You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CSMT ला 132 वर्षे पूर्ण: मुंबईच्या जडण घडणीचा साक्षीदार असलेल्या सीएसएमटीची गोष्ट
- Author, रोहन टिल्लू
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
मुंबई शहराचा चित्रपटांमधला चेहरा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या म्हणजेच पूर्वाश्रमीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसच्या इमारतीला यंदा 132 वर्षं पूर्ण होत आहेत. जागतिक वारसा इमारतींच्या यादीत समावेश असलेल्या या इमारतीच्या भिंतींना वाचा फुटली तर...
'दिवसभर अव्याहत वाहतुकीने गजबजलेला समोरचा रस्ता शांत झाला, लाल-हिरवे-पिवळे होणारे रस्त्यावरच्या सिग्नलचे दिवे एकाच रंगात लुकलुकू लागले, 'प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर येणारी लोकल...' असं म्हणणाऱ्या बाईचा आवाज बंद झाला, सगळे प्लॅटफॉर्म ओस पडले की, मग मला कंठ फुटतो. दिवसभराच्या धकाधकीने दमलेली मी श्रांत क्लांत होऊन एक दीर्घ श्वास घेते.
समोर पालिकेची इमारतही आळोखेपिळोखे देत उभी असते. तिच्या बाजूला 'बोरीबंदरची म्हातारी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीतील रात्रपाळी करणारे कामगार मध्येच थोडा चहा घेण्यासाठी खाली उतरतात. रात्रीची मुंबई नि:शब्द होऊन सुस्तावलेली असते आणि त्याच वेळी मला कंठ फुटतो.'
'मी कोण? टाईम्स ऑफ इंडियाची इमारत म्हणजे बोरीबंदची म्हातारी असेल, तर मी त्या म्हातारीची मावशी! नाही ओळखलंत? अहो, असं काय करताय! मला खात्री आहे, तुमच्या आयुष्यात एकदा तरी तुमची आणि माझी भेट, निदान नजरानजर झाली आहे. प्रत्यक्ष झाली नसली, तरी मोठ्या पडद्यावर नक्कीच! तुमच्या त्या अमिताभ बच्चनच्या खालोखाल सगळ्यांत जास्त चित्रपटांमध्ये मी आहे. खोटं वाटत असेल, तर विचारा त्यालाच!'
'मोठ्या पडद्यावरच्या महानायकाला अरे-तुरे करणारी ही कोण आली टिकोजीबाई, असं तुमच्या मनात आलं असेल ना? चला, मग तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न! मुंबई म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? काय? महाराणीचा रत्नहार म्हणून ओळखला जाणारा मरीन ड्राईव्ह? अं.. थोडे लांब आहात. गेट वे ऑफ इंडिया? नाही, तरीही थोडेसे लांबच! अं.. बरोबर, आता तुम्हाला मी दिसतेय! मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत! तुमच्या आजोबांसाठी व्हिक्टोरिया टर्मिनस आणि त्यांच्याही वडिलांसाठी बोरीबंदर स्टेशन!'
'आता माझ्या अंगाखांद्यांवर लावलेल्या स्क्रीनमध्ये दाखवतात त्या जाहिरातीतल्या बाईसारखं 'चौंक गए?' असं विचारू का तुम्हाला? मी म्हटलं ना, सगळी मुंबई सुस्तावून नि:शब्द झाली की, मला कंठ फुटतो. त्यात आज माझा वाढदिवस. वाढदिवस म्हणजे जन्म नाही हं... तसा माझा जन्मदिवस होऊन एक महिना उलटला. पण आजच्या दिवशी प्रवाशांचे पाय माझ्या अंगाला लागले आणि माझ्या जीवात जीव आला. किती वर्षं झाली बरं? 132!'
'बाप रे. आत्ता हा आकडा वाचून माझी मीच गोंधळले. मी 132 वर्षांची झाले? या शहरातल्या सगळ्यांत जुन्या इमारतींपैकी मी एक असेन. तुम्ही म्हणाल, 132 वर्षांमध्ये ही बया काही बोलली नाही, मग आजच का बरं हिला बोलावंसं वाटलं? आहे, त्यालाही कारण आहे. देशभरात काय तो कोरोना की काही सुरू आहे, त्याची झळ मलाही बसली.
छान नातवंड-पंतवंडांच्या लडीवाळ बोलांनी, आवाजाने गजबजलेलं हसतं खेळतं घर अचानक शांत व्हावं, तसं काहीसं झालंय माझं. ही शांतता मला सहन होत नाही. सारं कसं शांत शांत झालं की, मग मला बोलावंसं वाटतं. फक्त मलाच नाही, माझ्यासारख्या सगळ्याच म्हाताऱ्यांना. कुठून करायची सुरुवात? सुरुवातीपासूनच करू या. बघू या, माझा जन्म झाला कसा!'
'सध्या देशभरात घराणेशाहीची जोरदार चर्चा सुरू आहे ना. मीसुद्धा घराणेशाहीचंच अपत्य आहे बरं का! माझं घराणं तर थेट विलायती! आमच्या घराण्याच्या जुन्याजाणत्या अनेक इमारती आजही लंडनमध्ये दिमाखाने उभ्या आहेत. पण मग लंडनच्या घराण्यातली ही बया इथे कुठे आणि कशी आली, असा प्रश्न तुमच्या मनात डोकावला असेल ना?'
'ती गोष्ट सुरू होते 1850च्या दशकाच्या सुरुवातीपासून. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राज्यकारभार सुरू केला. त्या वेळी व्यापारी बंदर म्हणून मुंबईचा विकास करायचा, ही खूणगाठ साहेबाने मनाशी बांधली. जॉन बर्कले नावाचा एक इंजिनीअर भारतात येतो काय, या अनोळखी प्रदेशात रेल्वेमार्ग बांधण्याचं काम सुरू करतो काय आणि अवघ्या काही वर्षात ते संपवतो काय, सगळंच अभूतपूर्व! या बर्कले साहेबांचा बर्स्ट म्हणजेच फक्त चेहरा असलेलं शिल्प माझ्या दक्षिणेकडेच्या भिंतीवर, म्हणजेच सध्या बेस्टच्या बसगाड्यांचा डेपो आहे तिथे बघायला मिळेल बरं का तुम्हाला!'
'या बर्कले साहेबाने बांधलेल्या मार्गावरून रेल्वे धावली 1853मध्ये. त्या वेळी माझा जन्म झाला नव्हता. पहिली गाडी सुटली, ती माझ्या आणि मशीद बंदर स्थानकाच्या मध्ये असलेल्या त्या वेळच्या बोरीबंदर स्थानकातून. असं म्हणतात की, ते छान छोटेखानी स्थानक होतं. पण लवकरच ते मोडकळीला आलं आणि एका मोठ्या इमारतीची गरज भासू लागली आणि माझ्या जन्माची तयारी सुरू झाली.'
'सर एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स हे माझे वडील. म्हणजे त्यांच्या डोक्यातून माझं रूप साकारलं. पण ते प्रत्यक्षात उतरवलंय ते आपल्याच मराठी माणसांनी. त्यापैकी एक होते रावसाहेब सीताराम खंडेराव वैद्य आणि दुसरे होते महादेवराव जनार्दन! या दोन कंत्राटदारांनी ठरलेल्या वेळेत मला जन्म दिला आणि मे 1888मध्ये मी जन्माला आले.'
'मला जन्माला घालणाऱ्या रावसाहेब वैद्यांबद्दलची एक आठवण आहे. माझा जन्म झाल्यानंतर माझ्या समोरच मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचं काम सुरू झालं. या इमारतीची कल्पनाही माझ्या वडिलांचीच आणि ती साकारली रावसाहेब वैद्यांनीच. पण गंमत म्हणजे ठरलेल्या वेळेआधी या इमारतीची 'डिलिव्हरी' झाली आणि ठरलेल्या रकमेपेक्षा खूप कमी खर्च आला. एका अर्थी प्री-मॅच्युअर डिलिव्हरी म्हणा ना..'
'तेव्हापासून आतापर्यंत मी अव्याहत उभी आहे. लंडनमधल्या माझ्या बहिणी सुखात म्हणायच्या. कारण त्यांना मुंबईसारखा मुसळधार पाऊस झेलावा लागत नाही. पण मीदेखील सुखीच आहे. कारण लंडनसारखी बोचरी थंडी इथे नसते.'
'अव्याहत उभी आहे, असं म्हणते खरी, पण माझ्यातही खूप बदल झालेत. दर काही वर्षांनी माझी रंगसफेदी होते. नुकतेच मोठ्ठाले पंखे आणून बसवले आहेत. काही वर्षांपूर्वी दिव्यांच्या झगमगाटाने मला दिपवून टाकलं. हे असं काही झालं ना की, तुमच्या घरच्या म्हातारीला उगाचंच ब्युटी पार्लरमध्ये नेऊन तिचा मेकअपक केल्यासारखं वाटतं बाई माझं मलाच.'
'माझ्या या उदरात असंख्य गमतीजमती दडल्या आहेत. माझ्या घड्याळाबद्दल तर तुम्ही खूप ऐकलं असेल. तसंच माझ्या पोटात असलेलं एक भुयार ही तुम्हाला ठाऊक असेल. माझ्या चारही कोपऱ्यांमध्ये गोलाकार जिनाही होता. तसंच दुसऱ्या मजल्यावर एक सुंदर अतिथीकक्ष देखील आहे.'
'इतकी वर्षं मी काय काय म्हणून नाही बघितलं, विचारा! गोरे साहेब बघितले. एत्तदेशीयांचं कल्याण व्हावं, म्हणून झटणारे जगन्नाथ शंकरशेट यांच्यासारखे दानशूर बघितले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे थोर स्वातंत्र्यसैनिक बघितले, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, अशा लोकांचे पाय लागण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं.'
'आणि असाच एक अभिमानाचा क्षण उगवला १५ ऑगस्ट १९४७ रोजी. दिल्लीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नियतीच्या कराराचं ते भाषण केलं. देश स्वतंत्र झाला. अगदी माझ्या पुढ्यातच स्वातंत्र्याचा तो उत्सव मी डोळा भरून बघितला होता. रोषणाई करून छान नटून-थटून तयार झाले होते मी.''1996 मध्ये मी व्हिक्टोरिया टर्मिनसची छत्रपती शिवाजी टर्मिनस झाले. अनेक वर्षं मानेवर असलेलं व्हिक्टोरिया राणीचं जोखड त्या दिवशी उतरलं. माझ्या या नावबदलावरून अनेक विनोदही झाले. टीकाही झाली. पण मला आजही या नावाचा अभिमानच वाटतो. अगदी तीन-चार वर्षांपूर्वी या नावात आणखी बदल होऊन ते झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!'
'सध्या जमाना तुमच्या सोशल मीडियाचा आहे ना. त्यात काय असतं तुमचं ते, 'most viewed' का काहीतरी! तर बच्चमजी, आतापर्यंत सगळ्यांत जास्त फोटो काढल्या गेलेल्या इमारतींपैकी मी एक आहे. मगाशी म्हटलं, तसं किती चित्रपटांमध्ये मी झळकले, याची काही गिनतीच नाही. पण धावती आगगाडी आणि मग पडद्यावर दिसणारी मी, हे झाल्याशिवाय तुमचा नायक गावावरून मुंबईत आला, हेच मुळात सिद्ध व्हायचं नाही एके काळी. आताचे नायक काय बाबा. गावावरून येतच नाहीत. ते येतात थेट अमेरिका किंवा गेलाबाजार युरोपमधून. असो!'
'इतक्या वर्षांमध्ये काय काय बघितलं नाही मी! 1982 साली निघालेला कामगारांचा विराट मोर्चा माझ्या अंगावरूनच पुढे गेला होता. काही वर्षांपूर्वी आझाद मैदानात झालेल्या रझाकारांचं थैमानही माझ्या डोळ्यांदेखत घडलं, मुंबईतली शेवटची ट्राम धावली, तीसुद्धा माझ्याच समोरून. मराठा आंदोलन असो किंवा दलितांचा मोर्चा, शेतकरी मोर्चा असो किंवा शिक्षकांचा मोर्चा, सगळं मी बघितलं. 1993च्या दंगलींनी मनावर केलेले ओरखडे अजूनही बुजता बुजत नाहीत.'
'अशीच एक भळभळती जखम झाली 26 नोव्हेंबर 2008 रोजी. अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने माझ्याच आवारात बेछुट गोळीबार सुरू केला. अनेक जण ठार झाले, कित्येक जखमी झाले. काही गोळ्या मीदेखील झेलल्या. ती रात्र मुंबई पूर्ण जागी होती आणि मी रडत होते. माझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या लेकरांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह बघून मी माझ्याही जखमा विसरले होते. पण ते दु:खं बाजूला सारून दुसऱ्याच दिवशी परत तुमच्यासाठी उभी राहिले.'
'का माहितीये? कारण अरे लेकरांनो, मला तुमची खूप सवय झाली आहे. तो अनाउन्समेंटचा आवाज, लोकल गाड्यांचा भोंगा, पटापट पडणारी तुमची पावलं, बुटपॉलिश करणाऱ्या पोऱ्यांच्या खोक्यावर ब्रश आपटण्याचे आवाज, रात्रीच्या अंधारात माझ्या आडोश्याला उभं राहून शरीरविक्रय करणाऱ्या त्या अभागी महिलांची कुजबूज, सगळं काही खूप सवयीचं झालंय. ते बंद पडलं की, माझा जीव घुसमटतो.'
'तसाच तो घुसमटला या लॉकडाऊनच्या काळात! 1972 साली झालेल्या रेल्वेच्या संपानंतर इतक्या दीर्घकाळ लोकल गाड्या बंद झालेल्या, मी तरी बघितल्या नव्हत्या. लांब पल्ल्याच्या गाड्याही जैसे थे होत्या. गाड्याच नाहीत, मग प्रवासीही नाहीत. कर्मचारीही नाहीत. कोलाहल नाही, आवाज नाही, काहीच नाही.'
'खरं सांगू? शेवटची लोकल मला सोडून गेली की, पहिली लोकल सुटेपर्यंत माझ्या अंगावर निराशेची अनेक पुटं चढतात. एकटेपणा खायला उठतो. मग पहिल्या लोकलची लगबग सुरू होते, पहिल्यामागून दुसरी निघते, तिसरी निघते, त्याच संख्येने गाड्या यायला लागतात आणि मग मला हवाहवासा कोलाहल सुरू होतो. त्या कोलाहलात माझ्या अंगावरची निराशेची पुटं गळून पडतात आणि चैतन्याची झिरझिरीत झालर चढते.'
'गेले तीन महिने मी एकटीने कसे काढले, माझं मला माहीत. आता पुन्हा लोकल सुरू झाल्या आहेत. लाऊडस्पीकरवरची ती बया पुन्हा कोकलायला लागली आहे. गाड्यांचे भोंगे त्या आल्याची किंवा निघाल्याची वर्दी देत आहेत. दोन-अडीच महिन्यांचा सक्तीचा एकांत संपलाय आणि माझ्या ओठांवर गाण्याची एकच लकेर आहे... अजून यौवनात मी...'
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)