कोरोना महाराष्ट्र: अजित पवार - शाळा 1 जुलैला सुरू करण्याचा विचार #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1) अजित पवार - शाळा 1 जुलैला सुरू करण्याचा विचार

महाराष्ट्रातील शाळा एक जुलैला सुरू करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं वाढताना दिसतोय. त्यात जूनमध्येच शाळा सुरू होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, स्वत: उपमुख्यमंत्र्यांनीच आता या चर्चांना पूर्णविराम दिलाय.

शाळा उशिरा सुरू झाल्यास बुडालेल्या दिवसांची भरपाई दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी कमी करून भरून काढण्याचा मार्गही सरकारच्या विचाराधीन असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या शिक्षण विभागानं पुढील शैक्षणिक वर्षातील दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा पर्याय सूचवला आहे. मात्र अभ्यास मंडळांनी या सूचनेला विरोध केलाय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

पुढील शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना किती कालावधी मिळणार, याबाबत संदिग्धता असल्यानं ही सूचना शिक्षण विभागानं केली होती.

2) 'श्रमिक एक्स्प्रेस' नव्हे, 'कोरोना एक्स्प्रेस' - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालमधील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय रेल्वेला जबाबदार धरलं आहे. भारतीय रेल्वे सध्या 'श्रमिक एक्स्प्रेस' नव्हे तर 'कोरोना एक्स्प्रेस' चालवतेय, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

ममता बॅनर्जींनी प्रश्न उपस्थित केला आहे की, भारतीय रेल्वे एकाच ट्रेनमध्ये हजारो लोकांना भरतेय. त्यापेक्षा अधिक ट्रेन का चालवल्या जात नाहीत?

"गेल्या दोन महिन्यांपासून पश्चिम बंगालनं कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवलं होतं. मात्र, आता स्थलांतरित मजूर येऊ लागल्यानं कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढू लागलीय," असं बॅनर्जी म्हणाल्या.

विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना आपापल्या राज्यात परत नेण्यासाठी भारतीय रेल्वेकडून 'श्रमिक स्पेशल ट्रेन' सुरू करण्यात आल्यात. आतापर्यंत लाखो मजुरांना भारतीय रेल्वेनं आपापल्या घरी पोहोचवलं.

3) GDP घसरला, 11 वर्षांतील सर्वात निच्चांकी स्तरावर पोहोचला

आर्थिक मंदी आणि कोरोना संकट यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगानं गेल्या 11 वर्षांतील सर्वात निच्चांकी स्तर गाठलाय. सांख्यिकी मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2019-20 मध्ये GDPचा दर घटला असून, 6.1 टक्क्यांवरून 4.2 टक्के झालाय. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

2019-20 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च 2020 दरम्यान GDPचा वेग घसरून केवळ 3.1 टक्के एवढाच राहिला.

भारतातल्या आठ कोअर इंडस्ट्रींचा निर्देशांक एप्रिल 2020 मध्ये एप्रिल 2019च्या तुलनेत 38.1 टक्क्यांनी घसरला. लॉकडाऊनमुळे कोळसा, स्टील आणि सिमेंट यांच्या उत्पादनात मोठी घट झालीय. स्टील उत्पादनात 83.9 टक्के आणि सिमेंट उत्पादनात 86 टक्के घट झाली.

कोरोना व्हायरसच्या संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे हे आकडे दर्शवतात. त्यात 24 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेत. त्यामुळे आगामी काळात अर्थव्यवस्थेबाबत आणखी चिंता व्यक्त करण्यात येतेय.

4) अरुण गवळीला कोर्टाचे आदेश - पुढच्या 5 दिवसात जेलमध्ये हजर राहा

कुख्यात गुंड अरुण गवळीला पुढच्या पाच दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहात हजर राहण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं दिलेत. पत्नीच्या आजारपणाचं कारण देत अरुण गवली पॅरोलवर बाहेर होता. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्याच्या पॅरोलमध्ये दोनदा वाढ करण्यात आली होती. मात्र, तिसऱ्यांदा पॅरोलला मुदतवाढ देण्यास कोर्टानं नकार दिलाय.

पॅरोलच्या काळातच अरुण गवळीच्या मुलीचा विवाहसोहळाही संपन्न झाला होता. या सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी शिक्षा भोगत आहे.

5) पोटच्या मुलानं मृतदेह नाकारला, मुस्लीम ट्रस्टनं केले अंत्यस्कार

हिंदू कुटुंबातील वृद्धाचा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं निधन झाल्यानंतर, पोटचा मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, काही मुस्लीम तरुण पुढे येत त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. अकोला जिल्ह्यात ही घटना घडली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराबाबत अनेक अडचणी येत आहेत. त्यात अनेक अफवाही पसरत आहेत. त्यामुळे अनेकजण नात्यातल्या व्यक्तीचा मृतदेह स्वीकरण्यासही तयार होत नाहीत. मात्र, अकोल्यातील मुस्लीम तरूणांनी माणुसकीचं दर्शन घडवलंय.

अकोल्यातील कच्ची मेनन जमात ट्रस्टमध्ये काम करणारे हे तरुण आहेत. ट्रस्टचे जावेद जकेरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धावर अंत्यसंस्कार केले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)