देवेंद्र फडणवीसांच्या शरद पवारांबद्दलच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शांत का?

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"ज्यावेळी शिवसेना सोबत येत नाही, हे आमच्या लक्षात आलं, तेव्हा आमच्यासमोर कोणते पर्याय असू शकतील, याचा आम्ही विचार केला. त्यातल्या एका पर्यायात आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. म्हणजे अजित पवार नाही...थेट राष्ट्रवादी!"

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत स्वाभाविकपणे फडणवीसांना विधानसभा निवडणुकीतील सत्ता स्थापनेच्या डावपेचांसंदर्भात प्रश्न विचारले गेले. त्यावेळी फडणवीस यांनी हा खुलासा केला.

फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितलं, "यासंदर्भात योग्य त्या चर्चादेखील झाल्या होत्या. एका चर्चेत मी होतो. एकात मी नव्हतो. ज्या लेव्हलच्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो. आम्ही शांत बसलो होतो. दोन तीन दिवस असे होते की, आम्ही मनातून हे सरकार आपलं नसेल असं ठरवून टाकलं होतं. त्या तीन-चार दिवसांत कुठलीच कृती आम्ही केली नाही. "

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितलं, "पण त्या तीन-चार दिवसांनंतर अजित पवारांकडून आम्हाला फिलर आला. आमची त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी म्हटलं, की मला हे मान्य नाही.

जे शरद पवारांनी आधी सांगितलं होतं, त्यानुसार स्थिर सरकार भाजप आणि राष्ट्रवादीच देऊ शकतं, असं माझं आजही स्पष्ट मत आहे. पण जर पवारसाहेब शब्दावरुन आता बदलत असतील, तर हे तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही, असं मला वाटतं. यातून राज्याचं नुकसान होईल. म्हणून तुमच्यासोबत सरकार बनवायला मी तयार आहे."

कोरोना
लाईन

नेहमी माध्यमांसमोर बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर शांत आहेत. अनेक नेत्यांनी यावर बोलायला नकार दिला. थेट शरद पवार यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी बोट दाखवूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शांत का आहेत?

'त्या' दिवशी काय घडलं?

23 नोव्हेंबर 2019 च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांबरोबर असलेल्या संख्याबळापैकी जवळपास सर्वच आमदार शरद पवारांकडे परत आले. त्यामुळे अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि अवघ्या 80 तासात हे सरकार पडलं.

अजित पवार 'अनरिचेबल' झाले. राष्ट्रवादीमधल्या अनेक नेत्यांची अजित पवार हे आता पक्ष सोडून गेले असं वाटत होतं. आज राष्ट्रवादी पक्षचं नाही तर पवार कुटुंबातही फूट पडली, असं व्हॉट्सअॅप स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना योग्य वेळी बोलू, असं त्या म्हणाल्या. पण हे बोलताना त्या भावूक झाल्या.

देवेंद्र फडणवीस अजित पवार

फोटो स्रोत, ANI

या सर्व प्रकारानंतर आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. अजित पवार यांनी मी राष्ट्रवादीतच आहे आणि यापुढेही राहणार, असं ट्विट केलं. त्यामुळे पुन्हा राजकीय चक्रं फिरू लागली. अजित पवार पक्षात पुन्हा सक्रिय झाले.

त्याचवेळी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं, "योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन."

अजित पवार मागे का फिरले? सरकार स्थापनेचा प्रस्ताव कोणी दिला होता? याबाबत कोणीही समोर येऊन बोललं नाही. या घटनेला 7 महिने उलटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलंय.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन

देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना प्रतिक्रिया विचारली. याबाबत बोलण्यासाठी अनेकांनी नकार दिला. काहीजणांचे फोन बंद होते. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिली.

त्यांनी म्हटलं, 'फडणवीस याआधी सांगत होते की, शिवसेना राष्ट्रवादीशी चर्चा करतेय. आता ते सांगतायत राष्ट्रवादी आणि आमची चर्चा सुरू होती. हे काहीही असलं तरी शरद पवारांनी भाजपबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला हे आजचं सत्य आहे. आमचं तीन पक्षाचं सरकार चाललंय हे देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वीकारलं पाहिजे. याआधीच्या गोष्टींमध्ये कोणाला रस नाही'.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

याव्यतिरिक्त अन्य प्रश्नांवर नवाब मलिक यांनी बोलणं टाळलं.

महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र एकत्रितपणे सत्ता स्थापनेची ऑफर मोदींनी आम्हाला दिली होती पण नम्रपणे मी ती नाकारल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या बोलण्यात विसंगती जाणवतेय.

ही विसंगती असली तरीही देवेंद्र फडणवीस चुकीची माहिती देत असल्याचं एकाही राष्ट्रवादीच्या नेत्याने ठामपणे सांगितलं नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची गोची?

महाराष्ट्रात घडलेल्या त्या राजकीय घटनांवर आधारित असलेलं 36 DAYS : A Political Chronicle of Ambition, Deception, Trust and Betrayal या पुस्तकाचे लेखक कमलेश सुतार सांगतात, "अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. जेव्हा अजित पवार यांनी बंड केलं होतं तेव्हाही यावर पक्षातले कोणी नेते बोलत नव्हते.

याचं कारण ते पक्षाच्या नेत्याने केलेल्या बंडापेक्षा पवार यांच्या कुटुंबात झालेलं बंड होतं. त्यामुळे तेव्हाही अजित पवार यांच्यावर कोणीही भाष्य करायचं नाही असं नेत्यांनी ठरवलं होतं. ती घटना म्हणजे पवार कुटुंबीयांसाठी नाजूक विषय होता. त्यामुळे तेव्हाही कोणी राष्ट्रवादीचा नेता त्यावर बोलला नाही."

कमलेश सुतार पुस्तक

फोटो स्रोत, KAMLESH SUTAR

त्यानंतर अजित पवार आले. उपमुख्यमंत्री झाले आणि आजही ते राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची तेव्हाही कोंडी झाली होती आणि आजही ती परिस्थिती कायम आहे म्हणून राष्ट्रवादीचे नेते यावर भाष्य करणं टाळतायेत, असं कमलेश सुतार यांनी म्हटलं.

अजित पवार यांच्या जागी इतर कोणी नेता असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती, असं मत ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी म्हटलं.

"फडणवीस यांच्या मुलाखतीनंतर मीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना संपर्क केला. पण सर्वांनी यावर बोलण्यास नकार दिला. यामागे एक कारण असू शकतं- त्यावेळी झालेली चर्चा ही वरिष्ठ पातळीवर झालेली असेल त्यामुळे इतर नेत्यांना त्या चर्चेची कल्पना नसावी.

जर यावर कोणत्या नेत्याने माहितीअभावी भाष्य केलं तर भाजप आक्रमक होईल यातून राष्ट्रवादी पक्ष हा अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे नेते यावर बोलायला नकार देतायत. जर खुलासा करायचा असेल तर स्वतः शरद पवारच करतील असं सांगितलं जातं आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)