अजोय मेहता उद्धव ठाकरेंचे प्रधान सल्लागार होणार, मुख्यमंत्र्यासाठी ते इतके महत्त्वाचे का?

अजोय मेहता, संजय कुमार, महाराष्ट्र
फोटो कॅप्शन, अजोय मेहता
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

कोण आहेत अजोय मेहता?

अजोय मेहता यांनी आयआयटी बीएचयूमधून बीटेकची पदवी घेतली. यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) रूजू होण्याचे ठरवले. तसेच इंलंडमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे. 1984 च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. धुळे जिल्ह्यातून मेहता यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर नाशिक,अहमदनगर महानगरपालिकेचे ते आयुक्त होते. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच विविध विभागात सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मे 2019 पासून ते राज्याच्या मुख्य सचिव पदावर रूजू आहेत.

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे असं स्पष्टीकरण शिवसेनेकडून देण्यात आले आहे.

कोरोना
लाईन

उद्धव ठाकरेंसाठी अजोय मेहता महत्त्वाचे का ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रत्यक्षपणे प्रशासनात काम करण्याचा हा पहिलाच अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वाधिक जवळच्या प्रशासकीय पदावर काम करणारा अधिकारी त्यांच्या विश्वासातला असणं गरजेचे आहे. अजोय मेहता यांनी मुंबई महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम केलेले असल्याने शिवसेनेच्या कार्यपद्धतीची त्यांना कल्पना आहे.

"अजोय मेहता यांची प्रशासकीय कामावर चांगली पकड आहे. ते राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. शिवाय, राजकीय वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंधही आहेत. हेच अजोय मेहता यांचे कौशल्य आहे. अजोय मेहता असल्याने प्रशासनात नवख्या असलेल्या उद्धव ठाकरेंना कोरोना आरोग्य संकटात प्रशासकीय कामकाजात अपेक्षित अडचणींना सामोरे जावे लागले नाही," असं विश्लेषण मंत्रालयातील प्रशासन कव्हर करणारे पत्रकार संजय बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यात प्रशासन योग्यरित्या हाताळण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांत अजोय मेहता यांनी प्रशासकीय निर्णयांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले सल्ले त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले आहेत.

"अजोय मेहतांनी उद्धव ठाकरेंचा विश्वास संपादन केला. महानगरपालिकेत असताना शिवसेना विरुद्ध अजोय मेहता असं चित्र जरी आपल्याला दिसलं असलं तरी प्रत्यक्षात उद्धव ठाकरेंशी त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले होते." असंही बापट म्हणाले.

मुख्य सचिवपदासाठी खरं तर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सीताराम कुंटे यांच्या नावाचीही चर्चा होती. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले संजय कुमार आणि अजोय मेहता यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

"संजय कुमार यांची नियुक्ती झाली असल्याने अप्रत्यक्षपणे अजोय मेहताच मुख्य सचिव असणार आहेत," असंही बापट यांनी नमूद केलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा मेहतांना विरोध का ?

अजोय मेहता यांचा कार्यकाळ वाढवू नये अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची होती. अजोय मेहता त्यांचे ऐकत नसल्याच्या तक्रारीही मंत्र्यांकडून करण्यात आल्या होत्या. तसेच काही विभागांमध्ये ते थेट हस्तक्षेप करत असल्याच्या तक्रारी मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.

कोणत्याही खात्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत येण्यापूर्वी तो त्या खात्याच्या मंत्र्यांना दाखवावा लागतो. पण ही प्रक्रिया डावलली जात असून प्रस्ताव मंत्र्यांना न दखवता थेट मंत्रिमंडळ बैठकीत येत असल्याच्या तक्रारी काही मंत्र्यांकडून केल्या जात आहेत.

"सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव असल्याचे अशोक चव्हाणांनाच माहिती नव्हते, तर खरीप हंगामात गहू खरेदीचा प्रस्ताव थेट मंत्रिमंडळ बैठकीत आल्याने छगन भुजबळही नाराज होते. कोरोनामध्ये राज्यांतर्गत एसटी सेवा मोफत देण्यात निर्णय परस्पर बदलण्यात आल्याची तक्रारही मंत्र्यांकडून करण्यात आली," अशी माहिती वरिष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत याची चर्चाही करण्यात आली. अशा प्रशासकीय हस्तक्षेपामुळे फटका बसत असल्याचे उद्धव ठाकरेंना सांगण्यात आले. अजोय मेहता यांना मुदतवाढ देऊ नये अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांची मागणी होती.

"असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अजोय मेहतांना विरोध नाही," असंही भातुसे म्हणाले. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटात प्रशासनावरील पकड कमकुवत होऊ नये असाही प्रयत्न वरिष्ठ नेत्यांचा असल्याचे दिसते.

अजोय मेहतांवरुन महाविकास आघाडीत फूट ?

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजोय मेहतांची प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक केली. या निर्णयाचे पडसाद महाविकास आघाडीत उमटतील का असाही प्रश्न उपस्थित होतोय?

एकाबाजूला मुख्य सचिव संजय कुमार आणि दुसऱ्या बाजूला माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता या दोन पदांमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरही संभ्रम आहे. शिवाय, मंत्र्यांच्या नाराजीलाही उद्धव ठाकरेंना सामोरे जावे लागणार आहे.

अजोय मेहता हे शरद पवारांच्याही जवळचे मानले जातात. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना अजोय मेहता त्यांचे पीएस होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)