You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सतत राज्यपालांना त्रास देऊ नका, यापुढे आम्हाला सल्ले द्या - जयंत पाटील #5मोठ्याबातम्या
आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवरील बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-
1. सतत राज्यपालांना त्रास देऊ नका, यापुढे आम्हाला सल्ले द्या - जयंत पाटील
देवेंद्र फडणवीसांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या घेतलेल्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली आहे. हा काळ सर्वांनी एकत्र येऊन लढायचा आहे, यात राजकारण आणू नये, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
"दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे की, त्यांनी आमच्याशी बोलावं, सतत राज्यपालांना जाऊन त्रास देऊ नका," असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील यांनी बुधवारी (20 मे) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी भाजपने सरकारवर केलेले अनेक आरोप फेटाळून लावले.
2. राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (20 मे) बोलावलेल्या कोरोनाविषयक आढावा बैठकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाठ फिरवली. महाविकास आघाडीतला एकही मंत्री या बैठकीला उपस्थित नव्हता.
- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?
मुख्यमंत्री कार्यालयातील सनदी अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत याची व्यवस्था करण्यात आली होती. लोकसत्ताने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
राज्यपालांच्या या बैठकीला उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर मात्र हजर होते.
3. राज्यातलं तापमान वाढणार, कोकण - मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सकाळनं ही बातमी दिलीये.
विदर्भासोबतच उर्वरित महाराष्ट्रातला उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलेला आहे. अम्फान चक्रीवादळाची तीव्रता वाढत असल्याने उत्तर आणि वायव्येकडून येणारे कोरडे वारे मध्य भारतात येण्याची शक्यता आहे. यामुळेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.
4. वाहनांवर भाजपचा झेंडा लावा, पण मजुरांना घरी सोडा - प्रियांका गांधी
सध्याच्या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवत मजुरांना मदत करण्याची गरज असल्याचं काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींनी म्हटलंय. पायी निघालेल्या मजुरांसाठी 1000 बसेसचा प्रस्ताव काँग्रेसकडून मांडण्यात आला होता.
आम्ही मजुरांसाठी जी वाहनं उपलब्ध करून देत आहोत, त्यावर भाजपचा झेंडा लावा पण मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहचवण्याची परवानगी द्या, असं प्रियांका गांधींनी म्हटलं आहे. सकाळनं याविषयीची बातमी दिली आहे.
5. गावाकडे पायी निघालेल्या मुलीचं अपहरण, पोलिसांच्या प्रयत्नांमुळे अल्पवयीन मुलगी सापडली
मुंबईहून अकोल्याकडे कुटुंबासोबत पायी निघालेल्या मुलीचं लिफ्टच्या बहाण्याने अपहरण करण्यात आलं होतं. जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. लोकमतने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
मोटरसायकलवरून आलेल्या तरुणाने पायी चालणाऱ्या या कुटुंबातल्या मुलाला आणि मुलीला लिफ्ट दिली. काही अंतर गेल्यानंतर पुढे पोलीस असल्याचं सांगत त्याने मुलाला थोडं अंतर चालून पुढे यायला सांगितलं.
पण बरंच अंतर पार करूनही हा लिफ्ट देणारा आणि बहीण न दिसल्याने या तरुणाने आई - वडिलांना याची माहिती दिली आणि पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. ही मुलगी नंतर महामार्गावर लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरताना सापडली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)