सुशांत सिंह राजपूतचं नैराश्य व्यावसायिक स्पर्धेतून? मुंबई पोलिस करणार तपास #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. सुशांत सिंह राजपूतचं नैराश्य व्यावसायिक स्पर्धेतून? मुंबई पोलिस करणार तपास

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूसंदर्भात चौकशी होणार असून, व्यावसायिक स्पर्धा तसंच नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केली का? या मुद्यांची शहानिशा केली जाईल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

कंगना राणौतसह बॉलिवूडमधील काही कलाकारांनी सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा (घराणेशाहीचा) बळी असल्याची टीका केली होती आणि कोणीच त्याची दखल घेतली नसल्याचंही म्हटलं होतं.

हेअर स्टायलिस्ट सपना भवनानी यांनीही सुशांत काही समस्यांसोबत झगडत होता, असं म्हटलं.

सपना यांनी लिहिलं, की सुशांतसाठी गेली काही वर्षं कठीण होती, हे आता सगळ्यांनाच माहीत आहे. कोणीच सुशांतला साथ दिली नाही किंवा मदतीचा हात पुढे केला नाही. आज प्रत्येक जण ट्वीट करून दुःख व्यक्त करत आहे. यातूनच कळतंय, की ही इंडस्ट्री किती पोकळ आहे. इथे कोणीच तुमचा मित्र नाही.

छोट्या पडदा अर्थात मालिकांमध्ये नाव कमावल्यानंतर सुशांतने बॉलीवूडमध्ये आपली छाप उमटवली होती. 34 वर्षीय सुशांत रविवारी (14 जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी मृत स्थितीत आढळला होता. पोस्ट मॉर्टेम अहवालात, सुशांतने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. सोमवारी सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशांतला नैराश्याने ग्रासलं होतं असं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. व्यावसायिक स्पर्धेतून त्याला नैराश्य आले का याचा तपास केला जाईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

सुशांतने MS Dhoni: the untold story या चित्रपटात धोनीची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त शुद्ध देसी रोमान्स, राबता, केदारनाथ, सोनचिरैया अशा चित्रपटांमध्ये त्याने काम केलं होतं. त्याचे छिछोरे आणि ड्राईव्ह हे चित्रपटही प्रदर्शित झाले होते.

2. कोरोनासंदर्भात पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवार (16 जून) आणि बुधवार (17 जून) अशा दोन दिवशी ही चर्चा होणार आहे. इंडिया टुडेने ही बातमी दिली आहे.

कोरोना रुग्णांची संख्य कमी व्हावी यासाठीच्या उपाययोजना, उद्योगधंदे-व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात आराखडा याविषयावर बैठकीत चर्चा होऊ शकते.

कोरोनाचा मर्यादित फटका बसलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री मंगळवारी (16 जून) तर कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बुधवारी (17 जून) संवाद साधतील.

3. गांधीजींवरील पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारींचा प्रथम क्रमांक

महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या 'ढाई आखर' या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात हिंदी भाषेच्या गटात प्रथम पारितोषिक मिळालं. TV 9ने ही बातमी दिली आहे.

मुंबई टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक पी.सी. जगताप आणि सहाय्यक अधीक्षक एस.डी. खरात यांनी सोमवारी राज्यपाल कोश्यारींना 25 हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. प्रिय बापू अमर रहे या विषयावर पत्रलेखन स्पर्धा पाकीट आणि आंतरदेशीय या दोन प्रवर्गात झाली होती.

6 नोव्हेंबर रोजी भारतीय टपाल विभागाच्या मुंबईपेक्स या दुर्मीळ टपाल तिकीट प्रदर्शनाचं उद्घाटन कोश्यारी यांच्या हस्ते झालं होतं. त्यावेळी आपण या स्पर्धेत सहभागी होऊ, असं कोश्यारी म्हणाले होते.

4. उद्धव ठाकरे यांच्या सासऱ्यांचं निधन; तरीही घेतली शिक्षण विभागाची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचं सोमवारी (15 जून) निधन झालं. मुख्यमंत्र्यांनी दु:ख बाजूला सारून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतची बैठक घेतली.

आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. झी 24 तासने ही बातमी दिली आहे.

मुंबईतल्या अंधेरी इथल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये माधव पाटणकर यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते. मुख्यमंत्र्यांच्या दु:खात आपण सगळेच सहभागी आहोत, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.

5. कोरोना रुग्णांसाठी अँटिलिया ताब्यात घ्या

कोरोना रुग्णांसाठी जुन्या चाळीतील तसंच झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुनर्विकासानंतर तयार होत असलेली घरं ताब्यात घेण्याची योजना मुंबई महापालिकेनं रद्द करावी, मागणी मान्य न झाल्यास रहिवासी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया टॉवरमधील रिकाम्या फ्लॅटमध्ये घुसतील, अशा इशारा बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी आणि अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी दिला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

"या शहरात असंख्य टॉवर उभे राहिले आहेत. अनेक फ्लॅट्स गुंतवणुकीसाठी घेतले गेले आहेत. ते रिकामे असून ताब्यात द्या. मुंबईत अंबानी कुटुंबीयांची 22 मजली इमारत आहे. पाचजणांचं कुटुंब आहे, एका व्यक्तीला एक मजला दिला तरी 17 मजले उरतात. ते कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घ्या. महालक्ष्मीचे गोल्फ मैदान आहे. त्यांना उपनगरात जागा दिली आहे. कष्टकऱ्यांच्या घराचा ताबा घेतला तर अंबानींच्या अँटिलियामध्ये भाडेकरू, रहिवासी घुसतील," असं परिषदेनं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)