You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : सोन्याचांदीच्या मास्कनं थाट होईल, पण व्हायरस दूर राहील का?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कोरोना विषाणूची साथ पसरू लागली तसं मास्क वापरणं बंधनकारक झालं आणि आता ते एक नवं 'स्टाईल स्टेटमेंट' बनलं आहे. मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गमछा असो वा एखाद्या अभिनेत्रीनं घातलेला नक्षीदार कापडी मास्क किंवा लग्नसराईसाठी आलेले हिरेजडीत मास्क. मास्कच्या व्हरायटी बाजारात आल्या आहेत.
मास्कमागे अर्धा चेहरा झाकलेला असताना, मास्क कसा दिसतो आहे, हेही आता तितकंच महत्त्वाचं बनलंय जणू. म्हणूनच तर नाक्यावर शिलाईकाम करणाऱ्यांपासून ते मोठमोठ्या फॅशन ब्रँड्सपर्यंत आणि मेडिकल स्टोर्सपासून ज्वेलर्सपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी मास्कचे अनेक प्रकार मिळत आहेत आणि लोकही ते वापरतातही.
मास्कचा हा ट्रेंड काय सांगतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे मास्क कोरोना विषाणूला रोखण्यासाठी खरंच उपयुक्त आहेत का? त्याविषयी डॉक्टर्स काय सांगतात?
मास्कचा ट्रेण्ड आणि फॅशन स्टेटमेंट
काही महिन्यांपूर्वी मोजकेच लोक मास्क वापरत. डॉक्टर्स, रासायनिक कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्ती, काही सफाई कर्मचारी, ट्रॅफिक पोलीस किंवा वायू प्रदूषणानं ग्रस्त शहरांमधले लोक, टीबीसारख्या आजारानं त्रस्त व्यक्ती आणि कधी कधी जैन समुदायाचे धर्मगुरू वेगवेळे मुखवटे घालून वावरताना दिसत.
कोव्हिडमुळे मात्र मास्क बंधनकारक झाल्यावर लोक त्यातही कल्पकता दाखवू लागले आहेत. काही फॅशन डिझाईनर्सनी अगदी ड्रेस किंवा सूटला मॅचिंग मास्कही देणं सुरू केलं.
सुरत शहरातील एका सराफानं त्याच्या दुकानात हिऱ्यांचे मास्क विकायला ठेवले असून त्यांची किंमत दीड लाख ते चार लाख रुपयापर्यंत आहे. लॉकडाऊननंतर एका गिऱ्हाईकानं वर-वधूंसाठी हिरेजडीत मास्क बनवून घेतला होता असं ते सांगतात.
पिंपरी-चिंचवडचे रहिवासी शंकर कुऱ्हाडे यांनी थेट सोन्याचाच मास्क बनवून घेतला. काही लोकांना त्याचं नवल वाटलंय, तर काहींना हा 'पैशाचा माज' वाटला. त्याआधी कोल्हापूरातील एका व्यक्तीनंही चांदीचा मास्क बनवून घेतला होता.
लग्नसराईसाठी रेशमाचे पैठणी मास्कही बाजारात आले असून पैठण्यांसारखीच त्यालाही मागणी असल्याचं व्यावसायिक सांगतात.
फुलाफुलांची डिझाईन्स, चेक्स पॅटर्न्स, प्रिंटेड मास्क, लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर किंवा फंकी मास्क आवडीनं घालतायत.
मास्कमुळे चेहरा झाकला जात असल्यानं मूकबधीर व्यक्तींना मात्र अडचणी येतात. त्यांच्यासाठी संवादाची भाषा कळण्यासाठी चेहऱ्याचे हावभाव महत्त्वाचे असतात. त्यावर पारदर्शक मास्कचा पर्याय समोर आला आहे.
पारंपरिक कला आणि छोट्या उद्योजकांना चालना
कोव्हिडची साथ आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योगव्यवसाय बंद झाले, तेव्हा कापड व्यवसाय, त्यावर आधारित पारंपरिक कला यांवर पोट भरणाऱ्यांना मोठा फटका बसला. पण कापडी मास्कची मागणी वाढल्यानं अशा छोट्या उद्योगांना चालनाही मिळाली असल्याचं पुण्याच्या श्वेता ओसवाल सांगतात. त्यांनी पर्सेस आणि बॅग्ससोबत आता मास्क बनवून विकायला सुरूवात केली आहे.
"मास्क आता कपड्याइतकाच महत्त्वाचा बनला आहे. पण रोज त्याच त्याच रंगाचे मास्क घालून लोकांना कंटाळाही येतो. म्हणून लोक रंगीबेरंगी मास्कला पसंती देतात. कुणाला फॅशनची मुळातच आवड असते. आता लोक पुन्हा ऑफिसला जाऊ लागले आहेत. मग ऑफिससाठी प्लेन साध्या रंगाचा मास्क आणि एरवी रंगीबेरंगी मास्क असंही लोक विकत घेतात."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
काहीवेळा एकदोनदा धुतल्यावर मास्क खराब होऊन जातो. त्यामुळे लोक रंगासोबतच मास्कच्या क्वालिटीला आणि त्यात किती लेयर्स आहेत याला महत्त्व देत असल्याचं त्या सांगतात.
फॅशनेबल मास्क किती फायद्याचे?
कापडी मास्क किंवा फेस कव्हरिंग (नाक-तोंड पूर्णपणे झाकेल असं कापड) कसं असावं, मास्क कुणी घालायला हवा याविषयी आधी मतमतांतरं होती. पण कोरोना विषाणू कुठल्याही लक्षणं नसलेल्या व्यक्तींमुळेही पसरू शकतो, हे समोर आल्यावर जगभरातील तज्ज्ञांनी मास्क घालण्याचा सल्ला दिला.
जागतिक आरोग्य संघटनेनंही कुणी कुठला मास्क वापरावा याविषयी काही नियम केले आहेत आणि गर्दीच्या ठिकाणी कापडी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. तसंच हा मास्क किमान दोन किंवा तीन लेयर्सचा असावा असंही म्हटलं आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रातले अध्यक्ष अविनाश भोंडवे सांगतात, "तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात असाल किंवा कोव्हिड पेशंट्सच्या संपर्कात काम करत असाल तर N95 मास्क वापरायला हवा. इतर हेल्थवर्कर्स तीन लेयर्सचे सर्जिकल मास्क वापरतात. बाकीचे लोक कामासाठी बाहेर पडतील तर त्यांनी कापडी मास्क वापरावा."
हे कापडी मास्क कसे वापरावेत?
डॉ. भोंडवे सांगतात, "कापडी मास्क कुठल्याही डिझाईनचा असू देत तो रोज स्वच्छ धुतला पाहिजे आणि व्यवस्थित वाळला पाहिजेत. तुम्ही सकाळपासून एक मास्क घालू शकता. मग जेवताना तो काढला की दुसरा मास्क घालू वापरायचा. मास्क गळ्याशी, हनुवटीखाली, नाकाखाली असे घालू नका. मास्कनं नाक-तोंड नीट झाकलं पाहिजे, तुम्ही त्यात श्वास घेऊ शकला पाहिजेत. आणि खूप जास्त फटीही राहता कामा नयेत. मुख्य म्हणजे मास्कला समोर अजिबात हात लावू नका. नाहीतर तुमच्या हातावर विषाणू येतील."
गमछा, रुमाल, स्कार्फ वापरण्यास हरकत नाही, पण तो नीट बांधलेला असावा असं ते सांगतात. कुठला मास्क घालता यापेक्षा तो कसा घालता हे महत्त्वाचं आहे याकडे ते लक्ष वेधून घेतात आणि फॅशनविषयी त्यांना काय वाटतं?
"मध्यंतरी मास्कवर तुमचं जेवढं तोंड झाकलं जातं त्याचा फोटो प्रिंट करून दिला जायचा. असे गंमतीदार मास्कही आले आहेत. फॅशन म्हणून का होईना, लोक मास्क वापरत असतील, तर ते फायद्याचं आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)