अम्फन वादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला तडाखा, तीन मृत्यू

चक्रीवादळ, अम्फन
फोटो कॅप्शन, चक्रीवादळाने मोठं नुकसान होऊ शकतं.
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फन महाचक्रीवादळ बुधवारी (20 मे) भारत आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे.

या चक्रीवादळाची तीव्रता बघता किनारपट्टीवरच्या लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत असलेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अडचणीत या चक्रीवादळामुळे आणखी वाढ झाली आहे.

110 किमी वेगाने अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात सुसाट्याचा वारा सुरू आहे. आतापर्यंत या वादळाने तीन बळी घेतले आहेत. पश्चिम बंगालमध्ये दोन जण तर ओडिशामध्ये एका मुलीचा या वादळामुळे मृत्यू झाला आहे.

ओडिशातील भद्रक आणि बालासोर भागात जोरात हवा सुरू आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण 24 परगना, पूर्व मिदनापूर या भागात लॅंड फॉल झाले आहेत. म्हणजेच या वादळाने जमिनी भागाला नुकसान पोहोचवलं आहे.

ओडिशात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि प्रचंड पावसाला सुरुवात झाली आहे.

बंगालच्या उपसागरात सोमवारी (18 मे) निर्माण झालेल्या अम्फन चक्रीवादळाने हळूहळू रौद्र रुप धारण केलं आणि त्याचं रुपांतर 'सुपर सायक्लॉन' म्हणजेच 'महाचक्रीवादळात' झालं.

लाईन

लाईन

21 वर्षानंतर आलेलं सर्वांत मोठं वादळ

बंगालच्या उपसागरात मोठ-मोठे, तीव्र, अतितीव्र चक्रीवादळ तयार होत असतात. मात्र, 1999 नंतर म्हणजे तब्बल 21 वर्षांनंतर पहिल्यांदा महाचक्रीवादळ निर्माण झालेलं आहे. 1999 साली ओडिसाच्या किनारपट्टीला धडक देणाऱ्या चक्रीवादळात तब्बल 9 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.

या महाचक्रीवादळचा सामना करण्यासाठी 20 हून अधिक मदत पथकांना तैनात करण्यात आलं आहे आणि गरज पडली तर आणखी मदत पथकं तयार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनसारखे अडथळे असल्याने किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत.

भारताच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी एस. जी. राय यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, "लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आमच्याकडे केवळ 6 तास आहेत आणि यात आम्हाला सोशल डिस्टंसिंगचही पालन करायचं आहे."

अम्फन या दशकातलं आतापर्यंतचं सर्वांत मोठं चक्रीवादळ असल्याचं हवामानतज्ज्ञांनी सांगितलं.

कोरोना

कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. मोठ्या शहरातून लोक आपापल्या गावी जात आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामधूनही लाखोच्या संख्येने तरूण रोजगाराच्या शोधात देशातल्या मोठ्या शहरांमध्ये जात असतात. हेसुद्धा आता आपापल्या घरी परतत आहेत.

मात्र, अम्फनचा धोका बघता 18 ते 20 मे दरम्यान मजुरांना घेऊन परतणाऱ्या श्रमिक ट्रेन ओडिशा सरकारने रद्द केल्या आहेत.

चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी प्रवेशबंदी केलेली आहे. राज्य सरकारने या लोकांची व्यवस्था इतर जिल्ह्यांमध्ये करावी, अशी विनंती या अधिकाऱ्यांनी केली आहे.

किनारपट्टीच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ओडिसामध्ये 800 शेल्टर्स आहेत. मात्र, त्यापैकी 250 शेल्टर्सचा वापर कोव्हिड क्वारंटाईन सेंटर म्हणून होतोय.

त्यामुळे शाळा आणि इतर इमारतींमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे.

चक्रीवादळ, अम्फन

फोटो स्रोत, AHSANUR RAHMAN RAJIB

फोटो कॅप्शन, चक्रीवादळामुळे अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

भारतातल्या सुंदरबन भागातून जवळपास 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने 'यलो अलर्ट' जारी केला आहे आणि दक्षिण बंगालच्या खाडीत जाऊ नये, अशा सूचना मच्छिमारांना करण्यात आल्या आहेत.

बांगलादेशातली परिस्थिती

भारताच्या शेजारील बांगलादेशातल्या हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, 2007 साली आलेल्या सिद्र चक्रीवादळाहूनही हे वादळ मोठं आहे.

सिद्र चक्रीवादळाच्या तडाख्यात बांगलादेशात 3500 लोकांचा मृत्यू झाला होता.

बांगलादेशच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 20 लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. आज सकाळपासूनच या मोहिमेला सुरुवात झाली आहे.

चक्रीवादळ, अम्फन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चक्रीवादळ घोंघावणार

सोशल डिस्टंसिंग पाळता यावं, यासाठी अधिकचे शेल्टर्स उभारण्यात आले आहेत. शिवाय फेस मास्कचं वाटपही सुरू आहे.

चक्रीवादळामुळे 10 ते 16 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. मात्र, किनाऱ्यावर धडकल्यानतंर अम्फन चक्रीवादळचा वेग झपाट्याने कमी होईल, असा अंदाज आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)