कोरोना मुंबई : लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी कोणाकोणाला?

लोकल ट्रेन

फोटो स्रोत, Twitter

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

मुंबईची लाईफ-लाइन समजली जाणारी लोकल पुन्हा रुळावर आलीये.

कोरोनाचा संसर्ग वाढण्याआधी लोकलमधून दररोज 70 लाख प्रवासी प्रवास करत होते. घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांचा दिवस ट्रेनच्या टाईमटेबल नुसार ठरायचा.

मात्र, ट्रेनमध्ये होणारी गर्दी, पाळता न येणारे सोशल डिस्टंसिंग याचा विचार करता, कोव्हिडचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात लोकल ट्रेन पूर्णत: बंद करण्यात आली होती.

लोकल सुरू झाली असली तरी, मात्र सर्वांनाच लोकलमधून प्रवास करता येत नाहीये. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनुसार मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने लोकल ट्रेन सुरू केली.

कोरोना
लाईन

मुंबईत कामासाठी ठाणे, पालघर जिल्ह्यातून हजारो लोक प्रवास करतात. त्यांना कामावर वेळेत येता यावं यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

दररोज एकूण 360 फेऱ्या

15 जूनपासून मुंबईच्या वेस्टर्न रेल्वेच्या 160 आणि मध्य रेल्वेच्या 200 अशा एकूण 360 फेऱ्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आल्या. या सेवांचा लाभ दररोज जवळपास लाखभर अत्यावश्यक कर्मचारी घेत आहेत. राज्य सरकारने दिलेल्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या लिस्टवरून रेल्वेने लोकल सेवा सुरू केली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

बीबीसी मराठीला पश्चिम रेल्वेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ओळखता यावे यासाठी रेल्वेने एक पत्र लिहून माहिती दिलीये, जेणेकरून स्टेशनवर कोणताही गोंधळ होवू नये.

लोककलमधून कोण प्रवास करू शकतं?

  • रेल्वे कर्मचारी
  • मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी
  • मुंबई, ठाणे, केडीएमसी, नवी मुंबई, पालघर या पालिकात काम करणारे कर्मचारी
  • पालिका शाळेत काम करणारे शिक्षक आणि पालिकेत कॉन्ट्रॅक्टवर असणारे कर्मचारी
  • महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीसांचे कर्मचारी
  • बेस्ट, स्टेट ट्रान्सपोर्ट कर्मचारी, एनएमएमटी, टीएमटी आणि केडीएमटीचे कर्मचारी
  • मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी
  • पॅथलॉजी लॅब आणि टेस्टिंग करणारे कर्मचारी

या यादीबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी म्हटलं, "पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक कर्मचाऱ्यांची कोणतीही लिस्ट बनवलेली नाही किंवा सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कोणत्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्याला प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी याबाबात स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना माहितीसाठी एक इंटर्नल कम्युनिकेशन पाठवण्यात आलं आहे. रेल्वेसेवा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे."

लोकल सेवा

फोटो स्रोत, Twitter

"राज्य सरकारने दिलेल्या लिस्टप्रमाणे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात आलीये. यात कोणतीही कॅटेगरी कमी किंवा जास्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचा स्टेशनवर गोंधळ होवू नये यासाठी पत्र पाठवण्यात आलंय. त्यामुळे, सरकारने माहिती दिलेल्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांशिवाय ज्यांना रेल्वे प्रवासाबाबत प्रश्न आहेत त्यांनी राज्य सरकार, महापालिका यांच्यामार्फत विनंती करावी," असं भाकर यांनी पुढं म्हटलं.

तिकीट किंवा पास कसा मिळणार?

मुंबईत सुरू करण्यात आलेली लोकल ही फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे इतरांना तिकीट दिलं जात नाही. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यानंतर तिकीट दिलं जातं.

बीबीसीशी बोलताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी म्हटलं, "अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच लोकलमध्ये प्रवेश दिला जातो. लोकल सुरू झाल्यापासून जवळपास 2.8 लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा झालाय. दिवसाला 35 ते 40 हजार प्रवासी मध्य रेल्वेच्या गाड्यांचा वापर करतात."

लोकल

फोटो स्रोत, Getty Images

मुंबई लोकल म्हणजे भयानक गर्दी, बाहेर लटकलेले प्रवासी, ट्रेनमध्ये चढण्यासाठी उडालेली झुंबड आणि प्रवाशांची धक्काबुक्की ही दृश्यं आपल्याला पहायला मिळतात. मात्र, कोरोनाकाळात परिस्थिती बदललीये.

याबाबत बोलताना शिवाजी सुतार यांनी म्हटलं, "लोकलमधून प्रवासासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक करण्यात आलं आहे. स्टेशनवर विविध रंगांच्या मदतीने जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्मवर आणि तिकीट घराच्या परिसरात सर्कल, अॅरो, चौकोन (स्वेअर) आणि फूट स्टेप स्ट्रिप आखण्यात आल्या आहेत. जेणेकरून लोकं आखून दिलेल्या ठिकाणी उभे राहतील आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन होईल."

ट्रेन्सची संख्या

  • पश्चिम रेल्वेवर 120 फेऱ्या
  • मध्य रेल्वेवर 200 फेऱ्या
  • महत्त्वाच्या स्टेशनवर ट्रेन थांबणार
  • अत्यावश्यक सेवा देणारे 1.25 लाख कर्मचारी प्रवास करणार
  • पश्चिम रेल्वेवर 50 हजार प्रवासी
  • 1200 प्रवासी क्षमता असलेल्या ट्रेनमध्ये फक्त 700 प्रवासी
  • सोशल डिस्टंसिंगचं पालन होणार

काय आहेत आक्षेप?

रेल्वेसेवा अत्यावश्क सेवा देणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अनेकांचा यात समावेश करण्यात आलेला नाही असा आरोपही होतोय.

शिवसेना खासदार आणि माजी मंत्री अरविंद सावंत म्हणाले, "अत्यावश्यक सेवेत महानगर टेलिफोन, बीएसएनएल, टपाल सेवा, नेव्हल डॉक, माझगाव डॉकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश नाही. त्यामुळे त्यांनाही रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केलीये. या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवासासाठी ई-पास देण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे."

रेल्वेतून प्रवासासाठी अत्यावश्यक सेवांमध्ये बॅंक आणि पोर्ट ट्रस्ट कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. याबाबत बोलताना कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी सांगितलं, "मुंबईत लॉकडाऊन झाल्यापासून बॅंका सुरू आहेत. बॅंक अत्यावश्यक सेवा आहे. असं असताना बॅंक कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी का नाही? त्यांना का वगळण्यात आलं? याबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून बॅंक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळण्याची मागणी केलीये."

लोकल ट्रेन

फोटो स्रोत, Getty Images

"मुंबईत कामासाठी लोकं उत्तर ते दक्षिण असा प्रवास करतात. विरार, वसई, डोंबिवली सारख्या भागातून दक्षिण मुंबईत काम करणाऱ्यांची संख्या 50 टक्के आहे. या कर्मचाऱ्यांचं काय? सरकारने याबाबत विचार केला पाहिजे. एकीकडे अनलॉक करायचं पण प्रवासाचं साधन नसेल तर कर्मचारी येणार कसे?" असा सवाल विश्वास उटगी यांनी विचारला.

भाजप आमदार राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, बॅंक कर्मचाऱ्यांनाही लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)