You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन सीमावाद - 'सीमेवरील एकाही राष्ट्राशी सलोख्याचे संबंध नाही आणि जग जिंकायला निघाले', सामनातून टीका : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. सामनातून नरेंद्र मोदींवर टीका
"भारताच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत आणि आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचं आश्चर्य वाटतं. नेपाळने भारताचा नकाशा कुरतडला आहे. पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राइकनंतरही कायम आहे," असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
सोमवारी भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला आहे.
चीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे, पण नेपाळही भारताकडे वाकड्या नजरेने पाहात असेल, आव्हानाची भाषा करीत असेल तर जगाचा नेता, महासत्ता वगैरे होऊ पाहणाऱ्या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
"सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचं कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे, असं जाहीर सभांतून सांगितल्यानं टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे. 'गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो', असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे नरेंद्र मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले आहे त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल," असंही पुढे म्हटलं आहे.
2. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी व्हाही - जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, "मला असं वाटतं की सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. आपण एका प्रतिभावान अभिनेत्याला गमावलोय, जो बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी पाटणाहून आला होता. ज्या काही कथा ऐकायला मिळत आहेत, त्या खूप भयानक आहेत. कोणत्याही नवोदित कलाकारासोबत अशा प्रकारचा छळ नाही झाला पाहिजे."
सुशांतला चित्रपटांतून का काढण्यात आलं? त्याच्या चित्रपटांवर बंदी का घालण्यात आली, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. तसंच याप्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
3. भाजप नेत्याने जिनपिंगऐवजी जाळला किम जोंगचा पुतळा
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात चिनी सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
पश्चिम बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही मोर्चा काढून आणि चीनच्या नेत्यांचे पुतळेही जाळले. मात्र पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे चीनचा निषेध म्हणून पुतळा जाळताना भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून एक चूक झाली.
इथे पुतळा जाळण्यासाठी जमलेल्या भाजप नेत्यांना आपण कुणाचा पुतळा जाळायचा आहे याचीच माहिती नव्हती. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याचा पुतळा जाळला. आता या घटनेचा व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
4. बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारचा उपक्रम
बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारनं एक उपक्रम हाती घेतला आहे.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत सांगितलं की, "बेरोजगार तरुणांना राज्यातील उद्योगांमध्ये उपलब्ध रोजगार संधी तसंच उद्योजकांना राज्यातील विविध भागात उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाची माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाकडून mahaswayam.gov.in ही वेबसाईट लॉन्च करण्यात आली आहे."
आपलं महानगरनं ही बातमी दिलीय.
या वेबसाईटवर राज्यातील बेरोजगार तरुणांना नोंदणी करायची आहे, हा संपर्ण डेटा उद्योजकांनाही फायद्याचा ठरणार आहे. या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक आणि इतर माहिती यामध्ये तरुणांना नोंद करावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे एखादा उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते, असंही मलिक यांनी म्हटलं.
5. श्रीवर्धन तालुका पंधरा दिवसांनंतरही अंधारात
निसर्ग चक्रीवादळाच्या पंधरा दिवसांनंतरही श्रीवर्धन तालुका अंधारात आहे. तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आलेले नाही. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. विजेअभावी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
3 जूनला दुपारी 12 वाजता श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर धडकलेल्या चक्रीवादळानं तालुक्यात बहुतांश गावांना तडाखा दिला. हजारो घरांची पडझड झाली. घरांची छपरे उडाली. धान्य भिजलं. रस्ते वाहतूक आणि संपर्क यंत्रणा कोलमडली, विजेचे खांब आणि विद्युतवाहिन्या उद्ध्वस्त झाल्या.
त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. या घटनेला 15 दिवस उलटूनही नागरिकांचे हाल संपलेले नाहीत.
तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते एजाज हवालदार आणि स्थानिक रहिवासी अस्लम रईस यांनी दिल्याचं बातमीत म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)