गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के, 5.5 रिश्टर स्केल तीव्रता #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के, 5.5 रिश्टर स्केल तीव्रता

गुजरातमध्ये रविवारी (14 जून) रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 5.5 एवढी तीव्रता नोंदवण्यात आली. कच्छ भागातल्या वोंध गावात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सुदैवाने या भूकंपात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दैनिक भास्करने ही बातमी दिली आहे.

19 वर्षांपूर्वी 26 जानेवारी 2001 रोजी कच्छमध्ये 7.7 क्षमतेचा तीव्र भूकंप झाला होता. त्यामध्ये 13 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

रविवारी कच्छमध्ये दहा सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. सौराष्ट्र, अहमदाबाद, राजकोट या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी भूकंपाचा फटका बसलेल्या भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

2. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला स्थान नाही- अशोक चव्हाण

ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला स्थान नाही अशी नाराजी माजी मुख्यमंत्री आणि आमदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. तिन्ही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. टीव्ही9ने ही बातमी दिली आहे.

महाविकास आघाडीतील धुसफूस थांबत नसल्याचं यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, असं काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात म्हणाले होते.

11 जून रोजी सुनील केदार यांच्या बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली होती. आमच्या मागण्या त्या राज्याच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं थोरात म्हणाले होते.

3. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून मनसेची वेबसाईट

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरी-व्यवसायाचे पर्याय खुले करून देण्यादृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक वेबसाईट तयार केली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं.

आमदार राजू पाटील आणि कल्याण ग्रामीण अध्यक्ष मनोज घरत यांच्या संकल्पनेतून ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. लोकमत न्यूज18ने यासंदर्भात बातमी दिली आहे. कुशल आणि अकुशल अशा दोन्ही वर्गातील मनुष्यबळाची मोठी गरज भासत आहे. परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात परतले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील बेरोजगार तरुणांना या वेबसाईटचा उपयोग होईल असं घरत यांनी सांगितलं.

4. ढोलताशांसह वरात काढणं पडलं महागात; नवरदेवासह वऱ्हाडींना अटक

वाजत गाजत वरात काढणं नवरदेव आणि मंडळींसाठी चांगलंच महागात पडलं आहे. मालाड पश्चिमेकडील मालवणीतील अंबुजवाडी इथं शुक्रवारी (12 जून) रात्री लग्नाची वरात काढण्यात आली. लॉकडाऊनमध्ये गर्दी करण्यास मनाई असतानाही वरात काढल्याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवासह एकूण 10 जणांना अटक केली.

वरातीतील गाडी आणि ढोलताशेही पोलिसांनी जप्त केले. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

5. 'संघ परिवार नेपाळमध्ये काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं'

संघ परिवार नेपाळवर काय भूमिका घेतो ते पाहायला हवं. नेपाळची जनता भारताबरोबर आस्था ठेवून आहे. चीनने भगव्या नेपाळचा रंग लाल केला हे त्यांना मान्य नाही. एक दिवस नेपाळी जनताच बंड करून काठमांडूवर पुन्हा हिंदुत्वाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. त्या नेपाळी जनतेला आत्मविश्वास देण्याची गरज आहे. संघ परिवारासमोर हे मोठे आव्हान आहे, अशा शब्दांत सामनानं अग्रलेखात नेपाळ प्रश्नावर भाष्य केलं आहे.

'नेपाळच्या सीमेवरून भारतात गोळीबार करण्यात आला. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर चकमकी सुरू असतात. आपले सैनिक त्याला प्रत्युत्तर देतात. नेपाळही गुरगुरू लागला असेल तर आक्रीतच म्हणावे लागेल. देशांच्या सीमेवर गोंधळाचेच वातावरण आहे. सर्वच सीमांवर तणाव आहे, त्यात आता नेपाळची भर पडावी याचे दु:ख आहे,' असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

नेपाळने नव्या नकाशात कालापानी, लिम्पियाधुरा, लिपूलेख हे प्रदेश आपले असल्याचे दाखवले आहे. घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला नेपाळच्या संसदेने एकमताने मंजुरी दिली आहे. इतके होऊनही पंतप्रधान, संरक्षणमंत्री नेपाळसंदर्भात काही बोलायला तयार नाहीत. नेपाळबरोबरचे संबंध उत्तम असल्याचं लष्करप्रमुख जनरल नरवणे सांगत आहेत, असं म्हणून नेपाळ भारतावर गुरगुरण्याच्या फंदात पडला नव्हता. नेपाळच्या अंगात चीनी ड्रॅगन संचारला असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलीये.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)