You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार: 'राम मंदिर बांधून कोरोना जाईल, असं काहींना वाटतं' #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. 'राम मंदिर बांधून कोरोना जाईल, असं काहींना वाटतं' - शरद पवार
उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. राम मंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.
या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
"कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे," असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पवारांच्या वक्तव्यावर भाजपनं पलटवार केला आहे.
"मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले? त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय?" असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
2. विधान परिषदेच्या 18 जागा रिक्त
पदवीधर मतदारसंघातील तीन, तर शिक्षक मतदारसंघातील दोन आमदारांची मुदत रविवारी (19 जुलै) संपली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या 18 झाली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
सतीश चव्हाण (औरंगाबाद पदवीधर), अनिल सोले (नागपूर पदवीधर), श्रीकांत देशपांडे (अमरावती शिक्षक) आणि दत्तात्रय सावंत (पुणे शिक्षक) या चार आमदारांची मुदत रविवारी संपुष्टात आली. पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विधानसभेवर निवड झाल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा रिक्त होती.
विधान परिषदेच्या एकूण 78 पैकी 18 जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यपाल नियुक्त 12, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 5, तर धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था अशा 18 जागा सध्या रिक्त आहेत.
3. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून 'सह्याद्री'वरून धडे
"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या 'सह्याद्री' वाहिनीवरून 20 जुलैपासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जाणार आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या मालिकेचा लाभ घ्यावा," असं आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना आवडावं यादृष्टीनं या मालिकेचं नाव 'टिलीमिली' असं ठेवण्यात आलं आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या संस्थेच्या सहकार्यातून आणि 'एमकेसीएल नॉलेज फांउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शैक्षणिक मालिका सुरू केली जात आहे.
राज्यातील सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणी संचावर या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
'टिलीमिली' मालिका 'बालभारती'च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असणार आहे.
4. भारतात कोरोनाचा मत्यूदर कमी - आरोग्य मंत्रालय
भारतातील कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहेत. सध्या देशातील कोरोनाचा मृत्यूदर 2.5 टक्क्यांपेक्षाही असल्याचं आरोग्य मंत्रालयानं रविवारी (19 जुलै) स्पष्ट केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर वैद्यकीय सुविधांमुळे कोरोनाचा मृत्यूदर भारतात जगात सगळ्यात कमी असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
सध्या देशातील कोरोना मृत्यूदर 2.49 % इतका आहे.
केरळ, बिहार, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
5. चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी भाजपनं माध्यमांना धमकावलं - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लडाखमधील भारत-चीन तणावावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
लडाखमधील चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी केंद्र सरकारनं माध्यमांवर दबाव टाकला आहे, असं राहुल गांधीनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
सरकारी संस्थांचा उपयोग करून भाजप खोटा प्रचार करतोय. कोरोनावरील चाचण्यांवर निर्बंध आणि मृतांची संख्या लवपली जात आहे. जीडीपीसाठी नवीन मोजणी पद्धत लागू केली आहे. तसंच चिनी आक्रमणावर पडदा टाकण्यासाठी माध्यमांना धमकावलं जात आहे," असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)