सोयाबीन शेती : विदर्भ - मराठवाड्यात बियाणं उगवलंच नाही, महाबीज म्हणते, ‘शेतकऱ्यांनी घाई केली’

सोयाबीन शेतकरी

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेतकरी मुकुंद पुनसे यांनी 3 एकरात सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीनच्या पेरणीसाठी त्यांनी महाबीज कंपनीचं बियाणं खरेदी केलं. पेरणी करून आठ दिवस उलटून गेले असूनही बियाणं उगवलंच नाही. मुकुंद यांच्यावर आता दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.

यावर्षी पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी उत्साहानं पेरणी केली होती. त्यात मुकुंद यांनी 12 जूनला पेरणीला सुरुवात केली.

महाबीज आणि एक पोतं विक्रांत कंपनीच्या बियाण्यांची पेरणी केली. विक्रांत कंपनीचं बियाणं उगवलं मात्र सरकारी महाबीज कंपनीचं बियाणं उगवलंच नाही.

महाबीजनं मात्र त्यामागे वेगवेगळी कारणं असल्याचं म्हटलं आहे. तसंच ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यांना आम्ही बियाणे बदलून देत आहोत, असंही त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.

महाबीजच्या दोन्ही बॅगेतील बियाणं बोगस असल्याची तक्रार मुकुंद यांनी केली आहे. त्यांचं 50 ते 60 हजाराचं आर्थिक नुकसान झालं असून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुकुंद यांच्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ममदापूर, वरखेड, मारडा या गावातील अनेक शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचं सोयाबीन पेरलं असून ते उगवलं नसल्याची त्यांची तक्रार आहे.

कोरोना
लाईन

अकोला जिल्ह्यातील दिनेश शिंदे यांनीही बारा एकरात महाबीज सोयाबीणची पेरणी केली. 13 तारखेला त्यांनी शेतात पेरणी केली. त्यांच्याही शेतात पेरलेलं उगवलंच नाही.

त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट आहे. सोयाबीनला अंकुरच फुटले नसल्याने त्यांनी आपलं संपूर्ण सोयाबीन पीक ट्रॅक्‍टरच्या साह्याने मोडून टाकलं. शिंदे यांच्याकडे आता दुबार पेरणीसाठी पैसेही नाहीत.

अमरावती विभागात महाबीज कंपनीचं बियाणं उगवलं नसल्याच्या 900 तक्रारी प्राप्त झाल्याचं कृषी विभाग सांगत आहे.

एकीकडे विदर्भात ही परिस्थिती आहे, तर मराठवाड्यातही सोयाबीनच्या बोगस बियाण्यांच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.

सोयाबीन शेतकरी

फोटो स्रोत, Nitesh Raut

परभणी जिल्ह्यातल्या आरवी गावातले सिद्धेश्वर कदम सांगतात, "15 जूनला 15 एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली. पण, अद्याप सोयाबीन उगवलं नाही. कृषी विभागाचे अधिकारी पंचनामा करून गेले पण अद्याप मदतीविषयी काहीच पावलं उचललेली नाहीत."

गावात सगळीकडेच ही परिस्थिती असल्याचं कदम यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, सदोष बियाणं तक्रारीची तातडीनं तपासणी करावी. त्यासाठी सोयाबीन शास्त्रज्ञ आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

महाबीजचं बियाणं त्वरित शेतकऱ्यांना बदलून द्यावं, अशाही सूचना भुसे यांनी दिल्या आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शेतकरी नेत्यांची भरपाईची मागणी

"आधीच कोरोना लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. या हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन बियाण्यांपैकी 80 टक्के बियाणे उगवलेच नाही. शासकीय कंपनी महाबीजसह अंकुर, ईगल या कंपन्यांचे बियाणे निकृष्ट निघाले आहे. या कंपन्यांवर तातडीने फौजदारी कार्यवाही करावी," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे.

शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे माणिक कदम यांनी म्हटलं आहे की, "परभणी जिल्ह्यातील जवळपास 40 टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सरकारनं या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 42 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी."

बियाणे बदलून द्या - सरकारचा आदेश

अमरावती विभागातून जवळपास 900 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याच विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे सांगतात.

सोयाबीनचं शेत

फोटो स्रोत, Nitesh

ते म्हणतात "सोयाबीनचं 13 लाख हेक्टर इतकं क्षेत्र आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसातच पेरणीला सुरवात केली. मात्र त्यानंतर 15 ते 16 जूनपासून पाऊस नाही. काही भागात पडला असला तरी बऱ्याच भागात पाऊस अनियमित आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रात पावसामुळे बियाणं उगवलं नाही त्यांच्या तक्रारी सुरू आहेत. नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी एसडीओ मार्फत समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचा अहवाल येत्या दोन दिवसात पूर्ण होईल."

"महाबीजच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असतील. तिथे महाबीजच्या अधिकाऱ्यांनी तातडीची भेट द्यायची आहे. शेतकऱ्यांकडे महाबीजच्या बियाण्यांची बिलं असली पाहिजेत. शेतकऱ्यांची खात्री झाल्यानंतर, त्या शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून शासनाच्या धोरणानुसार बियाणे तात्काळ बदलून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश सरकारनं दिले आहेत."

महाबीजचं म्हणणं काय?

महाबीजचे जनरल मॅनेजर डॉ. प्रफुल लहाने यांच्या मते, महाबीज कंपनी फक्त प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करते.

ते म्हणतात "महाराष्ट्र शासनाच्या बीज प्रमाणित यंत्रणेनुसार बियाण्यांची प्रक्रिया आणि चाचणी होते. त्यानंतरच त्याचा पुरवठा केला जातो. सोयाबीन नाजूक बियाणे आहे. त्यात सध्याची परिस्थिती कमी पाऊस असताना झालेली पेरणीची घाई आहे. पेरणीनंतर पावसामध्ये पडलेला खंडही एक कारण आहे.

जमिनीत कमी ओलावा आणि जमिनीचं जास्त तापमान. याचा उगम शक्तीवर झालेला परिणाम आहे. मजुरांच्या तुटवड्यामुळे ट्रॅक्टरने पेरणी करण्यात आली. ट्रॅक्टरांनी पेरणी केल्याने खोलवर बियाणे पडतात. तसंच बुरशी नाशक प्रक्रियेचाही अभाव आहे. उगवण क्षमता कमी असण्याचे हे प्राथमिक करण आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यांना आम्ही बियाणे बदलून देत आहोत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)