कोरोना लॉकडाऊनः मुस्लीम कुटुंबात 40 वर्षं राहून पंचूबाई परतल्या घरी

पंचूबाई

फोटो स्रोत, ANOOP DUTTA/BBC

    • Author, अनुप दत्ता
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, मध्यप्रेदश
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मध्य प्रदेशातल्या बुंदेलखंडमधल्या दामोह जिल्ह्याने धार्मिक सलोख्याचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे.

इथल्या एका गावातल्या मुस्लीम कुटुंबाने एक, दोन नव्हे तर तब्बल 40 वर्ष एका अनोळखी, मानसिकरित्या दुर्बल हिंदू महिलेला आपल्या घरात ठेवून त्यांचा सांभाळ केला आणि अखेर त्यांच्या कुटुंबाला शोधून काढलं.

17 जून रोजी दुपारी जवळपास अडीच वाजता कोटातला गावातल्या एका तीन खोल्यांच्या घरासमोर गर्दी जमली होती.

घरासमोरच्या जांभळाच्या झाडाखाली अनेकजण एक गाडी येण्याची वाट बघत उभे होते.

लाल रंगाच्या गाडीला महामार्गापासून जवळपास एक किलोमीटर दूर असलेल्या गावातलं हे घरं शोधायला वेळ लागला नाही आणि अडचणही आली नाही. गाडी गावात येताच गावकऱ्यांनीच त्या घराचा रस्ता दाखवला.

हे घर दिवंगत नूर खान यांचं आहे. नूर खान आधी दगड नेणारे ट्रक चालवायचे आणि गावात दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात रहायचे. पुढे त्यांनी हे घर बांधलं. इथे त्यांचा मुलगा इसरार आई आणि इतर कुटुंबीयांसोबत राहतात.

कोरोना
लाईन

तिकडे गाडीतून उतरणाऱ्या प्रत्येकाकडे गावातल्यांचं लक्ष लागून होतं.

कारमधून नागपूरमधल्या वर्धमान नगरमध्ये रहाणारे पृथ्वी भैय्यालाल शिंगणे, त्यांच्या पत्नी आणि मित्र रवी उतरले आणि घरात गेले.

आता खोलीतही बरेच लोक होते. याच खोलीत 90 वर्षांच्या आजीही बसल्या होत्या. त्यांना त्यांची जन्मतारीखही आठवत नाही आणि कुटुंबातलंही कुणी आठवत नाही.

गावात त्यांना 'अच्छन मावशी' म्हणून सगळे ओळखतात. तब्बल 4 दशकांनंतर त्या त्यांच्या कुटुंबीयांना भेटणार होत्या.

ही कहाणी आहे 40 वर्षांपूर्वी नागपुरातून बेपत्ता झालेल्या पंचूबाई यांची.

फ्लॅश बॅक - जानेवारी, 1979

पुढची कहाणी ट्रक ड्रायव्हर नूर खान यांचे चिरंजीव इसरार यांच्याकडून ऐका.

"माझ्या जन्माच्या थोड्या दिवसांनंतरची ही गोष्ट आहे. एक दिवस अब्बा ट्रक चालवत दामोह बस स्टँड समोरून जात होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका महिलेकडे गेलं."

आपल्या अब्बांकडून ऐकलेली गोष्ट इसरार सांगत होते.

"जवळ गेल्यावर कळलं की त्या महिलेला मधमाशा चावल्या होत्या. ट्रकमध्ये बसलेल्या इतर मजुरांच्या मदतीने अब्बांनी त्यांना घरी आणलं. तेव्हापासून अच्छन मौसी आमच्यासोबतच आहेत."

पंचूबाईंना घरी घेऊन येणारे नूर खान

फोटो स्रोत, ANUPDUTTA/BBC

फोटो कॅप्शन, पंचूबाईंना घरी घेऊन येणारे नूर खान

गेल्या 40 वर्षांत नूर खान यांनी पंचूबाई यांच्या कुटुंबाला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना मानसिक आजार होता. शिवाय, त्यांना फक्त मराठी बोलता येत होतं. त्यामुळे त्या घरचा पत्ताही नीट सांगू शकत नव्हत्या.

ड्रायव्हर म्हणून काम करत असताना नूर खान जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रात जात ते अच्छन मावशीच्या कुटुंबीयांना शोधण्याचा प्रयत्न करत.

इसरार सांगतात, "अब्बांच्या निधनानंतर आम्ही बरेचदा फेसबुक, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अच्छन मौसीचा फोटो टाकून त्यांच्या कुटुंबीयांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण, उपयोग झाला नाही."

परसापूरचा उल्लेख

मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक आशेचा किरण दिसला.

एका स्वयंसेवी संस्थेत रिसेप्शनिस्टची नोकरी करणारे इसरार सांगतात, "5 मे रोजी सकाळी जवळपास साडेआठ वाजता आम्ही नेहमीप्रमाणे चहा घेऊन अच्छन मौसीच्या खोलीत गेलो. अम्मी खोली झाडत होती आणि काम करता करता मौसीशी गप्पा मारत होती. मीसुद्धा चहाचा कप घेऊन तिथेच उभा होतो. बोलता-बोलता मौसी परसापूर म्हणाल्या. मी त्यांच्या तोंडून परसापूर शब्द पहिल्यांदाच ऐकत होतो. मी लगेच गुगलवर शोधलं. मला कळालं की हे एका गावाचं नाव आहे आणि ते महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यात आहे."

मग इसरार यांनी प्रयत्न केला आणि त्यांचं परसापूरच्या कनिष्का ऑनलाईन संस्थेच्या अभिषेक यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. त्यांनी अभिषेक यांना अच्छन मौसीविषयी सांगितलं.

पंचूबाई कुटुंबीय

फोटो स्रोत, ANUPDUTTA/BBC

दोघांनी ठरवलं की इसरार अच्छन मौसी यांचा एक व्हीडिओ तयार करून तो अभिषेक यांना पाठवले आणि अभिषेक तो व्हिडियो परसापूरमधल्या तमाम मोबाईल यूजर्सपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.

इसरार सांगतात, "एक दिवस उलटल्यावर मी मौसीचा एक व्हीडिओ बनवला आणि अभिषेकला पाठवला."

परसापूरहून अभिषेक यांनी बीबीसीला सांगितलं, "व्हीडिओ आणि फोटो येताच मी गावातल्या, शेजारच्या वाडी,वस्त्या, समाज आणि सांस्कृतिक मंडळांच्या ग्रुपवर ते पाठवलं. अवघ्या दोन तासात मला आणि जवळपास निम्म्या परसापूरला कळलं की या आजीचं आजोळ अंजनानगरमध्ये आहे."

काही दिवसांनंतर नागपूरच्या पृथ्वी भैयालाल शिंगणे यांचा इसरार यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की फोटोत दिसणारी महिला त्यांची आजी आहे.

40 वर्षांपूर्वी पंचूबाई दामोहला कशा पोहोचल्या?

पंचूबाई यांचे नातू नागपूरच्या वर्धमान नगरमध्ये रहाणारे पृथ्वी शिंगणे यांनी बीबीसीला सांगितलं, "माझी आजी पंचूबाई नागपूरहून दामोहला कशा गेली, हे तर माहिती नाही. पण, मला हे माहिती आहे की माझे वडील भैय्यालाल शिंगणे यांनी 1979 साली लकडगंज पोलीस स्टेशनात त्यांची आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती."

पृथ्वी यांनी त्यांच्या आईकडून आजी बेपत्ता कशी झाली, याबद्दल ऐकलं होतं. ते सांगतात, "आई सांगायची 22-30 जानेवारी 1979 दरम्यान वडील त्यांच्या आईला उपचारासाठी नागपूरला घेऊन गेले होते. ते एका घरी थांबले होते. पण, एक दिवस अचानक आजी त्या घरातून गायब झाली. बरंच शोधलं. पण आजी सापडली नाही. मग वडिलांनी लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतरही आजी सापडली नाही."

पृथ्वी शिंगणे सांगतात की आजीला मानसिक आजार असूनही त्या 40 वर्षं एका कुटुंबासोबत होत्या, हे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही, तर इसरार म्हणतात, "अच्छन मौसी माझ्या अब्बांना भैया आणि अम्मीला कमला भाभी म्हणायची."

"पृथ्वी यांच्याशी बोलल्यावर कळलं की कमला अच्छन मौसीच्या भावाच्या बायकोचं नाव होतं. मौसीच्या भावाचं नाव चतुर्भुज आहे आणि ते परसापूरच्या अंजना नगरला रहायचे."

'अच्छन मौसी'च्या कुटुंबाला शोधता आलं, त्यांची भेट घडवून देता आली, याचा इसरार यांना अत्यानंद आहे.

वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं. येत्या 30 जूनला त्यांचा वाढदिवस आहे. पण, त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या वाढदिवसाला 'अच्छन मौसी' नसेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)