कोरोना संकटासाठी पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी - सामना अग्रलेख #5मोठ्याबातम्या

सामना, विरोधक, कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सामनाने विरोधकांवर टीका केली आहे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. 'पॅकेचची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी'

"गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करावी लागेल. सरकारी रुग्णालयाची अवस्था भीषण आहे, कोणत्याही सोयीसुविधा नाहीत, मनुष्यबळ नाही, असं न्यायालय म्हणत आहे. महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालयं दोन महिन्यात उभी केली आहेत, त्या रुग्णालयात विरोधी पक्षांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्री गुजरातचा दौरा करून यावं, म्हणजे आपल्या तयारीची पूर्वकल्पना त्यांना येऊ शकेल. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळा आणत आहेत," असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

गुजरात हे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे राज्य आहे. कोरोना उपायांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतलं आहे. कोरोना युद्धातील अपयश विरोधकांना वाटत असेल तर त्यांच्या शरीरात द्वेषाचा वायू पसरला असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे, असं या अग्रलेखात पुढे म्हटलं आहे.

दरम्यान गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात मजुर अधिक मात्र गुजरातला ट्रेन दुप्पट देण्यात आल्याचं 'एबीपी माझा'च्या बातमीत म्हटलं आहे.

या राज्यातून सर्वाधिक ट्रेन्स सुटल्या

या राज्यात सर्वाधिक ट्रेन्स पोहोचल्या

परप्रांतीय मजुरांची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. महाराष्ट्राची लोकसंख्या गुजरातच्या दुप्पट आहे. गुजरातची लोकसंख्या 6.2 कोटी आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटीच्या आसपास आहे. असं असतानाही अन्य राज्यातील स्थलांतरित कामगारांसाठी सर्वाधिक ट्रेन्स गुजरातमधून सुटल्याचं रेल्वेच्याच आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

श्रमिक स्पेशल ट्रेन्सपैकी 853 ट्रेन गुजरातमधून रवाना झाल्या आहेत. राज्यातून 550 ट्रेन सुटल्या आहेत. गुजरातला महाराष्ट्राच्या तुलनेत 300 ट्रेन अधिकच्या मिळाल्या आहेत. 1 ते 25 मे या कालावधीत देशात 3060 श्रमिक स्पेशल ट्रेन्स सोडण्यात आल्या. 40 लाखाहून अधिक कामगार आपापल्या राज्यात परतले. मात्र यामध्ये गुजरातला झुकतं माप मिळाल्याचं स्पष्ट होतं आहे.

2. केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का? -पृथ्वीराज चव्हाणांची पीयुष गोएलांवर टीका

"पीयुष गोयल यांनी पदाची मर्यादा राखायला हवी. ते ट्वीटवरून उत्तर देतात. हे केंद्रीय मंत्र्याला शोभतं का? केंद्रीय मंत्र्याने कसं वागायला हवं? एकमेकांना दोष द्यायचा तर केंद्राचेही अनेक दोष आहेत," असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

पृथ्वीराज चव्हाण
फोटो कॅप्शन, पृथ्वीराज चव्हाण

राज्य सरकार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यात पृथ्वीराज यांनीही उडी घेतली आहे. टीव्ही9ने ही बातमी दिली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशी भाषा करू नये. त्यांना रोजगार निर्माण करता आला नाही म्हणून हे लोक महाराष्ट्रात आले. त्यांची राज्यात काळजी घेतली नाही. पण असं आरोप करून उत्तर मिळणार नाही, असं पृथ्वीराज म्हणाले.

3. पाच वर्षांच्या चिमुरड्याने एकट्यानेच केला दिल्ली-बेंगळुरू विमान प्रवास

लॉकडाऊन आधी बेंगळुरूचा पाच वर्षांचा विहान दिल्लीत आला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे तो दिल्लीतच अडकला.

सोमवारी देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोमवारी त्याने एकट्यानेच विमान प्रवास करत बेंगळुरू गाठलं. मटाने ही बातमी दिली आहे.

त्याची आई मंजरी शर्मा विहानला घ्यायला बेंगळुरू विमानतळावर आल्या होत्या. तीन महिन्यांनंतर आपल्या लेकराला पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे त्यांना विहानला कवेत घेता आलं नाही.

4. परवानगीधारक उत्पादकांकडूनच पीपीई किट घ्या - सरकारची नियमावली

सरकारने प्रमाणित आणि परवानगी दिलेल्या उत्पादकांकडूनच पीपीई किट स्वीकारा, असं नियमावलीत म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

बाजारात साधारण प्रतीचे पीपीई किट विकले जात आहेत. फसवणूक टाळण्यासाठी अधिकृत उत्पादकांकडून पीपीई किट घ्या असा सल्ला सरकारने दिला आहे. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

कोरोना
फोटो कॅप्शन, पीपीई किट

HLL लाईफकेअर लिमिटेड या संस्थेतर्फे पीपीई किट उत्पादकांच्या उपकरणांची तपासणी केल्यानंतरच त्यांना अनुमती देते. टेक्सटाईल मंत्रालयाच्या नियमाविहीन किटलाच परवानगी देण्यात येते.

5. राज्यात काही ठिकाणी टोळधाड

मध्य प्रदेश सीमेवरून हजारोंच्या संख्येने टोळ हे कीटक मोर्शी, वरूड आणि मेळघाटात दाखल झाले आहेत. ताशी 12 ते 16 किलोमीटरच्या वेगाने ही टोळधाड पुढे सरकते आहे. मोर्शी तालुक्यातून त्यांनी आपला मोर्चा इत्तमगाव, पळसवाडा भागात वळवला आहे. टोळधाडीमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात आहेत. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

पालेभाज्यांसह हिरव्या वृक्षांची पानं खाणारे हजारो टोळ लाखोंच्या संख्येने येऊन पिकाचा फडशा पाडतात. हे नाकतोड्याच्या गटातील तांबूस रंगाची वाळवंटी टोळ असल्याचं कृषी विभागाने सांगितलं.

चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ, चुरणी, डोमा परिसरात रविवारी संध्याकाळी सात वाजता शेकडोंच्या संख्येने टोळांनी आक्रमण केले. टोळधाडीचं कळताच शेतकऱ्यांनी कृषी विभागाला कळवावं असं सरकारने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)