कोरोना: आदित्य ठाकरे - संजय राऊत यांच्यात अलगीकरण कक्षासाठी मैदानं वापरण्यावरून मतभेद

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोनाशी लढण्यासाठी मुंबईतलं वानखेडे स्टेडियमच नव्हे, ब्रेबॉर्न स्टेडियमही ताब्यात घ्यावं, अशी सूचना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून केल्यानंतर, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी राऊतांची सूचना धुडकावून लावली.

मैदानांमध्ये पावसाळ्यात चिखल होतो, त्यामुळं अलगीकरण केंद्रांसाठी स्टेडियमचा उपयोग होणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी राऊतांना उत्तर दिलं.

मात्र, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची ट्विटरवरील ही चर्चा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय. कारण एकाच पक्षातील या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची विधानं परस्परविरोधी आहेत.

अलगीकरण केंद्रांसाठी मैदानं घ्यावी की नाही, याचीही चर्चा आता सुरू झालीय.

मुळात ही चर्चा सुरू होण्याचं किंवा संजय राऊतांनीही यासंदर्भात ट्वीट करण्याला पार्श्वभूमी आहे ती मुंबईच्या महापौरांनी वानखेडे स्टेडियमची केलेल्या पाहणीची.

मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं वाढताना दिसतोय. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं मुंबईत अतिरिक्त तयारी सुरूही केली. त्याचाच एक भाग म्हणून, शहरातील अनेक ठिकाणांची पाहणी मुंबई महापालिका, राज्य सरकारकडून केली जातेय.

मुंबईच्या महापौर म्हणतात, वानखेडेवर अलगीकरण कक्ष होणार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी वानखेडे स्टेडियवर जाऊन पाहणी केली.

ही पाहणी केल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवरून सांगितलं की, "मुंबईत वाढत्या रुग्ण संख्येसमोर आता जागा अपुरी पडतेय. आरोग्य यंत्रणेवर याचा मोठा ताण वाढलाय. यासाठीच वानखेडे स्टेडियमची पाहणी केली. "

वानखेडे स्टेडियमचे रूपांतर कोरोना व्हायरस एसिम्प्टोमॅटिक (लक्षणं नसलेले) पॉझिटिव्ह रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी एक सेंटर बनवण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे, असं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.

अलगीकरण कक्ष वानखेडेच्या मैदानात नव्हे, पार्किंगमध्ये - अमेय घोले

यावेळी महापौरांसोबत मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक अमेय घोले हे सुद्धा होते. त्यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली आणि मैदानांचा वापर होऊ शकतो का, याबाबत माहिती जाणून घेतली.

अमेय घोले म्हणाले, "अलगीकरण कक्षासाठी मैदानं घेण्याचा कुठलाही विचार नाही. वानखेडे स्टेडियमच्या पार्किंगच्या भागाची पाहणी आम्ही केली. कारण तिथं काँक्रिट आहे."

तसंच, "अलगीकरण कक्ष उभारायचं म्हटल्यास मोठमोठे खांब उभारावे लागणार, त्यात पावसाळा जवळ आलाय. त्यामुळं जे केंद्र उभारणार ते भक्कम असले पाहिजेत. असा सर्व विचार केल्यास कुठल्याही मैदानात ते उभारणं शक्य होणार नाही."

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर संजय राऊतांना दिलेल्या उत्तराला अमेय घोले यांनी एकप्रकारे दुजोराच दिलाय.

शिवसेना नेत्यांमधील या विसंगत विधानांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केलीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)