पीक नष्ट केल्यामुळे दलित शेतकऱ्याचा पोलिसांसमोर आत्महत्येचा प्रयत्न : #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी विविध वर्तमानपत्रं तसंच वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:

1. पीक नष्ट केल्यामुळे दलित शेतकऱ्याचा पोलिसांसमोर आत्महत्येचा प्रयत्न

मध्य प्रदेशमधील गुणा जिल्ह्यात दलित शेतकरी दाम्पत्यानं पोलिसांसमोरच कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारी जमिनीवर या कुटुंबानं घेतलेलं पीक पोलिसांनी नष्ट केल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललं. द क्विंटनं ही बातमी दिली आहे.

राजकुमार अहिरवार यांची गुणामधल्या सरकारी जमिनीवर शेती होती. गुणा प्रशासनानं याच जमिनीवर मॉडेल कॉलेज बनविण्याचा आदेश दिला होता. यापूर्वीही प्रशासनानं या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला होता.

ही घटना 14 जुलैला घडली. गुणाचे तहसीलदार निर्मल राठौड यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. त्यांच्याच देखरेखीखालीच जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात येत होतं.

जमिनीची मोजणी करुन जेव्हा जेसीबी मशीननं अतिक्रमण हटवलं जात होतं, तेव्हाच शेतकरी दाम्पत्यानं कीटकनाशक पिऊन जीव देण्याचा प्रयत्न केला.

ग्वाल्हेर झोनचे IG राजबाबू सिंह यांनी म्हटलं, की डब्बू पारधी नावाच्या व्यक्तीनं जमिनीवर ताबा मिळवला होता. त्याच्याविरोधात अनेक गुन्ह्यांचीही नोंद होती. अहिरवार कुटुंबाला त्याने वाट्यानं आपली जमीन कसण्यासाठी दिली होती.

2. मला कोव्हिड झाला तर सरकारी रुग्णालयात भरती करा- देवेंद्र फडणवीस

'गिरीश, मला कोविड झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा, खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि भाजपमधील सहकारी गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्यात करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत आहेत. प्रत्येक शहर आणि जिल्ह्यातील पालिका आणि आरोग्य प्रशासनाशी चर्चा करतानाच कोविड रुग्णालयात जाऊन पाहणीही करत आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्यात करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत आहेत. प्रत्येक शहर आणि जिल्ह्यातील पालिका आणि आरोग्य प्रशासनाशी चर्चा करतानाच कोविड रुग्णालयात जाऊन पाहणीही करत आहेत.

3. कोरोनामुळे आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू, 1302 डॉक्टरांना संसर्ग

कोरोना संकटकाळात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांपैकी आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दिली आहे.

आतापर्यंत 1302 डॉक्टरांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा डॉक्टरांचा मृत्युदर जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने देशातील सर्व सदस्य डॉक्टरांकडून वैयक्तिक फॉर्म भरून घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संघटनेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर 1302 डॉक्टरांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. 99 पैकी 73 डॉक्टरांचं वय हे 50 च्या पुढील आहे, तर 19 डॉक्टर हे 35 ते 50 वयोगटातील आहे.

1302 संक्रमित डॉक्टरांपैकी 586 डॉक्टर्स हे प्रॅक्टीसिंग आहे तर 566 डॉक्टर्स हे निवासी आहेत. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांचा मृत्युदर हा 8 ते 9 टक्के असल्याची माहिती माहिती डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी एबीपी ऑनलाईनशी बोलताना दिली.

4. येत्या सहा महिन्यात भारतातील बुडीत कर्जांचं प्रमाण वाढेल- रघुराम राजन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतातल्या बुडीत कर्जासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. येत्या सहा महिन्यात भारताच्या नॉन परफॉर्मिंग अॅसेटमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते असं राजन यांनी म्हटलं आहे. बिझनेस स्टँडर्डनं ही बातमी दिली आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांवर परिणाम झाला असून त्यांना कर्जाची परतफेड करण्यात अडचण येत असल्याचं राजन यांनी म्हटलं. ते नॅशनल काउंसिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च आयोजित इंडिया पॉलिसी फोरम 2020 मध्ये बोलत होते.

जनधन खात्याची चांगली जाहिरात झाली, मात्र त्या तुलनेत काम झालं नसल्याचं राजन यांनी म्हटलं.

5. अयोध्येतील राम मंदिराच्या जागी प्राचीन बुद्ध मंदिर असल्याचा भिक्षुंचा दावा

अयोध्येतील राम मंदिराची जागा आणि संपूर्ण परिसर हा बुद्ध मंदिराचा परिसर असून राम मंदिराच्या जागी प्राचीन बुद्ध मंदिर असल्याचा दावा भारतातील बौद्ध भिक्षुंनी केला आहे.

ही जागा बुद्ध मंदिराला परत मिळाली यासाठी बौद्ध भिक्षुंनी मंगळवारपासून (14 जुलै) आमरण उपोषणही सुरू केले आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

रामजन्मभूमी क्षेत्र हे प्राचीन बौद्ध स्थळ असून ते प्रसिद्ध साकेत नगरी होती असा दावा करत मंदिराचे काम तत्काळ थांबवण्याची मागणी बौद्ध भिक्षु करत आहेत.

राम मंदिराचे काम सुरू झाल्यानंतर जमीन समतल करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी जमिनीतून प्राचीन मंदिराचे अवशेष सापडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र हे सर्व अवशेष राम मंदिराचे नसून ते बुद्ध मंदिराचे आहेत, असा बौद्ध भिक्षुंचा दावा आहे. जमिनीच सापडलेले विशिष्ट प्रकारचे खांब, त्यावरील आकृत्या आणि चक्र हे बौद्ध धर्मीय मंदिरातच आढळतात असा भिक्षुंचा दावा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)