टोळधाड परतवण्यात कोणत्या कारणांमुळे अपयश येतंय?

टोळधाड
    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

सध्या भारतामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये डझनभराहून अधिक टोळधाडी सक्रीय आहेत.

या टोळधाडी हरियाणातून आता उत्तर प्रदेशाकडे सरकत आहेत. काल सोशल मीडियावर गुरुग्राम, फरिदाबाद आणि दिल्लीतील काही परिसरांमध्ये या टोळधाडी आल्याचे व्हीडिओ आले होते.

भारतातील टोळधाड सूचना संस्थेचे उपसंचालक के. एल. गुर्जर यांच्या मते, सध्या डझनभराहून अधिक टोळधाडी सक्रीय आहेत. या टोळधाडी दररोज 100 ते 150 किमी प्रवास करत आहेत. साधारणतः एका टोळधाडीत किमान एक कोटी टोळ असतात. ते एकाचवेळी दोन ते तीन किलोमीटर प्रदेशात पसरू शकतात.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "सध्या टोळ राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा यांच्या काही भागात आहेत. सर्वांत जास्त टोळ राजस्थानात आहेत. आता ते उत्तर प्रदेशात घुसले आहेत."

टोळधाड

फोटो स्रोत, BANARAS KHAN/AFP VIA GETTY IMAGES

ते म्हणतात, "या टोळधाडीचं क्षेत्र एक ते तीन किमी इतके आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तापमान वाढल्यामुळे ते जास्त अॅक्टिव्ह झाल्याचं दिसून येतं. त्यातील बहुतेक टोळ तरुण, अपरिपक्व आहेत. त्यामुळे त्यांच्यावर स्प्रे मारला की ते लगेच उडून जातात. म्हणूनच पन्नास टक्के टोळांवरच आम्ही नियंत्रण आणू शकलो आहोत."

गुर्जर सांगतात, "पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे या धाडी पूर्वेच्या दिशेने सरकत आहेत आणि दररोज 100 ते 150 किमी प्रवास करत आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा आणि बुलंदशहराच्या दिशेने टोळधाडी गेल्या आहेत. या धाडी पश्चिम उत्तर प्रदेशातील इतर शहरांमध्ये जाणार नाहीत, मात्र आग्रा, बुलंदशहराच्या दिशेने प्रवास करतील."

तापमान आणि वाऱ्याचे अडथळे

डॉ. गुर्जर म्हणतात, "तापमान आणि सध्याच्या वातावरणामुळे टोळधाडीवर नियंत्रण आणण्यात अडथळे येत आहेत. जर तापमान कमी असेल तर टोळांची मेटॅबॉलिक अॅक्टिव्हिटी थोडी कमी असते. तसं असतं तर त्यांच्यावर नियंत्रण आणता आलं असतं. सध्याच्या पश्चिमेकडून येणारं वारंही या टोळांच्या पथ्यावर पडलं आहे. वाऱ्याच्या मदतीने ते सहज पुढे जातात. "

"टोळांनी काही भागामध्ये प्रजनन केल्याचंही आढळलं आहे. टोळांनी काही भागात दोन-चार दिवसांपूर्वी अंडी घातली आहेत, परंतु त्या प्रदेशात आम्ही नियंत्रण कार्य करत आहोत.

टोळधाड

फोटो स्रोत, VISHAL BHATNAGAR/AFP VIA GETTY IMAGES

टोळधाडीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारांमध्ये समन्वय ठेवून काम केलं जात आहे. केंद्र सरकारने साठ गट (टिम्स) तयार केल्या असून विविध राज्यांमधील गट आणि अग्निशमन दलही या नियंत्रण कार्यात काम करत आहेत."

ड्रोनचाही वापर

टोळांवर नियंत्रण आणण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात येत आहे. असा ड्रोनचा वापर पहिल्यांदाच होत असल्याचं गुर्जर यांनी सांगितलं. ड्रोनद्वारे होत असलेली फवारणी प्रभावी होत आहे.

ते म्हणतात, त्या प्रदेशात फवारणी करणं कठीण होतं त्या प्रदेशातही फवारणी करणं ड्रोनमुळे सोपं झालं आहे.

काही प्रदेशात पेरणी सुरू होणार आहे, काही ठिकाणी सुरूही झाली आहे. या प्रदेशाला सध्या जास्त धोका नाही असं गुर्जर म्हणाले.

ते सांगतात, "सध्या जिथं उभं पीक आहे त्या प्रदेशावर आमचं लक्ष आहे. तिथं टोळधाडीवर नियंत्रण आणण्याचे जास्त प्रयत्न सुरू आहेत. आता 10-15 टोळधाडी वेगवेगळ्या प्रदेशात अॅक्टिव्ह आहेत."

उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

उत्तर प्रदेशाच्या कृषी विभागाचे संचालक सोराज सिंह सांगतात, "टोळधाडीचे हल्ले पाहाता उत्तर प्रदेशात सर्व जिल्ह्यांमध्ये नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

आपत्ती निवारण कायद्यांतर्गत टोळधाड नियंत्रणासाठी कोषागारातील निधी वापरावा असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

टोळधाड

फोटो स्रोत, VISHAL BHATNAGAR/AFP VIA GETTY IMAGES

गोंगाट करुन, ढोल-नगारे आणि डबे वाजवून टोळांना पळवून लावण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात सर्व जिल्ह्यांमध्ये रात्री 11 ते सकाळी 7 या कालावधीत टोळनियंत्रणाचे कार्य करण्याचे आदेश दिले आहेत."

टोळ दिवसा प्रवास करतात आणि रात्री आराम करतात. टोळ जेव्हा विसावलेले असतात तेव्हा फवारणी करुन नियंत्रण कार्य केलं जातं.

सोराज सिंह यांच्यामते टोळ शनिवारी झाशी, जालौंन, अलीगड, संत कबीरनगर, सिद्धार्थनगर आणि गोरखपूर या जिल्ह्यांमध्ये होते.

उत्तर प्रदेशात मोठ्या टोळधाडींप्रमाणे काही लहान टोळधाडीसुद्धा सक्रीय आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)