चंद्रकांत पाटीलः मला आणि फडणवीसांना कोणतीही टोपणनावं दिलेली चालतात का? #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. मला आणि फडणवीसांना कोणतीही टोपणनावं दिलेली चालतात का? - चंद्रकांत पाटील

भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी टीका केली होती. त्याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मला कोणतीही टोपणनावं दिली, आमच्याबद्दल काहीही बोललं तर राष्ट्रवादी काँग्रेसला चालतं का, असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

"गोपीचंद पडळकर समजूतदार कार्यकर्ते आहेत. त्यांचे शब्द चुकले. पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिलं नाही, हा पडळकर यांचा अनुभव असू शकतो. पण अनादर व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. याबाबत त्यांना फडणवीसांनी समजही दिली आहे. पण माझ्याबद्दल कुणीही काहीही बोलतं, फडणवीस आणि मला कोणतीही टोपणनावं ठेवली जातात.

शिवसेनेच्या अग्रलेखातही कशी भाषा असते. हे त्यांना चालतं का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रात काय चाललंय?", असं पाटील म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

2. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून लाखोंची देणगी - भाजपचा आरोप

काँग्रेस आणि चीनचे छुपे संबंध असून चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला लाखोंची देणगी दिली आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यासह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यातील भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये संघर्ष होऊन त्यात 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्याने केंद्र सरकारच्या चीन धोरणावर टीका करत आहेत.

इतकंच नव्हे तर नरेंद्र मोदी हे 'सरेंडर' मोदी असून त्यांनी चीनसमोर शरणागती पत्करल्याची टीकाही गांधी यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे दिले. काँग्रेसच्या कार्यकाळातच चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता.

भारतीय कायद्यानुसार कोणताही राजकीय पक्ष सरकारच्या परवानगीशिवाय विदेशातून पैसा स्वीकारू शकत नाही. मग काँग्रेसने चीनकडून पैसे स्वीकारताना सरकारची मंजुरी घेतली होती का, असा सवाल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केला.

तर राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने देणगी देणं धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जे. पी. नड्डा यांनी दिली. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

3. रुग्णालयाबाहेर झालेले 1 हजार मृत्यू अधिकृत आकडेवारीत नाहीत - फडणवीस

कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊनच्या काळात रूग्णालयाबाहेर झालेले सुमारे 1 हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखविण्यात आलेले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.

या पत्रात फडणवीसांनी म्हटलं, "मुंबईत रुग्णालयाबाहेर झालेल्या मृत्यूंची नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. याबाबत वॉर्ड अधिकारी आणि तत्सम प्राधिकरणांनी प्रमाणपत्र दिलं आहे. पण हा आकडा अजून जाहीर करण्यात आलेला नाही. सुमारे 1 हजार मृत्यूंची अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

प्राथमिक संकलनात आतापर्यंत 450 मृत्यूंची नोंद झाली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर 72 तासांत नोंद होणं आवश्यक आहे. पण ही संख्या एकदम जास्त दिसू नये यासाठी रोज थोडे-थोडे करून नोंद केली जात आहे. हे चुकीचं आहे." ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या मृतांबाबत माहिती लपवल्याची तक्रार याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर सरकारनं पुढील आकडेवारीत मृतांची संख्या जाहीरही केली होती.

4. देशातील रेल्वेसेवा 12 ऑगस्टपर्यंत तरी पूर्ववत नाही

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशातील सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून श्रमिक स्पेशल किंवा 200 स्पेशल ट्रेन धावत आहेत. पण सध्या तरी 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेसेवा पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाही, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.

रेल्वेने नुकतंच एक परिपत्रक आपल्या सर्व परिमंडळांना पाठवलं. यापूर्वी 30 जूनपर्यंतचे सर्व तिकीट बुकींग रद्द करण्यात आले होते. ही तारीख आता 12 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला आहे. या कालावधीत सर्व बुकींग रद्द करण्यात आल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं. म्हणजेच 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेचा नियमित प्रवास करता येणार नाही.

रेल्वेच्या कोणत्याही गाड्या पूर्वीप्रमाणे या तारखेपर्यंत तरी सुरू होणार नाहीत. शिवाय या तारखेपर्यंत तिकीट बुकींग केलेल्या प्रवाशांना तिकिटाची 100 टक्के रक्कम परत मिळणार आहे. ही बातमी दैनिक लोकमतने दिली आहे.

5. दिल्लीच्या हॉटेलांमध्ये आता चिनी नागरिकांना प्रवेश बंद

दिल्लीतील कोणत्याही हॉटेल, गेस्ट हाऊस किंवा रेस्टॉरंटमध्ये चिनी नागरिकांना प्रवेश न देण्याचा निर्णय कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेने घेतला आहे. भारत-चीन सीमेवर चीनच्या कृत्याविरोधात हा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेनं सांगितलं आहे.

यानुसार दिल्लीत कोणत्याही हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये चिनी नागरिकाला राहता येणार नाही. दिल्लीत सुमारे 3 हजार बजेट हॉटेल असून इथली खोल्यांची संख्या सुमारे 75 हजार असल्याचं संघटनेनं कळवलं.

शिवाय चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आल्याची माहितीही हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशनचे महामंत्री महेंद्र गुप्ता यांनी सांगितलं. ही बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)