कोरोना: दरभंगामध्ये ज्योतीचे घर बनले पिपली लाईव्ह, झोप अपूर्ण तर जेवणही अवेळी

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"शौचालयासाठी आजपर्यंत म्हणजेच 26 मेपर्यंत तरी बाहेरच गेलो आहोत. घरी बांधकाम सुरू असलेल्या शौचालयाला आज दरवाजा बसवतील. कदाचित उद्यापासून बाहेर जावं लागणार नाही."

ज्योतीची आई फूलो देवी यांनी मला हे सांगितलं. यावेळी मला 2010 मध्ये आलेला सिनेमा 'पिपली लाईव्ह' ची आठवण झाली.

या सिनेमात नथ्था नावाचा एक शेतकरी आपल्या गरिबीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर मीडिया आणि राजकीय नेते नथ्थाला भेटण्यासाठी त्याच्या गावी गर्दी करतात. सिनेमाच्या शेवटी कुणालाही कळू न देत नथ्था गुरुग्राममध्ये मजुरी करताना दिसतो.

ज्योतीचे वडीलसुद्धा काही महिन्यांपूर्वीपर्यंत गुरुग्राम येथे बॅटरीवर चालणारी रिक्षा चालवत होते. आता ते दरंभंगात आले आहेत. तिथे, एक खोली असलेलं ज्योतीचं घर सध्या पिपली लाईव्हच्या सेटप्रमाणे दिसतंय.

या छोट्या घरात आता 40-50 लोकांचं येणं जाणं असतं...राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक संस्था, सरकारी अधिकारी हे सगळे ज्योतीला भेटण्यासाठी येत असतात. सरकारचे अपयश लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

मंडप बांधणार

भेट घेण्यासाठी लोकं येत असल्याने ज्योतीच्या घरातले आनंदात आहेत. पण कोरोनामुळे घाबरलेले सुद्धा आहेत. ज्योतीचे वडील मोहन पासवान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "पोखरजवळ मंडप बांधू, कारण घर खूप छोटं आहे. कोरोनाची भीती आहे. पण कुणाला येऊ नका असं सांगितलं तर आमच्यात अहंकार आल्याचं समजतील. त्यामुळे इकडे एक मंडप टाकला तर लोकं माझ्या मुलीला आशीर्वाद देतील."

ज्योती दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडातल्या सिरहुल्ली गावातली आहे. गुरुग्राम ते दरभंगा सायकलवर आपल्या वडिलांना घरी घेऊन येणाऱ्या ज्योतीची चर्चा गावात कोरोनापेक्षा जास्त आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग इकडे पाळलं जात नाहीये. नेते, मंत्री, संघटनेची लोकं, सरकारी लोकं इकडे येऊन ज्योतीला मिठाई देत आहेत. तिचा सन्मान केला जातोय. तिला नवीन कपडेही दिले जातायत.

ज्योती मास्क वापरुन सगळ्यांना भेटत असली तरी ती अजून होम क्वारंटाईनमध्ये आहे. पण लोकं अपेक्षित फिजिकल डिस्टंसिंग पाळत नाहीत. जेव्हा मी ज्योतीला विचारलं तेव्हा ती थकलेल्या आवाजात म्हणाली, "आम्ही कुणालाच काही बोलू शकत नाहीत. काय करणार ?"

जेवण, झोप अपूर्ण

सकाळी सात वाजल्यापासून ज्योतीच्या घरी लोकांची गर्दी जमण्यास सुरुवात होते. अगदी रात्री आठ वाजेपर्यंत लोक असतात. उकाडा होत असल्याने मोहन पासवान यांनी नवीन पंखा बसवला आहे.

ज्योतीची आई सांगते, "तिची झोप पूर्ण होत नाही. तिचे पोटभर जेवणही होत नाही. पण काय करणार ? ती न चीडता सगळ्यांशी आनंदात संवाद साधते."

ज्योतीने बीबीसीशी बोलताना सांगितले की तिला सगळ्यांना भेटून आनंद तर होतो पण झोप पूर्ण होत नाही. तसंच वडिलांनी तिला कुणीही नाराज होऊ नये म्हणून सगळ्यांचे फोन कॉल्स उचलायला सांगितले आहेत.

इंजिनिअर की डॉक्टर.. ज्योतीला काय बनायचं आहे?

15 वर्षांच्या ज्योती राजकीयकृत मध्य विद्यालयातून 2017 मध्ये आठवी पास झाली. त्यानंतर तिने शाळा सोडली. शाळेचे मुख्याध्यापक रत्नेश्वर झा यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "ज्योती एक सर्वसामान्य विद्यार्थिनी होती. शाळेतल्या इतर गोष्टींमध्येही तिचा फार सहभाग नव्हता. ती लाजाळू होती. पण आज शाळेला तिचा अभिमान आहे."

ज्योतीने नववी इयत्तेत प्रवेश घेऊन शाळा सोडल्याचं ज्योतीची आई सांगते. अंगणवाडीत काम करणाऱ्या फूलो सांगतात, "आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुलं ट्यूशनला जातात. पण तिला ट्यूशनला पाठवण्याइतके पैसे आमच्याकडे नाहीत. त्यामुळे तिने अभ्यास करणं सोडून दिलं.

पण आता बिहार सरकारकडून ज्योतीला नववी इयत्तेत प्रवेश दिला आहे. विविध संस्थांनी ज्योतीला इंजिनिअरींग, डॉक्टर, स्पर्धा परीक्षेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

ज्योतीमध्ये सायकलीस्ट बनण्याची क्षमता तपासण्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला ट्रायलसाठी दिल्लीला बोलवलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी ज्योतीच्या ट्रायलनंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला तिचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्योतीला मोठं होऊन काय बनायचं आहे यावर एका पत्रकाराच्या व्हिडिओसाठी सायकल चालवून आलेली ज्योती म्हणाली "जेव्हा शिक्षण पूर्ण होईल तेव्हा सांगेन. पण शिकून काहीतरी बनायचं आहे एवढं माहिती आहे."

सायकल फेडरेशन ऑफ इंडियाकडून ज्योतीने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. सायकलवर मोठं अंतर पार केल्याने ज्योतीच्या कमरेला दुखापत झाली आहे. यावर उपचार सुरू आहेत.

आमच्या मुलीला आम्ही कुठे कुठे पाठवायचे?

लोकांची गर्दी होत असल्यामुळे टिव्हीवर ज्योतीची बातमी कशी दाखवली जात आहे हे पाहायला सुद्धा तिच्या कुटुंबाकडे वेळ नाही. आपल्या मुलीला अनेक ठिकाणांहून बोलवणं आल्याने वडील संभ्रमात आहेत, "तिला कुठे कुठे पाठवायचे ? घर, नोकरी याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन सगळे देतात पण एक मुलगी कुठे कुठे जाईल?"

घरी नळाची सुविधा आणि चार सायकल

मुख्यमंत्री हर घर नल योजनेच्या अंतर्गत ज्योतीच्या घरी तीन नळ लावण्यात आलेत. तिला आतापर्यंत चार सायकली देण्यात आल्या आहेत. तर घरी शौचालय सुद्धा बांधून तयार आहे.

त्यांच्याकडे गॅस आहे पण पैसे नसल्याने अनेकवेळा जेवण चुलीवर बनतं.

ज्योतीला मिळालेल्या चार सायकलींपैकी एक स्पोर्ट्स सायकल आहे. स्थानिक आमदार संजय सरावगी यांनी तिला ही सायकल दिलीय. ज्योतीने गुरुग्राम ते दरभंगा येण्यासाठी जी सायकल वापरली ती मिळून घरात आता पाच सायकली झाल्या आहेत.

एवढ्या सायकलींचे काय करणार असा प्रश्न विचारल्यावर ज्योतीच्या आईने सांगितले, "गुरुग्राम ते दरभंगासाठी वापरलेली सायकल आम्ही सांभाळून ठेवणार कारण ती आमच्यासाठी महत्त्वाची आहे. इतर सायकल लहान मुलं चालवणार." ज्योतीची लहान बहीण मानसी पाचवी इयत्तेत शिकते, भाऊ दीपक तिसरीत शिकतो तर प्रियांशू आंगणवाडीत जातो.

बारावीपर्यंत शिकलेले मोहन पासवान सांगतात, "लोकं आर्थिक मदत करत आहेत पण अकाऊंटमध्ये किती पैसे जमा झालेत हे पाहिलेलं नाही. पण जेवढे पैसे आले असतील त्यातून मुलांचे शिक्षण पूर्ण करणार."

अभिमान आणि शरमेची बाब

15 वर्षांच्या ज्योतीने आपल्या वडिलांना कधी सायकल कधी ट्रकवर बसवून गावापर्यंत आणलं. या मुद्द्यावर सोशल मीडियावर लोकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. अनेकांना ज्योतीचा अभिमान आहे तर अनेकांना ज्योतीचा अभिमान आणि सरकारवर नाराजी आहे.

खरं तर ज्योतीच्या या सर्व परिस्थितीने व्यवस्थेचे वास्तव समोर आणले आहे. ज्योतीच्या घरी लोकांची गर्दी होत असली तरी आजही हजारो 'ज्योती' रस्त्यावर पायपीट करत आहेत. उपााशीपोटी रेल्वेच्या गर्दीत अत्यंत वेदनादायी प्रवास करत आहेत.

खासदार चिराग पासवान यांनी ज्योतीला राष्ट्रपती पुरस्कार देण्याची मागणी केलीय. तेजस्वी यादव यांनी तिचा शिक्षण आणि लग्नाचा खर्च करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर बिहार सरकार शक्य तितक्या सर्व योजनांअंतर्गत ज्योतीला मदत करत आहेत.

गेल्या आठ दिवसांत ज्योतीचं पूर्ण आयुष्य बदललंय. पण बिहारमध्ये जिथे 60 टक्के महिला अॅनिमियाग्रस्त आहेत तिथे बिहार सरकार अशाच प्रकार प्रत्येक मुली, महिलांच्या आयुष्यात असा बदल करू शकली असती तर?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)