You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊन : आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10 हजार लोक; 3 गावं सील #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वेगवेगळ्या वेबसाईट्सवर आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10 हजार लोक; तीन गावं केली सील
आसाममध्ये आमदाराच्या वडिलांवर अत्यसंस्कार करण्यासाठी तब्बल दहा हजार लोक उपस्थित राहिले. या घटनेनंतर प्रशासनानं तीन गावे सील केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.
आसाममधील धींग येथील आमदार अमीनुल इस्लाम यांचे वडील खैरुल इस्लाम यांचं ८७ व्या वर्षी निधन झालं. 2 जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक उपस्थित होतं. ही माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ जवळील तीन गाव सील केली आहेत.
या प्रकरणी दोन तक्रारी नोंदवण्यात आल्या असल्याची माहिती नागावचे पोलीस उपायुक्त जादव सैकिया यांनी दिली.
2. राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट लवकरच सुरू करण्याचा विचार- उद्धव ठाकरे
'मिशन बिगीन' अगेन अंतर्गत राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरब करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टीव्ही 9 मराठीने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
कोणत्याही हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी (5 जुलै) राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
दरम्यान, उद्धव यांनी भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशीही व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये, कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटत असतो. काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.
3. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या कामाला 100 गुण द्यायला हवे - संजय राऊत
विरोधीपक्ष नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या कामाला 100 गुण द्यायला हवे, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
गेले काही दिवस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून काही सूचना करत आहेत. ते त्यांची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडत आहेत, असं राऊत यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काम करत राहायला हवं. पाच वर्षांनी निवडणुका होतील. त्यात त्यांनी हवं ते ऑपरेशन करावं असं म्हणत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचा प्रयत्न सध्या तरी यशस्वी होणार नसल्याचं सूचित केलं.
4. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबातील 8 जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांची पत्नी, मुलगी, आई यांना करोनाची लागण झाली असून घरातील लहान मुलांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
तीन दिवसांपूर्वीच मोहोळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्र्याचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता यांच्या संपर्कात आले होते.
महापौर मुरलीधर मोहोळ यांना तापाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची करोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांतील 18 जणांची टेस्ट करण्यात आली.
5. केरळमध्ये वर्षभर पाळावे लागणार सोशल डिस्टन्सिंगचे नियम
देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असतानाच केरळमधील पिनरई विजयन सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारनं सोशल डिस्टन्सिंगसंबंधी जे नियम लागू केले आहेत, त्याचं पालन केरळमधील नागरिकांना पुढील वर्षभर करावं लागणार आहे. असा निर्णय घेणारं केरळ हे देशातलं पहिलं राज्य बनलंय. एनडीटीव्ही इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलंय.
या नियमामुळे लोकांना बाहेर पडताना मास्क घालणं तसंच सहा फुटांचं अंतर ठेवणं या गोष्टी आता वर्षभरासाठी कराव्या लागतील. लग्नात 50 लोक आणि अंत्यसंस्कारासाठी 20 लोक उपस्थित राहण्याचा नियमही पुढील वर्षभर लागू राहिल.
संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय सभा, आंदोलनं, मोर्चे काढता येणार नाहीत. परवानगी नंतर अशा कार्यक्रमात 10 लोकच सहभागी होऊ शकतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)