शिवाजी महाराज : अग्रिमा जोशुआची चूक असेल तर तिच्यावर नक्की होईल – अनिल देशमुख

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी आणि अर्वाच्य भाषेत शिव्या देणाऱ्या शुभम मिश्राला बडोदा पोलिसांनी अटक केली आहे.

"अग्रिमानं केलेल्या वक्तव्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे, त्यात तिची जर काय चूक असेल तर तिच्यावर आवश्य कारवाई होईल," अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने सोशल मीडियावर अग्रिमा ट्रोल होत होती. इन्टाग्राम आणि टिकटॉकवर भरपूर फॉलोइंग असणाऱ्या शुभमने इन्स्टाग्रामवरच्या एका व्हीडिओत जाहीरपणे अग्रिमाचं नाव घेत बलात्काराची धमकी दिली.

सोशल मीडियावर शुभमचा हा व्हीडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर 'नॅशनल कमिशन फॉर वुमन'ने गुजरात पोलिसांकडे विचारणा करत शुभमवर कारवाईची मागणी केली.

कुणाल कामरा, स्वरा भास्कर यांच्यासह अनेकांनी पोलिसांना याची कल्पना दिली होती. बडोदा पोलिसांनी स्वत:हून याप्रकरणाची दखल घेत 26 वर्षीय शुभमला रविवारी संध्याकाळी अटक केली.

बडोदा पोलिसांनी शुभमवर भारतीय दंड संहितेच्या 294 (अश्लील), 504 (सार्वजनिक शांततेचा भंग करणं), 505 (व्यवस्थेला बाधा येईल असं जाहीर वक्तव्य करणं), 509 (महिलांना त्रास देणं) याच्यासह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या कलम 67 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अग्रिमा जोशुआची पुणे पोलिसांकडे तक्रार

दरम्यान, अग्रिमा जोशुआने शुभमविरुद्ध कारवाई होण्यासंदर्भात पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आम्हाला पुणे पोलिसांकडून या तक्रारीबद्दल कळलं असं बडोदा पोलिसमधील डीसीपी संदीप चौधरी यांनी सांगितलं.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने शुभमच्या व्हीडिओसंदर्भात पोलिसांना माहिती दिली होती. बडोद्याच्या सायबर क्राईम सेलने याची नोंद घेतली. बडोदा पोलिसांनी स्यू मोटो अर्थात स्वत:हूनच शुभमला अटक केली.

सायबर क्राईम पोलिसांतर्फे तपास सुरू असल्याचं बडोदा सायबर सेलचे डीसीपी जयदीपसिंह जडेजा यांनी स्पष्ट केलं. शुभमला कोव्हिड-19 चाचणीनंतर सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.

महिलांची सुरक्षा हे कमिशनचं आद्य कर्तव्य आहे. या तत्वानुसार कमिशनच्या चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी शुभमचा व्हीडिओ पाहून गुजरात पोलिसांना कल्पना दिली आणि तात्काळ कारवाईची मागणी केली.

काय आहे अग्रिमा जोशुआ प्रकरण?

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने कार्यक्रमादरम्यान मुंबईजवळच्या अरबी समुद्रात तयार होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने टीका केली होती. अग्रिमाच्या बोलण्यावर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने अनेकांनी अग्रिमावर टीका केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून, त्यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही, असा सूर सोशल मीडियावर उमटला होता.

अग्रिमाचा व्हीडिओ ज्या स्टुडिओत शूट झाला होता, तिथे जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनाी तोडफोड केली. मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवर हा व्हीडिओ अपलोड करण्यात आला.

भाजपची ट्रोल आर्मी मागे लागल्याचं अग्रिमाने ट्वीट करून म्हटलं होतं. शुक्रवारी (10 जुलै) रात्री जोशुआने शिवप्रेमींची माफी मागितली होती.

"छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असणाऱ्यांच्या भावना दुखावल्याबद्दल मी तुमची माफी मागते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. माझ्या उदगारांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागते. मी तो व्हीडिओ काढून टाकला आहे. कृपया याची नोंद घ्यावी," असं जोशुआने म्हटलं होतं.

दरम्यान, पत्रकार राजू परूळेकर यांनी यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. आपण आपल्या विवेकबुद्धी आणि तर्कबुद्धीची परीक्षा घेऊया. हा व्हीडिओ 2019 मधला आहे. जोशुआने टोमणा मोदी आणि पुतळाप्रेमींना मारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तिने केलेला नाही. तसं करणाऱ्यांचा उल्लेख तिने केला आहे आणि महाराज असा उल्लेख करणाऱ्यांनाच फॉलो केलंय असं तिने म्हटलं होतं.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शुभमच्या व्हीडिओसंदर्भात ट्वीट केलं होतं.

"बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांचा संदर्भ देऊन हा माणूस अर्वाच्य भाषेत बोलतो आहे. त्याने एका महिला स्टँडअप कॉमेडियनला जाहीरपणे बलात्काराची धमकी दिली आहे. अर्वाच्य भाषेत शिव्याही दिल्या आहेत. पोलिसांनी या माणसाला तात्काळ अटक करावी," अशी मागणी कामरा यांनी केली होती.

"महिलांशी कसं बोलावं याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे. सध्याच्या काळात महिलांना उद्देशून आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी किंवा कृती करत असेल तर त्यांच्यासाठी कायदा आहे. सायबर पोलीस या व्हीडिओची शहानिशा करा आणि मुंबई पोलीस, या व्यक्तीवर कारवाई करा," असे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने व्हीडिओचा संदर्भ देत कारवाईची मागणी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)