कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 रुग्णांना घरीच ICUमध्ये कसं ठेवायचं?

    • Author, नितीन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सलग आठ आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून भारतात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, अनलॉकमध्येही रुग्णांना बेड मिळणं किती कठीण झालयं, हे समोर आलंय. त्यामुळे घरीच रुग्णांना ICUमध्ये ठेवण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू झालीये.

पश्चिम दिल्लीतल्या मेहता कुटुंबीयांनी याबाबत आपल्या व्यथा बीबीसीकडे व्यक्त केलाय.

"अनलॉक-1 सुरू होऊन दोनच दिवस उलटले असतील, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. मला सौम्य लक्षणं होती. त्यानंतर आम्ही रुग्णालयाचा शोध घेण्यास सुरुवात केली," असं राजकुमार मेहता सांगत होते. मेहता हे 76 वर्षांचे आहेत.

रुग्णालयात बेड मिळावा म्हणून प्रचंड प्रयत्न केल्यानंतरही हाती निराशा पडली. ते सांगतात, "सर्व रुग्णालयं पूर्णपणे भरलेली होती. किंबहुना, रुग्णालयाबाहेरही प्रचंड गर्दी दिसून येत होती."

एका मित्राचा रेफरन्स घेऊन मेहता यांच्या मुलानं एका कंपनीला फोन केला. त्या कंपनीनं घरीच हॉस्पिटल बेड देण्याचं आश्वासन दिलं. एवढंच नव्हे, तर बेडसोबत ऑक्सिजन सपोर्ट आणि रुग्णाला आवश्यक असणारी सर्व साधनंही सोबत दिली जातील, असंही सांगितलं गेलं.

करार आणि काही आगाऊ रक्कम दिल्यानंतर तासाभरातच प्रशिक्षित पॅरामेडिकसोबत वैद्यकीय साधनं मेहता यांच्या घरात पोहोचवण्यात आली. यात ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन सिलेंडर जोडलेलं कार्डिआक मॉनिटर, पोर्टेबल व्हेंटिलिटर ही साधनं होती.

"आम्ही त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. आवश्यक गोष्टींची विनंती केली. ही सर्व वैद्यकीय साधनं ठेवण्यासाठी, त्या व्यवस्थित सुरू राहाव्यात यासाठी घरात काय सुविधा असायला हव्यात ते सांगितलं. अर्थात, पैसे किती होतील, हेही सांगितलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मेहता त्यांच्याच घरी, मात्र आमच्या देखरेखीखाली होते. ते पूर्णपणे बरे झाले आहेत," असं अंबरिश मिश्रा सांगतात.

मिश्रा हे घरच्या घरी वैद्यकीय साधनं पुरवणाऱ्या या कंपनीचे म्हणजेच HDY हेल्थकेअरचे प्रमुख आहेत. होम आयसोलेशन पुरवणं हे त्यांच्या कंपनीचं काम आहे.

भारतात आजच्या घडीला कोरोनाग्रस्तांची संख्या साडेसात लाखांच्या पार गेलीय. सुमारे 21 हजार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भारतात दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय.

भारतात जुलैच्या अखेरपर्यंत किंवा त्याआधीच सुमारे 10 लाख रुग्णसंख्या होईल, असा अंदाज चेन्नईतल्या इस्टिट्युट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील संशोधकांनी जूनमध्येच व्यक्त केला होता.

सरकारकडून सातत्यानं सांगण्यात येतंय की, कोरोनाग्रस्तांना सर्वोतोपरी सुविधा पुरवल्या जात आहेत. मात्र, वास्तव असं आहे की, शेकडो रुग्ण हॉस्पिटलमधून बेड नसल्यानं निराश होऊन घरी परतत आहेत.

ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे, ते लोक वेगवेगळे पर्याय चाचपडत आहेत. अनेकजण खासगी हॉस्पिटलचा पर्यायही निवडत आहेत.

भारतात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी सातत्याने वाढत असल्याचे पाहून सरकारनं सांगितलंय की, लक्षणं नसलेल्या आणि लक्षण असलेल्या अशा दोन्ही कोरोनाग्रस्तांनी तातडीनं क्वारंटाईन होण्याची गरज आहे.

हॉटेल्स, खेळाची मैदानं आणि रेल्वे यांना सरकारनं आदेश दिलेत की, अलगीकरणासाठीची क्षमता शक्य तितकी वाढवावी. मात्र, कुटुंबातील एक किंवा दोघेजण पॉझिटिव्ह आढळल्यास, असे कुटुंब घरातल्या घरात काही सुविधा मिळतेय का, हे पाहतायेत.

"घरातच ICU चं सेटअप करण्याचा निर्णय घेतल्याचं मला खरंच बरं वाटतंय. कारण मी आता माझ्या वडिलांची नीट काळजी घेऊ शकते. हॉस्पिटलमध्ये असताना उद्भवणारे धोके टाळता येतात," असं भारती सिंग सांगतात.

भारती सिंग यांच्या 56 वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.

"हॉस्पिटलमध्ये हजारो रुग्ण असतात. त्यामुळे सगळ्यांकडेच पूर्णवेळ लक्ष दिलं जात नाही." असंही त्या म्हणतात.

घरात ICU सेटअप केल्यानंतर तिथं फुफ्फुसरोग तज्ज्ञ किंवा ICU स्पेशालिस्टच्या मार्गदर्शनात नर्स काम करते. त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार केले जातात.

नवीन रुग्णाच्या घरी उपचारासाठी जाण्याआधी वैद्यकीय सहाय्यक किंवा नर्स यांची कोरोना चाचणी घेतली जाते. शिवाय, प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांनाही आवश्यक खबरदारी घ्यायला सांगितली जाते.

अशाच एका खासगी हेल्थकेअर कंपनीसाठी काम करणाऱ्या नर्स केए वर्सेम्ला सांगतात, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती म्हणून मला ही मोठी जबाबदारी वाटते.

"हॉस्पिटलमध्ये कुठलीही आपत्कालीन स्थिती असेल, तर सर्व वैद्यकीय साधनं आणि सुविधा तातडीनं उपलब्ध होतात. मात्र, घरी अलगीकरण केल्यास ते शक्य नसतं. अशावेळी कुठलीही नर्स अशाप्रकारची स्थिती हाताळण्यासाठी सक्षम असली पाहिजे," असं वर्सेम्ला म्हणतात.

डॉक्टरांशी कधी आणि कसा संपर्क करायचा, संवाद साधत राहायचा, याचं प्रधान्य नर्सला ठरवता आलं पाहिजे, असंही त्या म्हणतात.

नर्स किंवा वैद्यकीय सहाय्यक हे स्पेशालिस्ट डॉक्टरांना सातत्यानं रुग्णाच्या ऑक्सिजन लेव्हल, शरीराचे तापमान आणि इतर लक्षणांबाबत माहिती देत राहतात.

स्पेशालिस्ट डॉक्टरांनी वेळेवर लक्ष देणं हेच महत्त्वाचं असल्याचं एका होम केअर पुरवणरे डॉ. दीक्षित ठाकूर सांगतात.

"आपल्याला अद्याप कोरोनावर नेमकी उपचारपद्धत माहिती नसल्यानं, घरात किंवा हॉस्पिटलमध्ये रुग्णाला सपोर्टिव्ह थेरेपी देत अल्यानं, रुग्णाला हॉस्पिटलमधील ICU मध्ये कधी नेलं पाहिजे, हा डॉक्टरांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असतो," असं डॉ. दीक्षित ठाकूर म्हणतात.

घरातल्या घरात ICU सेटअप उभारण्याच्या या सुविधेसाठीही पैसेही तसे मोजावे लागतात. 10 ते 15 हजार रुपये प्रत्येक दिवसाचा खर्च येतो. अर्थात, इतका खर्च देशातील कोट्यवधी जनतेला शक्यही नाही. मात्र, तरीही या सुविधेची मागणी वाढतेय.

HDU हेल्थकेअर किंवा हेल्थकेअर अॅट होम यांसारख्या मोठ्या कंपन्या सध्या घरातल्या घरात क्रिटिकल केअर सपोर्टची सुविधा देत आहेत.

"प्रत्येक दिवशी साधारण पाच कुटुंबांपर्यंतं सुविधा पोहोचवतोय. याचाच अर्थ, 20-25 रुग्ण प्रत्येक दिवशी आमच्याशी जोडले जात आहेत," असं अंबरिश मिश्रा सांगतात.

मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल असलेल्या शहरांमधील रेसिंडंट वेलफेअर असोसिएशन आणि सोसयट्यांच्या संघटना सुद्धा होम आयसोलेशन सेंटरच्या पर्यायाकडे वळू लागलेत.

दिल्लीसारख्या काही राज्यांनी तर लक्षणं नसलेल्या रुग्णांना किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना घराच अलगीकरण कक्षात राहण्यास सांगितलं आहे. ऑक्सिमीटर मोफत असल्यानं स्वत:च ऑक्सिजन लेव्हल तपासण्यास सांगण्यात येत आहे.

श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा इतर काही गंभीर समस्या उद्भवल्यासच हॉस्पिटलमध्ये यावं, असाही सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.

भारतातल्या कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई शहरातही हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी होताना दिसतेय. महाराष्ट्र सरकारनं हॉस्पिटलमधील गर्दी टाळण्यासाठीच मैदानं आणि हॉटेल्समध्ये कोव्हिड सेंटर्सची उभारणी केलीय.

मुंबई उनगरातील अनेक क्लब हाऊसेस किंवा खेळांच्या जागा या अलगीकरण कक्षात रुपांतरीत झाल्यात. यासाठी केवळ हेल्थकेअर कंपन्यांकडूनच मदत होतेय, अशातला भाग नाही, तर वरिष्ठ डॉक्टरांकडूनही पुढाकार घेतला जातोय.

"मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, अशावेळी आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. सोसायटीच्या भागात असलेला परिसर पूर्णपणे स्वच्छ केला आणि तिथेच अलगीकरण कक्ष तयार केला. इथे आठ ते दहा रुग्ण सहज राहू शकतात," असं डॉ. विवेक देसाई सांगतात. देसाई हे रेडिओलॉजिस्ट आहेत. हेल्थकेअर अॅट होम डॉ. देसाईंना पाठबळ देत आहे.

मात्री अजूनही काही तज्ज्ञांना वाटतंय की, घरातल्या घरात किंवा सोसायटीच्या परिसरात अशाप्रकारे अलगीकरण कक्ष करून उपचार करणे हे धोक्याचे ठरू शकते.

ICU ची गरज असणाऱ्या कुठल्याही कोरोनाग्रस्तासाठी अद्यायावत व्हेंटिलिटर उपलब्ध असायला हवेत. शिवाय, ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास तातडीने त्या सुविधा तयार पाहिजेत, असंही अनेकांना वाटतं.

"जर कुणी म्हणत असेल की, मी जीमखाना किंवा कम्युनिटी सेंटरचं मेडिकल सेंटर, आयसीयू किंवा कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतर केलं, तर फक्त एकच अडथळा आहे, तो म्हणजे, तिथे वैद्यकीय क्षेत्रातील कुणी व्यक्ती परिस्थिती नियंत्रित करायला नसेल. जर 10 रुग्ण असतील आणि काहीतरी मोठं झालं, तर मग कोण जबाबदार?" असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संदीप शर्मा विचारतात.

दिल्लीतल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. मनोज सिन्हा यांना वाटतं की, "कोरोना झाल्यानं हॉस्पिटलमध्ये भरती होणं म्हणजे अनेकांना कलंक वाटतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असे अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. मात्र, यातील कुणाला अत्यंत तातडीची वैद्यकीय गरज लागल्यास हॉस्पिटलमधील ICU ला पर्याय नाही."

दुसरीकडे, घरच्या घरी ICU सेटअपची किंवा होम आयसोलेशनच्या सुविधा उपलब्ध होत असल्या, तरी असंख्य भारतीयांना त्या अद्याप परवडणाऱ्या नाहीत किंवा त्यांच्या भागात त्या उपलब्ध सुद्धा नाहीत.

बेड, वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय साधनं यांची कमतरता असूनही, देशभातील असंख्य जणांवर आजही हॉस्पिटलमध्येच उपचार केले जात आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)