लॉकडाऊनच्या काळात वाधवान यांना पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत रुजू #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा-

1. वाधवान यांना पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सेवेत रुजू

लॉकडाऊनच्या काळात कपिल आणि धीरज वाधवान बंधूंसह 23 जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगीचे पत्र दिल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. सकाळनं ही बातमी दिली आहे.

याप्रकरणी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य आयुक्त मनोज सौनिक यांनी काही दिवसांपूर्वीच चौकशी अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांना सादर केला होता.

कोणाच्या शिफारसीने नव्हे केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून वाधवान बंधूंना पत्र दिल्याची कबुली गुप्ता यांनी चौकशी समितीसमोर दिली होती. या प्रकरणी गुप्ता यांना समज देण्यात आली असून भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी ताकीदही देण्यात आली.

लॉकडाऊनचे नियम मोडत गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी 8 एप्रिल रोजी कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला महाबळेश्वपर्यंत प्रवास करण्यासाठी शिफारसपत्र दिले होते.

या प्रकरणी राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

2. आरोग्य विभागात 30 हजार जागांची भरती- राजेश टोपे

महिनाभरात आरोग्य विभागात जवळपास 30 हजार रिक्त जागा भरणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना ते दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

"मुंबई महापालिकेनं रिक्त जागा भरण्यास सुरुवात केली असून राज्यातील इतर ठिकाणी असणाऱ्या जागाही तात्काळ भरण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात 17 हजार 337 जागा रिक्त आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागात 11 हजार जागा रिक्त आहेत. राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. महिनाभरात या सर्व जागा भरण्यात येणार आहेत," असं टोपे यांनी सांगितलं.

3. आतापर्यंत 40 कोटी लोकांच्या खात्यांमध्ये 34,800 कोटी रुपये जमा : भाजप

लोकांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मागणीला भाजपनं उत्तर दिलं आहे. पक्षानं म्हटले आहे की, काँग्रेस सरकारांनी जे मागील 70 वर्षांत केले नाही, ते मोदी सरकारनं मागील 6 वर्षांत करून दाखवले आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारने गरिबांच्या हितासाठी जवळपास 40 कोटी लोकांच्या खात्यांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून 34,800 कोटी रुपये जमा केले आहेत.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांना सांगितले, "आर्थिक वादळ रोखण्यासाठी सरकारने व्यवस्था केली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची त्सुनामी होती. मोदी सरकारने भ्रष्टाचाराची सफाई केली आहे. 1 रुपयामधील केवळ 15 पैसेच गरिबांच्या हातात पोहोचत होते व 85 पैसे मधले लोक खात होते, अशी तेव्हा स्थिती होती. आता मात्र थेट लोकांच्या खिशात पैसा पोहोचत आहे."

अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी व श्रमिकांच्या रोजगारासाठी 20 लाख कोटी रुपयांची व्यवस्था करताना एमएसएमई, निर्माण क्षेत्रापासून ग्रामीण अर्थव्यवस्थेपर्यंत सरकारनं पैसे पोहोचवले असल्याचं पात्रा यांनी सांगितलं.

4. राहुल गांधींचा मजुरांशी संवाद

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरत गावाकडे पायी चालत निघालेल्या मजुरांशी संवाद साधला. देशातील इतर शहरी भागांप्रमाणेच रोजगार न उरल्यामुळे दिल्लीतील मजूरही आपापल्या गावी परतत आहेत.

राहुल गांधी यांनी दिल्लीच्या सुखदेव विहार उड्डाणपुलाच्या परिसरातून चालत जात असलेल्या मजुरांशी संवाद साधला. यावेळी काही मजूर विश्रांतीसाठी रस्त्याच्या कडेला बसून होते. याठिकाणी आल्यानंतर राहुल गांधीही त्यांच्यासोबत फुटपाथवर बसले. यानंतर राहुल गांधी यांनी स्थलांतरित कामगारांशी संवाद साधला. झी न्यूजनं ही बातमी दिली आहे.

दरम्यान, स्थलांतरित मजूरांविषयीचं पोर्टल केंद्र सरकारनं जारी केलं आहे. National Migrant Information System असं या पोर्टलचं नाव असून त्यावर स्थलांतरित मजूरांविषयीची माहिती उपलब्ध असणार आहे.

5. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतमालाचं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसानं जारदार हजेरी लावली.

पुणे, नांदेड, लातूर, रत्नागिरी, हिंगोली, औरंगाबादसह अनेक तालुक्यांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)