कोरोना व्हायरस : भारतात येत्या सहा महिन्यात 3 लाख बालकं दगावण्याची भीती युनिसेफनं का व्यक्त केली?

    • Author, कमलेश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

जगातल्या सर्वच देशातल्या आरोग्य यंत्रणेवर कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा परिणाम जाणवू लागला आहे. सध्याच्या घडीला उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीपैकी बहुतांश साधनसामग्रीचा उपयोग कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी होतोय.

अशा परिस्थितीत पुरेशा आरोग्य सेवा न मिळाल्याचा गंभीर परिणाम बालकांच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमेरजन्सी फंडने (युनिसेफ) हा अंदाज वर्तवला आहे.

भारतात येत्या 6 महिन्यात 5 वर्षांखालील 3 लाख बालकांचा मृत्यू होण्याची भीतीही युनिसेफने व्यक्त केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मृत्यू कोरोनामुळे झालेले नसतील.

संपूर्ण दक्षिण आशियात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचं प्रमाण 4 लाख 40 हजारांपर्यंत असू शकेल, असाही अंदाज युनिसेफने वर्तवला आहे. यापैकी सर्वात जास्त मृत्यू भारतात होण्याची शक्यता आहे.

युनिसेफच्या दक्षिण आशिया रिजनल डिरेक्टर जीन गॅफ म्हणतात, "गेल्या अनेक दशकात पहिल्यांदाच पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढेल, अशी भीती आम्हाला आहे. कुठल्याही परिस्थितीत गर्भवती, माता आणि बालकांना सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं आहे. आपण जागतिक आरोग्य संकटाचा सामना करत आहोत, हे मान्य. पण त्याचवेळी गेली अनेक वर्ष प्रयत्न करून मातामृत्यू आणि बालमृत्यू दरात झालेली सुधारणा धुळीला मिळवता येणार नाही."

युनिसेफच्या अंदाजानुसार भारतानंतर बालमृत्यूची सर्वाधिक आकडेवारी पाकिस्तानात असेल. पाकिस्तानात 95 हजार, बांगलादेशात 28 हजार, अफगाणिस्तानात 13 हजार आणि नेपाळमध्ये 4 हजार बालकांचा मृत्यू होण्याचा धोका संभवतो.

यामागचं नेमकं कारण काय?

ज्या देशांमधली आरोग्य यंत्रणात फार मजबूत नाही त्या देशांमध्ये कोव्हिड-19 मुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे आणि वैद्यकीय साधनांच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. तसंच मनुष्यबळ आणि आर्थिक संस्थांवरही ताण वाढतोय.

लॉकडाऊन, संचारबंदी आणि वाहतुकीवर असलेल्या बंदीमुळे आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या रोडावली आहे. लोकांना कोरोना विषाणूची बाधा होण्याचाही भीती वाटते आहे. इतकंच नाही तर कोरोनाच्या फैलावाला आळा घालण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीमही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

भारतातही अशीच परिस्थिती आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. ज्याचा परिणाम लहान मुलांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेवर होतो आहे.

दिल्लीतल्या मॅक्स हॉस्पिटलमधल्या बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. बबीता जैन सांगतात, "लसीकरण उशीरा होईल, हीच सर्वात मोठी भीती आहे. वेळेत लसीकरण झालं नाही तर त्यातून अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. लोकांना डॉक्टरांकडे जाण्याचीही भीती वाटतेय आणि अनेक डॉक्टरांनी आपले क्लिनिकही बंद केले आहेत.

जन्माच्या पहिल्या वर्षात देण्यात येणाऱ्या लसी अत्यंत महत्त्वाच्या असतात. लस देण्यात थोडा उशीर झालेला चालू शकतो. मात्र, मर्यादेपेक्षा जास्त उशीर होऊ देता कामा नये."

दुसरीकडे युनिसेफचे दक्षिण आशियाचे रिजनल हेल्थ अॅडव्हायजर पॉल रटर म्हणतात, "कोव्हिड-19 काळात बाळांचा जन्म, आरोग्य आणि पोषणासंबंधीच्या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कोव्हिड-19 मुळे नाही तर नियमित सेवा खंडित झाल्याने मोठ्या प्रमाणावर लहान बालकांचा मृत्यू होताना बघणं अत्यंत क्लेषकारक ठरेल."

अहवालातील इतर महत्त्वाच्या बाबी

अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी केलेल्या विश्लेषणावर युनिसेफचा अंदाज आधारित आहे. हे विश्लेषण लँन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नल या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आलं आहे.

या विश्लेषणात तीन परिस्थितींच्या आधारे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, जगातल्या 118 अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 12 लाख मुलांचा मृत्यू होऊ शकतो.

या तीन परिस्थितींपैकी एक सर्वात कमी गंभीर परिस्थिती आहे. यात आरोग्य सेवांचा पुरवठा 15 टक्क्यांनी खंडित होतो. या परिस्थितीत जागतिक पातळीवर 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूत 9.8 टक्क्यांची वाढ होऊ शकते किंवा रोज 1400 मुलांचा मृत्यू होऊ शकतो, तर मातामृत्यू 8.3 टक्क्यांनी वाढू शकतो.

सर्वात वाईट परिस्थितीत आरोग्य सेवा 45 टक्क्यांनी खंडित होतात. त्या परिस्थितीत 5 वर्षांहून कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूत 44.7 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, तर मातामृत्यू दर 38.6 टक्क्यांनी वाढू शकतो.

कोरोना संकटामुळे कुटुंब नियोजन, बाळंतपण, गरोदरपणातली तसंच बाळंतपणानंतरची देखभाल, लसीकरण आणि उपचारात्मक सेवांवर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष या विश्लेषणात काढण्यात आला आहे. संपूर्ण पोषण न मिळणं, जन्मजात सेप्सिस आणि न्युमोनियावर उपचारात येणारे अडथळे यामुळे सर्वाधिक बालमृत्यू होतील.

आरोग्य सेवा कोलमडल्यास सर्वात जास्त बालमृत्यू होणारे 10 देश असतील - बांगलादेश, ब्राझिल, कांगो प्रजासत्ताक, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्ताना, युगांडा आणि टांझानिया.

'या' दहा देशांमध्ये बालमृत्यूदर सर्वाधिक असेल...

युनिसेफच्या अहवालानुसार बालमृत्यू दर सर्वाधिक असणारे 10 देश असतील - जिबुती, इस्वातिनी, लेसोतो, लायबेरिया, माली, मलावी, नायजेरिया, पाकिस्ताना, सिएरा लिऑन आणि सोमालिया. या देशांमध्ये जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

जवळपास 11 कोटी बालकं लसीकरणापासून वंचित

लँन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या विश्लेषणामध्ये बालमृत्यू आणि मातामृत्यू दर याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय युनिसेफने मुलांवर पडणाऱ्या अप्रत्यक्ष परिणामांविषयीही काळजी व्यक्त केली आहे.

  • कोरोना संकटामुळे जगातल्या 132 देशांमधले 18 वर्षांखील 77% मुलं (2.35 अब्ज मुलांपैकी 1.80 अब्ज मुलं) घराबाहेर पडले नाही.
  • 177 देशांमध्ये शाळा बंद असल्याने जवळपास 1.3 अब्ज मुलं (72%) शाळेत जाऊ शकली नाही.
  • 143 देशांमध्ये जवळपास 37 कोटी मुलांना शाळेतून पोषण आहार मिळतो. मात्र, शाळा बंद असल्याने त्यांना सध्या सकस जेवण मिळणं कठीण झालं आहे.
  • लसीकरण कार्यक्रम बंद असल्याने 14 एप्रिलपर्यंत 37 देशांमधले 11 कोटी 70 लाखांहून जास्त मुलांना गोवरची लस मिळू शकली नसावी.
  • .जगातले 40% लोक घरी साबण आणि पाण्याने हात धुवू शकत नाही.

लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित या आव्हानांचा सामना करण्यासाठी युनिसेफने या आठवड्यापासून #Reimagine नावाने नवी मोहीम सुरू केली आहे. सरकार, जनता, दानदाते आणि खाजगी क्षेत्राने या मोहिमेत सहभागी व्हावं, असं आवाहनही युनिसेफने केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)