You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन सीमा वाद : तुमच्या सरकारने तर न लढता चीनला भूभाग दिला होताः जेपी नड्डांचं मनमोहन सिंह यांना उत्तर
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या कार्यकाळात चीनने मोठ्या भूभागावर कब्जा केला होता, असं प्रत्युत्तर भाजपाने दिलं आहे.
पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डांनी म्हटलं, "शेकडो चौकिमी जमीन जेव्हा भारतानं चीनला दिली तेव्हा मनमोहन सिंह यांनी चिंता व्यक्त करायला हवी होती. त्यांच्या कार्यकाळात 2010-2013 या वर्षांमध्ये 600 वेळा घुसखोरी झाली होती."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
नड्डा यांनी मनमोहन सिंह यांच्याबरोबर त्यांच्या काँग्रेस पक्षालाही लक्ष्य केलं. ते म्हणतात, "ज्या पक्षानं 43,000 चौकिमी पेक्षा जास्त भारतीय भूमी चीनला दिली त्याच पक्षामध्ये डॉ. सिंह आहेत. यूपीए सरकारच्या काळात न लढता समर्पण केलं जाई. त्यांनी वारंवार आपल्या सैन्यदलांचं मनोबल खचवलं आहे."
भारत-चीन प्रश्नावर भ्रामक प्रचार आणि खोटेपणाच्या आडून सत्य लपवता येणार नाही अशी टीका मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्यानंतर नड्डा यांनी त्यांना उत्तर दिले आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत-चीन सीमा वादासंदर्भात आपली भूमिका मांडणारं पत्रक प्रसिद्ध केलं. यातून डॉ. मनमनोह सिंह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
15-16 जूनच्या रात्री चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे जे सैनिक शहीद झाले, त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको, असं डॉ. मनमोहन सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
"आपण इतिहासाच्या अत्यंत नाजूक ठिकाणी उभे आहोत. आपलं सरकार आता जे निर्णय घेईल आणि जी पावलं उचलेल, त्या निर्णयांवरून भविष्यातील पिढ्या आपल्याबद्दलचं आकलन करतील. त्यामुळे देशाचं आता नेतृत्त्वं करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे.
आपल्या लोकशाहीत ही जबाबदारी पंतप्रधानांवर असते. त्यामुळे देशाची सुरक्षा, सैन्य आणि भूभागीय हितावर प्रभाव पडणाऱ्या घोषणांबाबत पंतप्रधानांनी आपल्या शब्दांबाबत अधिक सावध राहिलं पाहिजे," असं मनमोहन सिंह यांनी मोदींना उद्देशून म्हटलं.
"एप्रिल 2020 पासून आजपर्यंत चीनने भारतीय सीमाभागातील गलवान खोरं, पँन्गॉग त्सो लेक इथे अनेकदा जबरदस्तीनं घुसखोरी केलीय," असं नमूद करत डॉ. सिंह पुढे म्हणाले, "चीनच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही. चीनसमोर झुकणार नाही आणि त्यांच्याशी कुठली तडजोडही करणार नाही."
"पंतप्रधानांनी चीनच्या षडयंत्राला बळ मिळेल, अशी वक्तव्य करू नयेत. शिवाय, हे प्रकरण अधिक चिघळणार नाही, यासाठी संपूर्ण सरकारनं एकीनं काम करावं," असा सल्ला डॉ. सिंह यांनी दिला.
यावेळी मनमोहन सिंह यांनी मोदींना कानपिचक्याही दिल्यात. ते म्हणतात, "भ्रामक प्रचार कधीच मत्सुद्देगिरी आणि कणखर नेतृत्त्वाचा पर्याय ठरू शकत नाही. खुशमस्करी करणाऱ्या नेत्यांच्या आडून सत्य परिस्थिती फार काळ लपवता येणार नाही."
आव्हानांचा सामना करण्याचं आवाहन मी पंतप्रधानांना करतो, असंही डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)