You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगाबाद कोरोना : बजाज प्लांटमध्ये 79 जणांना कोव्हिड-19, शहरातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे का?
औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. शहरातल्या वाळूज एमआयडीसी परिसरातल्या बजाज कंपनीत जवळ-जवळ 79 जणांना कोव्हिड-19 आजाराची लागण झाली आाहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून कंपनीत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. यापैकी दोघांचा मृत्यूही झाला आहे. आसपासच्या काही कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांमध्ये संसर्गाचा प्रसार झाल्याची भीती व्यक्त होतेय.
मोठ्या प्रमाणावर कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कारखाना शनिवारी आणि रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय कंपनी प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज कारखान्यात जाऊन तपासणीही केली
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
बजाज कंपनीतल्या 79 कामगारांना कोव्हिडची लागण झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी नेमका आकडा सांगता येत नाही, असं औरंगाबादमध्ये गेली अनेक वर्ष पत्रकारिता करणारे पत्रकार सिद्धार्थ गोदाम यांनी सांगितलं.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "बजाज कंपनीतले कामगार शहरातल्या वेगवेगळ्या भागात रहातात. मुकुंदवाडी, बजाजनगर हे असे काही भाग आहेत जिथे कंपनीतले कर्मचारी मोठ्या संख्येने राहतात. त्या-त्या भागातल्या कोरोनाग्रस्तांची स्वतंत्र नोंद झाली आहे. एका आकडेवारीनुसार जवळपास 150 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर जवळपास 200 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पण ही आकडेवारी अधिकृत नाही. त्यामुळे बजाज कंपनीतले नेमके किती कामगार पॉझिटिव्ह आहेत, हे सांगता येत नाही."
बजाज कंपनीतल्या परिस्थितीविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही बजाज ऑटोचे अधिकारी मुकुंद बडवे यांच्याशी संपर्क करून प्रतिक्रिया विचारली. तसंच जिल्हाधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
दरम्यान, केवळ बजाजच नाही तर इतर कंपन्यांमध्ये कामगारांना कोरोना झाल्या असण्याची दाट शक्यता असल्याचं औरंगाबाद महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ सहसंपादक प्रमोद माने यांचं म्हणणं आहे.
बीबीसीशी बोलताना प्रमोद माने म्हणाले, "औरंगाबाद शहरामध्ये कोव्हिड-19 आजाराचा प्रसार होत असताना बजाजने उत्पादन सुरू करायला नको होतं. जेव्हा मोठ्या प्रमाणावर कामगार येतात तेव्हा सोशल डिस्टंसिंग पाळलं गेलं नसावं. नियम केले आहेत आणि ते पाळले जात आहेत, असं सांगितलं जात असलं तरीसुद्धा नियम पूर्णपणे पाळून काम करणं शक्य झालं नसावं.
शिवाय शहरात मोठ्या प्रमाणावर आजार वाढतो आहे. त्याचा परिणाम कारखान्यांवर होणारच. बजाजमध्ये कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे वाळूज एमआयडीसी परिसरातल्या इतर कारखान्यांमध्येसुद्धा कोरोनाग्रस्त असणारच. बजाजने दोन दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्वच कंपन्यांनी काही दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा आणि परिस्थिती बघता तसा निर्णय घेतला जाईल, असं मला वाटतं."
औरंगाबादमधली परिस्थिती स्फोटक झाल्याचं काहींचं म्हणणं आहे. लॉकडाऊनच्या काळात दररोज 20-25 कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आढळायचे. मात्र, लॉकडाऊनमधले निर्बंध शिथील केल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळू लागले आहेत. रोज जवळपास 200 कोरोनाग्रस्तांची नोंद होतेय.
तज्या आकडेवारीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात 193 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. यापैकी 102 रुग्ण शहर मनपा हद्दीतले आहेत तर 91 रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. तर जिल्ह्यातल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्य आता जवळपास साडेचार हजाराच्या घरात पोहोचली आहे. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार 232 जणांचा मृत्यू झाला आहे.
मात्र, दिव्य मराठीने (गुरुवारी) एक बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 232 नाही तर 360 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही महिन्यात सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी ईलनेस म्हणजेच 'सारी' या आजारानेही थैमान घातलं होतं. या आजारामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 241 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 128 रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याचं आरोग्य प्रशासनाचं म्हणणं असल्याचं दिव्य मराठीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र, या 128 मृत्यूंची नोंद कोरोनाा मृत्यू म्हणून करण्यात आलेली नाही.
तर औरंगाबादमधली परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी भीती पत्रकार प्रमोद माने व्यक्त करतात. अनलॉकच्या काळात औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या तिप्पट झाल्याचंही ते सांगातात. शिवाय मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे.
प्रमोद माने म्हणतात, "प्रशासन मान्य करत नसलं तरी औरंगाबादमध्ये कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. मात्र, हे प्रशासन मान्य करत नाही आणि शासनही मान्य करत नाहीय. औरंगाबादमध्ये रुग्ण वाढत आहेत. तेव्हा आरोग्य यंत्रणेवर भार येणार. आजच विभागीय आयुक्तांनी सर्व खाजगी हॉस्पिटल चालकांची बैठक घेऊन त्यांना बेड उपलब्ध करून देण्याचं आवाहन केलंय. मात्र, तरीही ज्या पद्धतीने या आजार वाढतोय ते बघता हॉस्पिटल्स, बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स कमी पडणारच आहेत."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)