कोरोना : अरविंद केजरीवाल यांची कोव्हिड-19 चाचणी निगेटिव्ह

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ताप, खोकला अशी कोरोनासदृश लक्षणं जाणवत असल्यानं केजरीवाल यांची टेस्ट करण्यात आली होती.

सोमवारी (8 जून) ताप आल्यामुळे केजरीवाल यांचं घरातच विलगीकरण केलं. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली होती.

केजरीवाल यांनी स्वत:ला क्वारंटीन केलं असल्याने त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या.

दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

राजधानीतील खाजगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी केजरीवाल यांनी राज्य सरकार आणि काही खासगी मालकीची रुग्णालयं केवळ दिल्लीतील नागरिकांच्या उपचारासाठी उपलब्ध राहतील अशी घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील खासगी रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेवरून वाद निर्माण झाला होता. मात्र नायब राज्यपालांनी हा निर्णय रद्द केला होता.

दिल्ली सरकारने राज्याच्या सर्व सीमा खुल्या करण्याच्या निर्णय घेतला आहे. अन्य राज्यातील रुग्ण हे दिल्लीत उपचारासाठी येतील या भीतीने सुरुवातीला सीमाबंदीचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीत राज्य सरकारच्या मालकीच्या रुग्णालयातील दहा हजार खाटा स्थानिकांसाठी राखून ठेवल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये मात्र सर्वांना उपचार घेता येतील.

जून महिन्याच्या अखेरीपर्यंत राजधानीत पंधरा हजार खाटांची आवश्यकता भासेल. सध्या आमच्याकडे नऊ हजार बेड असून अन्य राज्यांना त्यांचा वापर करण्याची परवानगी दिल्यास ते देखील आमच्या हातून जाऊ शकतात, अशी भीती केजरीवाल यांनी व्यक्त केली होती.

हॉस्पिटल्सच्या मनमानीला चाप लावण्यासाठी दिल्ली सरकारतर्फे काही दिवसांपूर्वी अॅप लाँच करण्यात आलं होतं. मात्र अॅपवर हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध असतात, प्रत्यक्षात मात्र बेड उपलब्ध नाही असं सांगण्यात येतं असा आरोप काही नेटिझन्सनी सोशल मीडियावर केला होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)