You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई शहरात कोरोना व्हायरसचे अर्ध्याअधिक मृत्यू या पाच वॉर्डातून #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. मुंबईतले अर्ध्याअधिक मृत्यू या पाच वॉर्डांमधून
कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मृत्यूंची संख्या आता एक हजाराहून अधिक आहे. मुंबई शहराच्या 24 वॉर्डांपैकी 5 वॉर्ड असे आहेत जिथे सर्वाधिक मृत्यूची नोंद होत आहे. मुंबई शहरात होणारे 50 टक्यांहून अधिक मृत्यू हे या पाच वॉर्डातले असल्याची माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.
एल वॉर्ड म्हणजेच कुर्ला, साकीनाका याठिकाणी आतापर्यंत एकूण 154 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण रुग्ण 1,667 इतके आहेत.
इ वॉर्ड म्हणजेच भायखळा, मुंबई सेंट्रल याठिकाणी आतापर्यंत एकूण 129 जणांचा कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झालाय. तर एकूण रुग्णसंख्या 1,726 इतकी आहे.
एच ईस्ट म्हणजेच वांद्रे,सांताक्रूझ या भागात 116 जणांचा मृत्यू झाला असून 1,680 इतके रुग्ण आहेत.
एम ईस्ट म्हणजेच गोवंडी, मानखूर्द परिसरात आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला असून 1,140 रुग्णसंख्या आहे.
पाचवा वॉर्ड के ईस्ट म्हणजे अंधेरी पश्चिम परिसरात 103 जणांचा मृत्यू झाला असून 1,623 इतके कोरोनाचे रुग्ण आहेत.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
या डेटानुसार 57 टक्यांहून अधिक मृत्यू हे या पाच वॉर्डातले आहेत. पण कोरोनाचे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे या पाच वॉर्डातले नसून जी नॉर्थ वॉर्डमध्ये आहेत.
या वॉर्डअंतर्गत कंटेनमेंट झोन असलेला धारावी परिसर येतो. दोन हजारहून अधिक रुग्णसंख्येची नोंद या वॉर्डात असून 85 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.
2. चीन आक्रमक, लडाखजवळील धावपट्टीवर लढाऊ विमानं तैनात
लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला चीन आणि भारताचे सैन्य आमनेसामने आलं. लडाखमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून चीनकडून पँगाँग लेक परिसरापासून 200 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. लोकमत वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
या भागात विमानतळ असून तिथे चीनकडून बांधकाम सुरू असल्याची दृश्य सॅटेलाईटच्या माध्यमातून समोर आली आहेत. भारताकडूनही अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आलाय.
तिबेटमधल्या नगरी गुन्सा विमानतळावर चीनकडून दुसरी धावपट्टी बांधण्याचे काम वेगात सुरू असल्याचे फोटो आहेत. लढाऊ विमानांसाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे.
3. अर्णब गोस्वामी प्रकरणी चौकशी
दोन जणांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध अलिबाग पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुरेसे पुरावे नसल्याने ही केस बंद करण्यात आली होती.
राज्य सरकारकडून या प्रकरणी पुन्हा एकदा चौकशीचे आदेश देण्यात आलेत. हे प्रकरण गृह विभागानं सीआयडीकडे सोपवल्याची माहिती गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.
मंगळवारी देशमुख यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
"अलिबाग पोलिसांनी या प्रकरणात योग्य तपास केला नसल्याची तक्रार आज्ञा नाईक यांनी माझ्याकडे केली आहे. अर्णब गोस्वामी यांनी त्यांचे पैसे थकवल्याची त्यांची तक्रार असून यामुळेच त्यांचे वडील आणि आजीने मे 2018 मध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आज्ञा यांनी केलाय. त्यामुळे आम्ही या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करत आहोत."
तर सर्व पैसे यापूर्वीच दिल्याचे स्पष्टीकरण रिपब्लिक टिव्हीकडून देण्यात आले आहे.
4. आरोग्य सेतू अॅप आता ओपन सोर्स, चूक शोधा लाख मिळवा
केंद्र सरकारने आरोग्य सेतू अॅप अँड्रॉईड वर्जनला आता ओपन सोर्स केले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी या अॅपचा वापर होत असताना आता डेव्हलपर्स या अॅपला मॉडिफाय करू शकणार आहेत. नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांनी मंगळवारी याची घोषणा केली.
15 दिवासांत 5 कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं तर 40 दिवसांत ही संख्या 10 कोटीवर जाऊन पोहोचली. 3 ते 17 दिवसांत या अॅपने 3 हजार हॉटस्पॉट ओळखले आहेत अशी माहिती अमिताभ कांत यांनी दिली.
या अॅपच्या डेटा सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या अॅपप्रकरणी आता बग बाऊंटी प्रोग्राम दिला जात आहे. म्हणजेच प्रोगॅमिंगमध्ये चूक शोधणाऱ्याला 1 लाख रुपयांपर्यंतचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. न्यूज 18 टेकने ही बातमी दिली आहे.
5. पोलीस हवालदाराची पोरगी IAS
सातारा जिल्ह्यातील बोरी गावातील स्नेहल धायगुडे उदयपूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर रूजू झाल्या आहेत. सातारा पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या नानासाहेब धायगुडे यांची मुलगी स्नेहलने मिळवलेल्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. लोकमत वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
2018 मध्ये IAS परीक्षेत स्नेहलचा 108वा नंबर होता. आता प्रशिक्षणानंतर स्नेहल उदयपूर जिल्ह्यात रूजू झाल्या आहेत. अवघ्या 22 व्या वर्षी स्नेहल आयएएस अधिकारी झाल्या. महाराष्ट्रातून सर्वात तरुण महिला अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला. स्नेहलची आई गृहिणी आहे, गावाकडे शेती सांभाळत तिने शिक्षण पूर्ण केले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)