे. रोज 40 हजारांच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. मात्र, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 60 ते 64 टक्के असल्याचं आणि मृत्यूदर अत्यंत कमी असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे. हा सगळा लक्ष वळवण्याचा प्रकार आहे. मात्र, ज्या वेगाने आरोग्य सुविधा वाढायला हव्या होत्या तशा कदाचित वाढलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मला वाटतं शरद पवार जे बोलले ते बरोबर आहे."
"देशापुढे कोरोनासारखी परिस्थिती असताना मोदी सरकार किंवा भाजप आज जनतेचं लक्ष पुन्हा एकदा भावनिक मुद्द्यांकडे वळवू इच्छिते, असं जनतेला सांगण्याचा शरद पवारांचा उद्देश दिसतो. देशासमोर आज मुख्य समस्या कोरोना विषाणूच्या साथीची आहे, चीनच्या आक्रमणाची आहे आणि कोरोना आणि इतर मुद्द्यांमुळे देशासमोर आर्थिक विपण्णावस्था निर्माण होतेय. या तीन महत्त्वाच्या ज्वलंत समस्या असताना राम मंदिराकडे लक्ष वळवण्याचा भाजपचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्यावर शरद पवारांनी बोट ठेवलेलं आहे."
तर ही भाजपवर थेट टीका असल्याचं पत्रकार विजय चोरमारे म्हणतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "शरद पवारांकडे कुठलंही संवैधानिक पद नाही. मात्र, तरीही 81 वर्षांचे शरद पवार राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौरा करत आहे. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे मोदी सरकारवर कारभारावर टीका आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना सरकार लोकांना पुन्हा एकदा हिंदुत्व आणि राम मंदिर या मुद्द्यात अडकवू इच्छिते आणि त्याकडे शरद पवार लक्ष वेधत आहेत."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)